इथे असतीस तर तू.....

किती बर्फाळलेला क्षण... इथे असतीस तर तू?
उबेला आपले आपण... इथे असतीस तर तू...

हिमाच्छादीत शिखरांनी स्वतःला रमवतो मी
मला नसतेच हे कारण... इथे असतीस तर तू

ऋतूंनी ग्रीष्म बेमालूम गोठवलाच असता
वसंताच्या पुढे श्रावण... इथे असतीस तर तू

तुझी पूजा, गुलामी, प्रार्थना, वरदान, शिक्षा
इथे नसतीस निष्कारण..... इथे असतीस तर तू

स्मृती कवटाळुनी साऱ्या..... तुला स्वप्नांमधे मी
कसे करणार पाचारण इथे असतीस तर तू?

सुरक्षेवीण हे लावण्य कोणी मागते का?
स्वतः असतोच मी तारण इथे असतीस तर तू

अताशा 'बेफिकिर' वाचाळतो आहे स्वतःशी
असे नसतेच संभाषण इथे असतीस तर तू

टीप - यमकानुसारी गझल!