माझ्या लग्नाची गोष्ट - अंतिम भाग

आता दुसऱ्यादिवशी अचंब्याने तोंडात बोटे घालायची पाळी सगळ्या अनुभवी
मंडळींची होती कारण दुसऱ्यादिवशी सखी कॉलेजमध्ये आल्या आल्या वेड्याने मस्त
एका गेटवरून "हाय सखी" म्हणून साद दिली होती ती दुसऱ्या गेटवर ऐकू गेली
होती. भानावर येताच अनुभवी मंडळींची जुने पुराणे पैजेचे हिशोब करण्यात
जुंपली आणि गरज नसताना १-२ तासात तर पूर्णं कॉलेजमध्ये सखी वेड्याची बातमी
वणव्यासारखी पसरली आणि नंतरसुद्धा पूर्णं दिवसभर 'सखी वेडा' हाच त्यांच्या
चर्चेचा विषय होता. एक नवीनंच वातावरण तयार झाले होते.......

एस पी कॉलेजबाहेरच पी. एम. टी ची बस बंद पडली होती आणि ती बघून सखीच्या
मनात एक विचार आला आणि ती खुदकन हसली तो विचार होता की तिच्यासाठी एक
वर्षापूर्वी जग थांबले होते आणि बस चालत होती.......... आता जग चालू झालंय
आणि बस बंद पडली आहे......
.

_________________________________________________________________

बघता बघता आज सखी वेड्याच्या मैत्रीला ५-६ वर्ष झाली आता. दोघांनी आपआपले शिक्षण पहिल्या वर्गात पूर्णं करून आपआपले करियर निवडुन त्यामध्ये प्रगती करत होते. वेडा बऱ्याच गोष्टी मध्ये प्रयत्न करून आता मोठ्या कंपनीमध्ये मनुष्यबळ विभागात कामाला लागला होता तर सखीने तिच्या आवडीनुसार एक परकीय भाषा शिकून घेतली होती आणि त्यामध्ये आपले करियर सुरू केले होते. तरीसुद्धा  दोघे दर शनिवारी न चुकता वेळात वेळ काढून एस. पी कॉलेजच्या बाजूस असलेले 'कॅफे कॉफी डे'मध्ये न चुकता हजेरी लावत होते. एकंदरीत मस्त आयुष्य चालू होते...

सखी मात्र वेड्यापासून तिच्या वेड्याबद्दलच्या भावना अजून लपवून ठेवत होती, का जाणे ती कॉलेजमध्ये जशी वेड्याशी बिनधास्त वागत बोलत असे तशी आताशा वागत बोलत नसे.  जरा जपूनच वागायची, बहुतेक तिला वेड्याच्या वेड्या स्वभावाची भीती वाटत होती. तशी ती मध्येमध्ये त्याला 'हिंट' देत होती, पण वेडा तो वेडाच शेवटी काय करणार आता..... मग त्याच्या वेडेपणाला कंटाळून तिने त्याला शेवटची 'हिंट' देण्यासाठी तिच्या घरी ओळख करून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. कार्यक्रम झाल्यावर तिने फक्त कपाळावर हात मारून घ्येयचा राहिला होता कारण पोहे खाल्ल्यावर वेडा घरच्या लोकांशी मस्त गप्पा मारत बसला आणि निघून गेला,  नंतर काही विषयच नाही काढला म्हणजे त्याला काही कळलेच नाही की काय? तरी एक गोष्ट मात्र चांगली झाली होती ति म्हणजे वेड्याची सखीच्या घरी ओळख झाली होती आणि त्या नंतर तो घरी येत जात राहिला होता आणि जणू घरचाच झाला होता.

सखी आधीपासून वेड्याच्या घरी येत-जात असल्या मुळे वाहिनीशी चांगलीच गट्टी जमली होती, आणि वहिनीला तिने वेड्याबद्दल सगळे सांगितले होते. वाहिनीने सुद्धा वेड्याच्या स्वभाव बघता जरा सबुरीचा सला दिला होता. सखीला आता या आगळ्यावेगळ्या 'स्टील-मेट' चा वैताग आला होता, कारण घरी तिच्यासाठी खऱ्याखुऱ्या 'कांदे-पोह्यांचा' कार्यक्रम व्हायला लागले होते. आणि तिला माहीत होते की तिला ह्या स्थळांना नकाराचे एकनाएक दिवस कारणे दाखवा नोटिस येणार होती. 

