माझ्या लग्नाची गोष्ट - १

आज काल कॉलेजमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या तिची नजर वेड्यालाच शोधत होती. बरेच दिवस "तो" तिच्या डोळ्यात भरत होता. त्याचे ते बोलके डोळे, सदा हसमुख चेहरा आणि त्याची मोहक देहबोली तिच्या नजरेसमोरून जातच नव्हत्या. एके दिवशी न राहवून तिने चोंबडीला विचारले.   

सखी :- - हा नवीन प्राणी कोण आहे? (मुद्दामूनच प्राणी, नाही तर कॉलेजभर पसरायचे. चोंबडीला चांगलीच ओळखून होती ती)

चोंबडी:- माहीत नाही. नवीनंच दिसतोय. आपल्या वर्गातील "क्ष" म्हणत होती की त्याचे नाव सुशिक्षित वेडा आहे. तिच्या गावाकडचा आहे म्हणे. पण तो जरा विक्षिप्तच वाटतो जरा. २ महिन्यामध्ये एकाही मुलीशी बोलताना पाहिले नाही नि त्याला, तू विचार सोड त्याचा.

सखी :- बरं बरं (तुला काय करायचेय? मी बघेन ना माझे माझे), ते जरनल पूर्णं झाले का गं? मला दे ना मला कॉपी काढायचीय.

विषय बदलला तरी मनातून त्याचे नाव कळल्याचं आनंद लपवताना त्रेधातिरपीट उडत होती, आणि त्या आनंदाच्या भरात मस्त तिने मनातल्या मनात बऱ्याच उड्या मारल्या. उद्यापासून ह्याच नावाने जप करणार होती ना ती!!!!!!

________________________________________________________________

आपला सुशिक्षित वेडा, लहानशा गावाकडून आल्यामुळे जरा मुली बरोबर बोलायची अक्कल नव्हती आणि आपल्याला मुलींशी बोलायची अक्कल नाही ते बरोबर जाणून होता त्या मुळे तो त्या फंदातच पडला नव्हता. उगाच नसती आफत कशाला? म्हणून त्याने सरळ दोन चार टाळकी जमा केली आणि आपले विश्व तयार करण्याच्या नादाला लागला. त्यातल्या त्यात मंगेश आणि आदित्य त्याचे जिगरी बनले होते आणि त्यांनी त्यांना त्याच्या लहानश्या जगात स्थान मध्यवर्ती स्थान दिले होते.

सखीची नजर सारखी ह्या वेड्याकडे असते ते कॉलेजच्या 'अनुभवी' टाळक्यानं एव्हाना समजून चुकले होते, आणि हि गोष्ट त्यांनी वेड्याच्या 'नजरेस' सुद्धा आणून दिले होते तरीही वेड्यानं रीतसर दुर्लक्ष करून आपले टिंगलटवाळीचे कार्य अबाधित ठेवले होते.

_________________________________________________________________

सखीलासुद्धा आता मैत्री केल्याशिवाय राहवत नव्हते आणि म्हणूनच ओळख करवून घेऊन ती वाढवण्याकरिता तिने हात-पाय मारायला सुरवात केली होती आणि तिच्या प्रत्येक प्रयत्नाला 'तो' आपले 'सुशिक्षित वेडा' नाव सार्थ ठरवत होता आणि तिची तळमळ आणि चिडचिड वाढवीत होता.

_________________________________________________________________

तारुण्यसुलभ भावनेनुसार त्यालाही आता 'रेशमी बंध' आपल्याला सुद्धा असावेत ह्या विचाराने त्याच्या मनात आता मूळ धरले होते पण विचारांना कृतीचा अजून कोंब फुटला नव्हता. आता तर वेड्याच्या शोधक नजरेला नेमकी तिची 'लाइन' मिळत नव्हती पण शेवटी नजरच ती, मिळाली तरी भाषा कळत नव्हती कारण आता इतके दिवस नजरानजर झाल्यावर कमीतकमी स्मितहास्य देणे भाग पडते कारण, आता दुर्लक्ष करून चालत नाही आता.....

