माझ्या लग्नाची गोष्ट - भाग २

अंगावर वीज पडावी अशी तिची अवस्था झाली होती, वेडा बोलतच होता पण तिला काहिएक अक्षर कळत नव्हते. तरीसुद्धा झटकन सावरून तिने त्याचे बोलणे पूर्णं व्हायच्या आत आलेल्या बस मध्ये बसून त्याचा निरोप घेतला.... बस मध्ये सखीच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिच्या साठी तिचे सगळे जग थांबले होते आणि फक्त बस चालत होती......

(भाग - २)

सखी तिच्या घरी गेल्यानंतर वेडा आपला मस्त निवांत रमत गमत घरी गेला आणि वहिनीचे चिडवलेले कानाआड करून आपल्या कामाला लागला जणू काही घडलेच नाही......पण सखी घरी पोचल्यानंतर पटकन आपल्या खोलीत जाऊन दार का लावून बसली ते मिनुला (सखीच्या बहिणीला) कळलेच नाही. 

काही आठवड्यांनी कट्ट्यावरच्या 'अनुभवी' मंडळींना एकदम या दोघा मध्ये काय झाले या चर्चेला आणि 'हिशोबाला' ऊत आला होता, कारण वेडा आणि सखी एकमेकांकडे मुद्दामून दुर्लक्ष करत होते आणि हे वेड्याचे आणि सखीचे वागणे त्यांच्या 'गणितात आणि अनुभवात' बसणारे नव्हते ना !!!!!! तरीही मंडळींनी हार न मानता ह्या 'अजब प्रेम कहाणी' वर कॉलेजच्या इतिहासातली सगळ्यात जास्त 'रेट'नी पैजा लावल्या....

_____________________________________________________________________

आठवड्यामागून आठवडे आणि महिन्यामागून महिने गेले आणि सखी आणि वेड्याची ही आगळीवेगळी 'मैत्री' अबाधित राहिली.... आज बसस्टॉप घटनेला एक वर्ष झालं. एव्हाना अनुभवी मंडळींना पैज लावायला नवी हन्स जोडी मिळाली होती आणि ह्या दोघांसाठी लावलेल्या पैजा तर कधीच हवेत विरून गेल्या होत्या. वेड्याला वाहिनीनं सखीबद्दल एक-दोन वेळा विचारपूस केली पण वेड्याने ताकास तूर लागू दिला नव्हता.. वाहिनीने पण त वरून 'ताकभात' ओळखला होता. सखीलासुद्धा मिनुने खोदून खोदून विचारण्याचा असफल प्रयत्न केला आणि सखीनेपण तब्येतीचे कारण पुढे करून वेळ मारून नेली होती. त्यामुळे वेड्याची वहिनी आणि सखीची मिनू दोघींना परिस्थितीची थोडीफार जाणीव आली होती...

___________________________________________________________________

एके दिवशी वेडा आपल्या नित्यनियमाप्रमाणे क्लास उरकून घरी आला तर त्याला वातावरण गंभीर वाटलं, म्हणून त्याने सगळ्यात सेफ माणसाला (वाहिनीला) गमती मध्ये विचारले.

वेडा- काय गं वाहिनी, कोई मर गया क्या?

वहिनी :- चुकीचा प्रश्न विचारलायस. तुझा प्रश्न 'कोई मरनेवाला है क्या? असा असायला पाहिजे होता.

वेडा- म्हणजे???????

वाहिनी- तू सखीबरोबर काय वागला आहेस ना ते आई-बाबा, अमोल, कपिल-केतकीवहिनि (वेड्याचे कुटुंब) ह्या सगळ्यांना कळले आहे. आणि सगळे भयंकर चिडले आहेत तुझ्यावर.