_____________________________________________________________

एक दिवस सकाळी वेड्याचे बाबा मस्त सकाळचा चहा मारून सेकंड राउंडाची वाट पाहत पेपर वाचत बसले होते.  तेव्हड्यात बेल वाजली म्हणून दार उघडले तर एक मध्यमवयीन जोडपे दारात आले होते आणि अभिवादनाला हात न घालता थेट दारातूनच ओरडले "जरा तुमच्या मुलाला आवर घाला, बाहेर जाऊन काय दिवे लावतोय ते माहीत आहे का? दुसऱ्यांच्या मुलींना फिरवतोय,  कुठेय तो,  बोलवा त्याला पोलिसातच देतो... " बाईसुद्धा कंबरेला पदर खोचून आपल्या पाळीची वाट बघत होत्या.  एकंदरीत वेगळं प्रकरण दिसतेय हे जाणवल्यावर वेड्याच्या बाबांनी एक हात वर करत शांत होण्याचा इशारा केला, त्यांना आत बोलवले आणि आत वेड्याच्या आईला साद दिली 'ए, अग जरा गरम लोकासाठी  थंड पाणी आण बरं' आणि त्या अनोळखी जोडप्याला उद्देशून म्हणाले 'थांबा जरा, आत या, पाणी प्या, शांत व्हा मग बोलूयात'. आता हा प्रसंग असे वळण घेईल असे त्या जोडप्याला वाटलेच नव्हते,  ते तर पूर्णं भांडण्याच्या तयारीनेच आले होते पण वेड्याच्या बाबांनी तर परत उलटे भांडणे सोडाच तर त्यांना आत बोलावून त्यांना पाणी दिले होते आणि वर जरा अधिकारवाणीने त्यांना थांबून, शांत होऊन मग बोलायला सांगितले होते. मग जोडप्याने आपापसात खलबते करून आपला रागाला जरा लगाम घातला होता आणि बाईंनी खोचलेला पदर बाहेर काढला. पाणी पान झाल्यावर वेड्याच्या बाबांनी सुरुवात केली.

वेड्याचे बाबा :- नमस्कार, माझे नाव रवींद्र जोशी.  आपण कोण?

जोडप्यातल्या गृहस्थाने सुरुवात केली- मी प्रकाश नेने, एव्हडच सांगायला आलो होतो की तुम्ही तुमच्या मुलाला वेळीच आवर घाला आणि समजवा, माझ्या मुलीला फूस लावतोय तो,  त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.

वेड्याचे बाबा- का$$$$य?? अहो साहेब मला जरा समजवता का काय झाले ते?

प्रकाश नेने:- मला एक फोन आला होता,  स्वतःला एक हितचिंतक म्हणवून घेत होता तो. त्याने कळवले की 'तुमची मुलगी 'संतोषवाल्या जोश्यांच्या मुलाबरोबर फिरतेय ते!!!  

वेड्याचे बाबा- एवढंच,  अजून काही बोलला नाही तुमचा तो हितचिंतक?  तुम्ही ह्या गोष्टींची खातरजमा केली का?  तुम्ही माझ्या मुलाला बघितले आहे का? तुम्ही तुमच्या मुलीशी विश्वासात घेऊन बोललात का हे? तेही ठीक आहे तुमच्या घरची गोष्ट आहे ही.  पण मला तीन मुले आहेत,  त्यातला कुठला, काही माहिती आहे का? बरं माझा कुठलाही मुलगा इतका उथळ विचारांचा नाहीय,  आणि माझी मुले माझ्यापासून काहीही लपवून ठेवत नाहीत अगदी ह्या अशा गोष्टीसुद्धा, तरीही जर का तुमच्या गोष्टीत काही सत्य असेल तर आपण दोघे मिळून सोक्षमोक्ष लावूयात, काय?  पण त्यासाठी मला नक्की काय झाले ते, तो तुमचा हितचिंतक नक्की काय म्हणाला ते सांगा.