__________________________________________________________________

आता मात्र अतीच झाले आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच ह्या निर्धाराने सखी आता झपाझप पावले टाकत त्याच्याकडे गेली, तिचा आवेश पाहून ह्याच्या मनात वेगळ्याच शंका घेर घालत नाचू लागल्या (भित्यापोटी ब्रह्मराक्षस) आणि तो जागच्याजागीच थिजून राहिला.

सखी :- हाय!!! मी सखी.

वेडा- उमम!!! काय?

सखी- (प्रत्येक शब्दावर भर देत) मी म्हणाले माझे नाव सखी आहे.  

वेडा :- (अजूनही भांबावलेल्या अवस्थेत) हो का? छान आहे. (सटकायच्या वाटा/बहाणा शोधायला सुरवात करत)

सखी :- (मनातल्या मनात हसत) तुला माहीत नसेल तर मी सांगते की आता तू तुझे नाव सांगायचे असते.

वेडा :- ओ!!! हो. मी सुशिक्षित वेडा. (शांतता)

दुसरा थांबलेले संभाषण सुरू करेल ह्या आशेने दोन क्षण असेच दोघे एकमेकांची वाट बघत असताना अचानक, ए मंग्या!!!! अशी जोरदार हाक टाकून सुटलो ह्या भावनेने तिचा पोपट करून त्याने धूम ठोकली.

पण ती इकडे आनंदात होती की चला, आता ह्याच्याशी बोलावयास परवाना (लायसन्स) मिळाला, मनोमन शाबासकी देत आणि पुढच्या वाटचालीची योजना आखत आपल्या मार्गास लागली.

____________________________________________________________

इथे कॉलेजमधल्या टवाळ्या 'अनुभवी' मंडळींना चर्चा करायला नवीन विषय मिळाला होता आणि त्याचा पुरेपूर वापर करत त्यांनी चर्वण करत पुढच्या घटनांवर पैजा लावायला सुरवात केली.

______________________________________________________________

ए वेड्या हाय!!!! काल अचानक कुठे पळून गेलास. दुसऱ्या दिवशी तो दिसल्या बरोबर तिने त्याला धारेवर धरला.

वेडा :- नाही. ते.. तो मंग्या.. मंगेश दिसला होता आणि मला जरा काम होत त्याच्याकडे.

सखी :- ठीक आहे. आज पण काम आहे का?

वेडा :- (पुढे येणाऱ्या प्रश्नाचा अंदाज न आल्याने) नाही, कालच संपले.

सखी :-  माझ्या बरोबर कॉफी प्यायला येशील का? म्हणजे, आज ति चोंबडी आली नाही ना आणि मला फारच भूक लागली आहे.

वेडा- ह्म्म!!!! ठीक आहे चल.

अशा रीतीने आपली हि जोडी स. पं च्या बाहेर असलेले एस एस मध्ये जाऊन बसली, वेड्याला काही कळत नव्हते काय बोलायचे कसे बोलायचे ते त्यामुळे तो मूग गिळून (कॉफी गिळून) बसला होता आणि इकडे तिच्या आनंदाला उधाण आल्यामुळे ति बरीच बडबड करत बसली होती. जेव्हा चहा पान कॉफिपान उरकून दोघे बाहेर पडले तेव्हा गप्पांच्या ओघात तिने ह्याच्याकडून जवळपास सगळी माहिती काढून घेतली होती.

नंतर परत त्याने निरोप घेत क्लासच्या नावाखाली पळ काढला. आणि तिला जाणवले की  हा आपल्या 'सुशिक्षित वेडा' ह्या नावाला अक्षरशः: जागतो आहे आणि आपल्यालाच काहीतरी हालचाल करायला लागणार आहे. बराच वेळ विचार करून तिच्या डोक्यामध्ये एक कल्पना चमकली..... आणि तिने त्याच्या 'जिगरी' आदित्यला गाठले.