वेडा- काय??? (वहिनीच्या बोलण्याचा रोख लक्षात आल्यावर आवंढा गिळत) वहिनी!!!! तुला .... आणि त्यांना कसे कळले? काय कळले? (विषयातले गांभिर्य जाणवल्यानंतर) मी काय करू आता? कपिलतर फाडून खाईल मला. ए प्लीज सांग ना वहिनी आता काय करू आता?

वाहिनी- (चिडून) मी काय सांगू तुला, मी तर सगळ्यांपेक्षा जास्त चिडलेय तुझ्यावर. अस कस करू शकतोस रे तू? तू फक्त वेडा नहियेस तू मूर्ख सुद्धा आहेस आणि ते तू तुझ्या वागण्याने सगळ्यांना पटवून दिले आहेस. हो, आम्हा सगळ्यांना महितेय आहे की तू बहिणी आणि वहिनी शिवाय मुलींशी बोलत नाहीस ते, पण हे अस वागायचे? तिचा विचार केलास का? तिला काय वाटेल ह्याचा विचार कोण करणार? ते आदित्य आणि मंगेश एका शब्दानेही काही बोलले नाहीत तुला? बेस्टफ़्रेन्ड आहेत ना तुझे ते.. का ते पण तसेच आहेत तुझ्यासारखे? ......(वाढलेला आवाज ऐकून सगळे कुटुंब हॉल मध्ये आले आणि वहिनीला सामील झाले आणि वेड्याचे लचके तोडायला लागले)

वेडा- (जवळपास १/२ तास सगळ्या कुटुंबाचा ध्यानीमनी नसताना होत असलेला हल्ला सहन न झाल्यामुळे रडवेला होऊन) सॉरी, चुकले माझे... प्लीज माफ करा मला .. माझे खरंच हे इंटेन्शन नव्हते खरंच आता मी कसे समजावू तुम्हाला आता.......

बऱ्याच वेळ वेड्याने सगळ्यांची माफी मागितल्यावर आता सगळ्यांचा चढलेला पारा आणि आवाज खाली आला.

कपिलः- वेड्या, माफी आमची नाही तर सखीची मागायला हवीयेस. तिने माफ केलं तरच आमची माफी मिळेल. ठीक आहे?

वेडा- हो.... ठीक आहे. मी तिची भेट घेतो आणि माफी मागून तिला घरी घेऊन येतो. चालेल का?

कापिला- (गालातल्या गालात हसत) त्याची गरज नाहीये. ति आत्ता घरी येतेय आम्हा सगळ्यांना भेटायला तेव्हाच तुझा माफीनामा जाहीर करू.

वेडा- काय!!!!!!!?, ती?, इथे? कधी? कशी? कशाला?

तेवढ्यात दारात गाडीचा आवाज आला आणि जरावेळाने सखीने दारातूनच वेडा सोडून सगळ्यांना सगळ्यांच्या वयाचा मान राखत अभिवादन केलं (म्हणजे हाय, नमस्कार वगैरे वगैरे). वेड्याला फक्त एक डोळ्यांच्या कडेने एक कटाक्ष मिळाला. जरा हालहवालिचे बोलून सगळ्या बायका/ मुली आत खाण्यापिण्याचे बघायला आत गेल्या तेव्हाच वेड्याने संधी साधून बाबांना अणी भावांना सांगितले की मी नंतर एकट्यात माफी मागतो कारण आत्ता जरा मला सावरायला वेळ हवाय. बाबांनी अणी भावांनी सुद्धा मोठ्या मनाने झाले तेवढे बास झाले आणि वेड्याला एक संधी द्यावी म्हणून त्याच्या विनंतीला मान दिला.

गरमागरम 'कान्दापोहे' आणि कॉफी पिताना वेड्याला समजले की त्यादिवशी दुपारी वहिनी आणि केतकीवहिनी तुळशीबागेत खरेदीच्या बहाण्याने भटकायला गेले असताना सखी भेटली होती आणि वहिनीने परत फिरकली का नाही म्हणून जाब विचारले असता दोघींना वेड्याचे प्रताप कळले होते. तेव्हाच दोघी वाहिनीने परस्पर सखीला संध्याकाळी घरी बोलवले, सखीने वेड्याचे कारण देत नकार देताच त्यांनी तू माझी मैत्रीण नाही का? मैत्रिणीच्या घरी येणार नाहीस का? अश्या प्रश्नांनी सखीला निरुत्तर करून तिचा होकार मिळवला होता.....

