ठकी

पाळीव प्राण्यांबाबत आमचे धोरण असे ठरलेले नव्हते. कोल्हापुरात कुणी पाळीव प्राणी असल्याचे आठवत नाही. मिरजेला आमच्याकडे कोणी पाळीव प्राणी नव्हता हे नक्की. अप्पांचे मित्र मधूकाका एक भक्कम 'टॉमी' बाळगून होते. पण त्याच्याशी तसे फारसे सख्य झाले नाही.

पनवेलीस एक मांजर होते, पण ते तसे सामायिक मालकीचे होते. म्हणजे आमच्या घरी दूध फस्तावून आणि आईने फेकलेले लाटणे चुकवून ते शेजारी बापटांकडे तोच प्रयोग करायला जाई.

पाचोऱ्याला आम्ही एक "टिपू" नामक कुत्रा पाळला होता, पण तोही 'सामायिक' मालकीचाच जास्त होता. फक्त त्याच्या नावाची एक ऍल्युमिनियमची थाळी मात्र आम्ही वेगळी ठेवली होती. हा टिपू जरा भैकूच होता. सतत आपल्याच तंद्रीत खाली मान घालून हिंडत असे.

पाचोऱ्याला आमच्या घरासमोरच सिंधी कॉलनी नावाची गलिच्छ वस्ती होती. 'वड्डी सांई', 'मोई चंद्रो' करत गलेलठ्ठ शेठे आणि शेठाण्या रस्त्याने घरंगळत असत. एकदा एक असाच धोतर नेसलेला लठ्ठोबा रस्त्याने डुलत चालला होता. त्याच्यामागून टिपूजी आपल्या तंद्रीत येत होते. समोर बघायचे टिपूचे भान सुटले आणि त्याने थेट त्या सिंध्याच्या दोन पायांमध्ये धोतरात मुसंडी मारली. अचानक झालेल्या या प्रकाराने कोण जास्त घाबरले कोण जाणे.

स्वतःला त्या बिकट प्रसंगातून सोडवून घेताना टिपूने त्या सिंध्याचे धोतर मात्र सोडवून ठेवले.

पुढचे टप्पे फारच त्रोटक होते. त्यात बराच काळ आमचे चौकोनी कुटुंब तीन ठिकाणी विभागले गेले. त्यामुळे पाळीव प्राणी हा विषयच मागे पडला.

शेवटी पुण्याला परत एकदाचा कुटुंबाचा चौकोन जमला आणि या विषयाने उचल खाल्ली.

आम्ही दोन मांजरीची पिले मिळवली. दोन्ही बहिणी-बहिणी होत्या. एक जरा अंगाने बोजड आणि रंगाने काळी होती. तिचे 'काळी' असे वर्णभेद पाळणारे नामकरण झाले. दुसरी जरा आबदार होती. तिच्या अंगावर पांढर्‍या, पिवळ्या, तपकिरी अशा रंगांची मुक्त उधळण होती. तिच्या डोक्यावर एक काळा तुकडा झुलुपासारखा शोभत होता. तिचे 'ठकी' असे बाळबोध नामकरण झाले.

दिसामासाने दोघी वाढू लागल्या तसे त्यांचे वेगवेगळे स्वभाव उमलून येऊ लागले. काळी ही अंगाने सुटलेल्या आणि अजिबात धीर नसणार्‍या एखाद्या मीनाकाकूंसारखी होती. दूध मागायचे असले की ती क्षणाचीही उसंत न घेता आपला वाभरट बाजा वाजवीत बसे. ठकी मात्र आपण कुणीतरी 'वेगळे' आहोत याची सतत जाणीव बाळगून असे, एखाद्या महाराणीसारखी. दूध किंवा खाणे मागताना ती एक "मियांव" फेके आणि शांत बसून राही. आपले कुणीही ऐकले नाही ह्याची खात्री झाल्यावर(च) पुढचे "मियांव". आता काळीच्या भोंग्यामुळे ठकीला तोंड उघडायची गरजही पडत नसे म्हणा.