(खरे तर प्रकाश नेने ह्याही तयारीने आली नव्हते,  त्यांना जसा फोन आला तसे ते तडक भांडायला आले होते. त्यांच्यासाठी हि गोष्टच इतकी भयावह होती की ते सारासार विचार न करताच थेट आले होते. वेड्याचे बाबाचे प्रश्न ऐकून त्यांनी विचार करायला सुरुवात केली की हा माणूस इतका शांतपणे विचार करतो आहे, झाल्या गोष्टीची खातरजमा करतो आहे आणि त्यांनी सहकार्य करायची दाखवली आहे आणि ह्यामुळे नेने साहेबानी झाली हकिकत सांगायचे ठरवले)

प्रकाश नेने:- आज सकाळी साधारण नऊच्या सुमारास मला एक फोन आला होता,  त्या संभाषणाचा सारांश सांगतो.  फोनवर  त्या माणसाने मला  संतोषवाल्या जोश्यांचा सलिल तुमच्या मुलीला फिरवतोय व त्याचे काही खरे नाही. तुमच्या मुलीची काळजी वाटते म्हणून फोन केला आहे आता तुमचे तुम्ही बघा. एवढेच बोलून त्या माणसाने फोन ठेवला. संतोषवाले जोशीचे नाव घेतले म्हणून तुमच्याकडे आधी आलो.  नाहीतर थेट पोलिसांकडे जाणार होतो. आता तुम्ही सहकार्य करा नाहीतर नाईलाजाने मी पोलिसात तक्रार देणार आहे. माझ्या मुलिची काळजी मलाच घ्येयला हवी.

वेड्याचे बाबा- ते ठीक आहे.  बरं त्या माणसाने सलिलचे नाव घेतले काय?  आपण एक काम करूयात.   तुम्ही तुमच्या मुलीला बोलवा, मी सलिलला बोलावतो आणि त्यांना आपल्यासमोर ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला सांगू, काय म्हणता?

प्रकाश नेने:- ठीक आहे. (आणि त्यांनी आपल्या मोबाईलशी काहीतरी चाळा करायला सुरुवात केली,  काही वेळाने त्यांनी कुणालातरी लवकरात लवकर आल्या घरच्या पत्त्यावर येयला सांगितले) 

(इकडे वेड्याचे बाबांनी सलिलला फोन करून  लवकरात लवकर घरी येयला सांगितले, आता त्या दोघांना येयला वेळ होता म्हणून वेड्याच्या आईने त्या दोघान्साठी खायला करण्यासाठी विचारून आत मध्ये गेली तशी त्या बाईसुद्धा वेड्याच्या आईला मदत म्हणून पाठोपाठ आतामध्ये गेल्या, इकडे  वेड्याचे बाबा आणि प्रकाश नेनेसाहेब एकमेकांशी जुजबी बोलत एकमेकांना पारखून घ्येयला लागले)

सलिल घरी पोचल्या बरोबर त्याने दारातूनच नेनेसाहेबाना 'नमस्कार नेनेकाका' म्हणून हाक दिली. आता इकडे नेनेकाका म्हणणारे कोण आले म्हणून नेन्यांनी दाराकडे बघितले असताच त्यांनी 'वेड्या तू?, तू इकडे काय करतोयस? ' म्हणून एकदम विचारले, तर सलिल म्हणाला 'काका,  मी इथेच राहतो. पण तुम्ही इकडे कसे काय? हा संवाद चालू असतानाच सलिलचे लक्ष बसलेल्या अचंबित आणि समोर काय चाललंय हे काहीच न कळणाऱ्या सगळ्या समुदायाकडे गेले आणि त्यांच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून तो एकदम बोलायचे थांबला आणि पटकन आतमध्ये पाय धुवायला आत गेला. जरा वेळाने सगळेजण सावरल्यावर नेने साहेबांनी बोलायला सुरुवात केली.

प्रकाश नेने:- जोशी साहेब हा कोण तुमचा?
वेड्याचे बाबा- हा माझा धाकटा मुलगा सलिल. आपण इतक्यावेळ ह्याच्याबद्दलच बोलत होतो.

वेड्याची (सलिलचि) ओळख पटल्यावर प्रकाश नेन्याचा चेहऱ्यावरचा इतक्यावेळचा ताण नाहीसा झाला अणी  त्यांच्या अर्धांगिनीनि त्यांच्या पूर्णं आयुष्यात पाहिला नसेल इतका नेनेसाहेबांचा चेहरा खुलला. नेनेबाइंचा सुद्धा वागणुकीत बदल झालेला वेड्याच्या बाबांच्या नजरेतून सुटला नाही.