या वेळेला सखी निघताना तिला सोडायला जा हे वेड्याला सांगायला लागले नाही.. लगोलग तो तिच्या मागेमागे चप्पल घालून निघाला. जिन्यातून खाली उतरतानाच सखी आणि वेड्याला घरातून सगळ्यांचा हसतानाचा आवाज मात्र ऐकू आला. आता गाडीपाशी पोचल्यावर आता काय बोलायचे या विचाराने वेड्याची छाती धडधडायला लागली. 

या गोष्टीचा सखीला अंदाज होताच म्हणून तिनेच पुढाकार  घेऊन म्हणाली "अरे मी नवीन गाडी घेतलेली तुला माहीत आहे का? चल तुला चक्कर मारून आणते" आणि त्याच्या उत्तराची वाट न बघताच तिने गाडी सुरू केली. ठीक आहे चल म्हणून वेडा तिच्या मागे बसून 'चक्कर' मारायला निघाला. आताशा त्याला प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली होती की सखीमध्ये नक्कीच काहीतरी वेगळे आहे आणि तिच्याशी उगाचच आपण चुकीचे वागलो. जरावेळ डेक्कनवर फिरल्यावर सगळे धैर्य एकवटून तो पहिल्यांदा तिच्याशी अडखळत का होईना स्वतःहून बोलला "सखी, आपण एस एम जोशी पुलावर जाऊयात". काही न बोलता तिने फक्त उत्तरादाखल गाडी एस एम जोशी पुलावर वळवली.

पुलावर पोचल्यानंतर २ मिनिटे वेडा माफीसाठी शब्द वाक्य रचना करत असतानाच ति म्हणाली "वेड्या, सॉरी म्हणायची गरज नाहीये रे. मला माहीत आहे तुला तुझी चुकी कळलीय ते. तेवढंच बास आहे" हे वाक्य ऐकल्याबरोबर त्याने फक्त अचंबित होऊन तोंडात बोटे घालायची बाकी होती. मग त्यानेच हात पुढे करून विचारले "फ़्रेंड्स?" अन तिने मस्त झकास हसून त्याच्याशी हात मिळवला आणि म्हणाली "तू खरंच वेडा आहेस रे!!!!"

_________________________________________________________________

आता दुसऱ्यादिवशी अचंब्याने तोंडात बोटे घालायची पाळी सगळ्या अनुभवी मंडळींची होती कारण दुसऱ्यादिवशी सखी कॉलेजमध्ये आल्या आल्या वेड्याने मस्त एका गेटवरून "हाय सखी" म्हणून साद दिली होती ती दुसऱ्या गेटवर ऐकू गेली होती. भानावर येताच अनुभवी मंडळींची जुने पुराणे पैजेचे हिशोब करण्यात जुंपली आणि गरज नसताना १-२ तासात तर पूर्णं कॉलेजमध्ये सखी वेड्याची बातमी वणव्यासारखी पसरली आणि नंतरसुध्धा पूर्णं दिवसभर 'सखी वेडा' हाच त्यांच्या चर्चेचा विषय होता. एक नवीनंच वातावरण तयार झाले होते.......

एस पी कॉलेजबाहेरच पी. एम. टी ची बस बंद पडली होती आणि ती बघून सखीच्या मनात एक विचार आला आणि ती खुदकन हसली तो विचार होता की तिच्यासाठी एक वर्षापूर्वी जग थांबले होते आणि बस चालत होती .......... आता जग चालू झालंय आणि बस बंद पडली आहे.......

(उर्वरित पुढील भागात)