_______________________________________________________________

परत इथेही 'अनुभवी' मंडळींना कुठलातरी वास लागलाच होता आणि त्या वासाचा माग काढत त्यांनी आधी लागलेल्या पैजेचा हिशोब करायला सुरू केली होती... हिशोब झाल्यावर पुढच्या घटनांवर पैजा लावायला सुरवात केली. आता पैजेचा 'रेट' वाढला होता...

_______________________________________________________________

इकडे क्लास संपवून वेडा घरी आला तेव्हा तो ते दृश्य पाहून दारातच थबकला, कारण सखी घरी येऊन मस्त मांडी घालून वहिनीबरोबर वेड्याचे लहानपणीचे फोटो बघत खिदळत बसली होती!!!!! आणि दोघांची नजरानजर झाल्याबरोबर तिने मस्त 'वाहिनी लल्ला आला गं!!!!!! अशी साद दिली.

वहिनी पटकन आत जाउन पाण्याचा ग्लास घेउन बाहेर आली आणि हळूच त्याच्या कानात म्हणाली "निवड मस्त आहे हो". छे!! छे!! वहिनी काहीतरीच काय? असे म्हणून त्याने तिचे आपल्या घरी का असण्याचे कोडे सोडवण्यास सुरवात केली. ते सुटत नसल्याचे पाहून त्याने 'आई बाबाना कळाल्या नंतर?' ह्या संकटातून सुटण्याचे मार्ग शोधू लागला, तोही मार्ग सापडनेसा झाल्यावर मात्र त्याने आलिया भोगासी म्हणत हार मानून पुढे काय होते त्याची वाट बघत बसला.....

जवळपास १-२ तासांनी, मस्त वाहिनीच्या हातचे जेवण हादडून झाल्यावर तिने घड्याळाकडे बघून घाई घाईत आवरण्यास सुरवात केली आणि पायात चप्पल घालत घालत वहिनी मी येते ग!!! म्हणताच वेड्याने सुटकेचा निःश्वास टाकला. तोच वहिनी म्हणाली "अरे वेड्या, घरी आलेल्या पाहुण्याला असे दारातुनच पाठवायचे नसते हे सुद्धा सांगायला लागते का रे?, जा तिला सोडायला स्टॅंड्वर आणि घाई करू नकोस बस मिळे पर्यंत थांब" हे ऐकल्या बरोबर सखीने वाहिनीकडे नजरेनेच शतशः आभार मानले आणि वाहिनीने सुद्धा नजरेनेच त्याचा स्वीकार केला.

बसस्टॉपकडे जाताना वेडा थोडा गप्प गप्प होत म्हणून तिने त्याला कारण विचारताच वेडा अचानक तिला म्हणाला " सखी, तू माझ्याघरी आलेले मला आवडलेले नाही. वाईट वाटून घेऊ नकोस, पण माझ्याघरी, माझ्या मित्रमैत्रिणींनी, माझ्या अपरोक्ष आलेले मला चालत नाही आणि प्लीज समजून घे की मी छोट्या गावाकडचा मुलगा असल्यामुळे मला अश्या गोष्टींची सवय नाही. खरम्हणजे एव्हाना तुला कळून चुकलेच असेल की मला मुलींबरोबर जास्त चालत बोलत नाही. त्यामुळे आपण परत न भेटलेले चांगले. तुला माझ्या असंख्य शुभेच्छा ....

अंगावर वीज पडावी अशी तिची अवस्था झाली होती, वेडा बोलतच होता पण तिला काहिएक अक्षर कळत नव्हते. तरीसुद्धा झटकन सावरून तिने त्याचे बोलणे पूर्णं व्हायच्या आत आलेल्या बस मध्ये बसून त्याचा निरोप घेतला.... बस मध्ये सखीच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिच्या साठी तिचे सगळे जग थांबले होते आणि फक्त बस चालत होती......

(उर्वरित पुढील भागात...... )