अर्थात दोघींमध्ये साम्यही होतेच. त्या दोघींबद्दल संपूर्ण अनास्था बाळगणारी व्यक्ती म्हणजे कुटुंबप्रमुख या दोघीही अदरेखून त्याचीपाठराखण करीत असत. तो दाढी करायला टेबलावर बसला की काळी त्याच्या मांडीवर बसायला बघे. आणि ठकी तसे करण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट होईल अशा हालचाली करी. तो जेवायला बसला की तर दोघीही रिद्धी-सिद्धीसारख्या त्याच्या खुर्चीच्य दोन पायांपाशी ठाण मांडत. काळीचा बाजा सुरू होई. "छ्या! ह्या मांजरांचा नुसता त्रास आहे, सोडूनच दिले पाहिजे कुठेतरी" हे वारंवार ऐकल्याशिवाय त्या दोघींना दूध गोड लागत नसावे. आणि त्यातली धमकी पोकळ आहे हे त्यांना चोख माहीत होते. कुटुंब संसदेत आई आणि आम्ही दोघे भाऊ असे बहुमत आमच्याकडे होते. "हं घ्या, घ्या" असे अप्पांनी वैतागून घातलेले पोळीचे तुकडेच त्यांना अंगी लागत असावेत बहुधा.

एकंदरीत ठकीला पोच-समज चांगली होती याची प्रचीती येऊ लागली होती. तिचा खाण्यापिण्यातला चोखंदळपणा वाढू लागला होता. भूक लागली असली म्हणून काय झाले? पोळीचे सुके तुकडे चावायचे? अजिबात नाही. त्यावर दूध पडेपर्यंत ती शांत बसून राही. नाहीच पडले तर ठाय लयीत "मियांव".

त्या दोघींना आम्ही सुक्या मासळीचा खुराक चालू केल्यावर तर झालेच. मांजरांचे कान आधीच तीक्ष्ण. त्यात मासळी-प्रेमाची भर. आमचे घर तसे विचित्र होते. चार खोल्या, आणि त्या चार मजल्यांवर. घर डोंगर उतारावर होते. मागच्या बाजूने आले तर स्वैपाकघर तळमजल्यावर. पुढच्या बाजूने आले तर दिवाणखाना. आणि त्या दोन्हींवर एक एक झोपण्याची खोली. आणी त्या दोन खोल्यांवर एक एक गच्ची.

पण मासळीचा डबा खुडबुडवण्याचा अवकाश, अष्टदिशांत कुठे असतील तेथून दोघी झेपा टाकत येत.

लवकरच आम्हाला घर बदलायची पाळी आली आणि सर्व परिचितांनी आपल्या काळ्या जिभांचा लपलपाट सुरू केला. "मांजरं घराला धार्जिणी असतात, माणसांना नव्हे" "घर बदलायच्या वेळेला मांजरं जातील पळून, आणि तुमच्या जागी जे येतील रहायला त्यांच्याकडे परत घरोबा करतील" इ इ

सामानाची बांधाबांध सुरू झाल्यावर दोघींना काहीतरी वेगळे होते आहे याची जाणीव झालीच. पण आल्या खर्‍या मुकाट आमच्यासोबत.

नवीन घर तिसर्‍या मजल्यावर होते. आणि घराला त्याच पातळीवर एक मोठीच्या मोठी गच्ची होती. या दोघींना गच्ची आवडली. पण तीन मजले खाली जाणे हे शिकायला त्यांना वेळ लागला. अखेर त्यांचे नैसर्गिक विधी साफ करून करून सगळे कंटाळलो आणि वर्तमानपत्राच्या सुरळीचे फटके देऊन त्यांना "टॉयलेट ट्रेन" केले. पण त्या दोघीही आपापली नाराजी दर्शवतच खाली जात आणि विधी उरकल्या उरकल्या परत वर धाव घेत.

इथले घर सलग समपातळीत होते याचा मात्र दोघींना ओसंडणारा आनंद झाला. त्यात त्यांना खेळायला आम्ही काचेच्या गोट्या आणल्या. मग तर काय? हॉकी नाहीतर फुटबॉल खेळल्याच्या आवेशात दोघीही त्या गोट्या ढकलत तासंतास खेळत बसत. गोट्या कोपर्‍यात गेल्या तर आपणच पंजे मारमारून त्या बाहेर काढत आणि परत सुरू. या खेळाची सुरुवात रात्री १० ला होत असल्याने कुटुंबप्रमुख वैतागतो हा त्यांना बोनस वाटत असावा.

आपल्याला ही माणसे पोटाला घालतात, त्यामुळे त्यांचे मनोरंजन करण्यासाठी हा खुळचट खेळ आपण करीत आहोत याचे त्यांचे भान कधीच सुटले नाही. आम्ही कोणी लक्ष देऊन बघतो आहोत की नाही यावर त्यांचे डोळ्यांच्या कोपर्‍यातून सजग लक्ष असे. आम्ही जर आपापल्या कामांना लागलो तर खेळ लगेच समाप्त होत असे.