आता चेहरा खुलायची वेळ वेड्याच्या (सलिलच्या)  बाबांची होती कारण दारातून येणारी नेन्यांची मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सखी होती.  आणि  वेड्याच्या बाबांनी आनंदाच्या भरात 'चिमणे' म्हणून सखीला हाक दिली आणि सखी वेड्याच्या बाबांना 'हाय' करत असतानाच  आपले आई बाबा वेड्याच्या घरी  दिसले आणि दारातच थबकली.

आता ह्या सगळ्या रंगमंचावरच्या पात्रांची ओळख आणि त्यांचे आपापसातले नाते संबंध क्लिअर झाल्यावर एका क्षणात सगळे वातावरण इतके बदलले की सगळा वातावरणातला ताण नाहीसा झाला, सगळे अचानक खिदळायला लागले. वेड्याच्या बाबांनी तर चक्क नेने साहेबांना टाळी दिली, आणि सखी वेड्याच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून दोन्ही दांपत्याने सखी वेड्याला बसवून त्यांना सकाळपासून घडलेल्या घटना उलगडून सांगितल्या. कोणीतरी गंमत केली होती आणि दोन कुटुंबामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला होता पण वेड्याच्या बाबांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रसंग टळला होता.

कथाकथन झाल्यावर आता काय हा प्रश्न उभा राहणार तोच संधी साधून वेड्याच्या आईने वेड्याच्या बाबांना कोपरखळी मारली,  वेड्याच्या बाबांनीसुद्धा त्यांच्या अर्धांगिनिच्या मनातले भाव ओळखून थेट नेने साहेबांना प्रश्न विचारला.

वेड्याचे बाबा- नेने साहेब, चिडणार नसाल तर एक प्रश्न विचारू?

प्रकाश नेने:- अहो परवानगी काय विचारता,  थेट प्रश्न विचारा की.  (खीः खीः)

वेड्याचे बाबा-नाही म्हणजे,  आम्ही तसे विचार करतच होतो तुमच्याकडे येयचे. कारण, तुमची सखी आम्हाला फार आवडलीय आणि सखीला आमची सून म्हणून मागणी घालायची इच्छाच होती आमची.

प्रकाश नेने:- अरे वाः!!!!!. आम्ही पण हाच विचार करत होतो की वेड्याच्या घरी जाऊन सखी साठी बोलणी करावी म्हणून कारण  वेडासुद्धा  आम्हाला पसंत आहे आम्हाला सखीसाठी. जोशीवहिनि मस्त फक्कड चहा होऊन जाऊ देत काय?

सखी- (एकदम मध्येच) बाबा तुम्ही कधी बोलला नाहीत ते?  (आवाजातला अधीरपणा जाणवल्यानंतर लाजून) नाही म्हणजे,  तुमच्या मनातले कधी माझ्याशी बोलला नाहीत म्हणून विचारले.

प्रकाश नेने:- अग सखी, मी बाप आहे तुझा. खरेतर आम्हाला शंका येयला लागली होती की चांगल्या चांगल्या स्थळांना नकार देण्याऱ्या सखीच्या मनात कोणी आहे का म्हणून. मग आम्ही तुझ्या वागणुकीवर नजर ठेवायला सुरुवात केली होती मग नंतर आम्हाला जाणवले की जेव्हा जेव्हा वेडा घरी येतो  तेव्हाची तू आणि वेडा नसतानाची तू ह्या मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. मी आणि तुझी आई तुझ्याशी बोलणारच होतो पण त्या फोनमुळे सगळे बिघडले आय मीन सुरळित झाले.

वेड्याचे बाबा- पण नेने साहेब तो फोन कुणी केला असावा बरं, त्या हितचिंतकाचा नंबर असेलच ना तुमच्या मोबाईलवर.

प्रकाश नेने:- हो आहे ना. हा घ्या (जरा वेळ मोबाईलशी चाळा करत) ९१६४८८००२७

वेड्याचे बाबा- (आश्चर्याने) काय परत सांगा?

प्रकाश नेने:-९१६४८८००२७

वेड्याचे बाबा- अहो नेने,  हा तर वेड्याचा नंबर..... वेड्या$$$$$$$$

वेड्याला ओरडायला सगळे आजूबाजूला शोधायला लागले पण तोपर्यंत वेडा आपल्या लग्नाच्या पुढच्या बोलणीची जबाबदारी दोघांच्या घरच्च्यानच्यावर सोडून आपल्या सखीला घेऊन केव्हाच पसार झाला होता........

(समाप्त)