आणि एक दिवस काळी नाहीशी झाली. तिचा शोध घेणार कुठे आणि कसा?

कळेना.

ठकी एकटीच उरली.

एक दिवस ठकी आमच्या गच्चीतून कशी कुणास ठाऊक, खाली पडली. मी पुस्तक वाचत बसलो होतो. काहीतरी आवाज झाला. काय म्हणून बघायला गच्चीत गेलो तर काही दिसले नाही. अक्षरशः दोनच मिनिटांत ठकीने दाराला धडका मारल्या. अत्यंत घाबरलेली, चिखलराड झालेली ठकी, मी दार उघडताच थेट माझ्या छातीवर झेपावली. मी बावरून मागे झालो, पण तिने माझा शर्ट गच्च धरून ठेवला होता. शेवटी तिला हातांच्या पाळण्यावर जोजवत मी बसलो. तोंड खाली घालून नाक माझ्या दंडाला घासत "चुकले, आता पुन्हा नाही करणार असं" हे तिने कबूल करून टाकले.

मांजराला नऊ आयुष्ये असतात म्हणतात. त्यातले एक कमी झालेले दिसत होते.

आता ठकीला दाणे खाण्याची चटक लागली. इतकी, की सुकी मासळी आणि दाणे यांत डावेउजवे काही उरले नाही.

अर्थात यात तिचा फायदाच फायदा होता. सुकी मासळी ही निव्वळ तिच्याकरताच येत असे. (मी एकदा सुकट चटणी करायचा बेत केल्यावर "बाहेर चूल मांड नि काय ते कर" असे मातोश्रींकडून तत्पर उत्तर मिळाले होते). त्यामुळे तो डबा दिवसातून दोन वेळेसच उघडला जाई. पण दाणे ही सगळ्यांनी खाण्याची गोष्ट. आणि स्वैपाकातही लागणारी. प्रत्येक डबा-उघडणीच्या मुहूर्ताला ठकीला चार दाण्यांची का होईना, खंडणी मिळेच. मग परत आलखट पालखट मांडी घालून डुलक्या मारायला ती तयार होई.

हळू हळू ती जड पावलांनी चालू लागली. आमचे हे घर सोडायची वेळही जवळ आली. आणि घर सोडायच्या आदल्या दिवशी न्हाणीघराच्या माळ्यावर तिने तीन पिल्लांना जन्म दिला.

नुकत्याच जन्मलेल्या पिलांबद्दल मांजर फार हळवी असते, प्रसंगी हिंस्त्र होते हे सगळे तिने खोटे ठरवले. एक दिवसाच्या पिलांना आम्ही परडीत घेतले तेव्हा ती शांतपणे बघत बसली. आणि नंतर उडी मारून आमच्याबरोबर आली.

नवीन घरात पिलांचे डोळे उघडले. डुगडुगत त्या मुठीएवढ्या गोळ्यांची उभे रहाण्याची तालीम सुरू झाली. मग "बाळ उभं राहिलं  आम्ही नाही पाहिलं" जमल्यावर "चाल चाल बाळा, तुझ्या पायात वाळा" हेही जमले. ठकी दिवसातून अगणित वेळेला त्यांना चाटून स्वच्छ ठेवी, आणि खाण्यापिण्याच्या वेळेला शिस्त लावण्यासाठी चार रट्टेही ठेवून देई.

एक तांबड्या रंगाची म्हणून तांबू, एक मावशीसारखी काळ्या रंगाची म्हणून काळी आणि तिसरी अतीव देखणी म्हणून सुंदरी. पहिल्या दोघांचे दत्तकाचे आधीच ठरले होते. त्याप्रमाणे भावंडांची ताटातूट करण्यात आली.

आता मायलेकी आमच्याकडे नांदू लागल्या.

सुंदरी म्हणजे पांढर्‍या कापसाच्या गोळ्यावर मंद तांबूस रंगाचे डाग, पट्टे, तुकडे उमटवत जावेत तशी होती. सावरीच्या कापसासारखे केस. त्यांना हात लावला तरी माणूस अभावितपणे आपला हात स्वच्छ आहे का हे बघे. आणि चालण्यातला डौल थेट 'वाघाची मावशी' या बिरुदाला साजेसा. तसे ठकीचे चालणेही डौलदार होते. पण ठकीमध्ये टॉमबॉय आणि महाराणी यांचे अतर्क्य मिश्रण होते. तिच्या अर्ध्या कपाळावरच्या काळ्या झुलुपाने टॉमबॉय साजरा दिसत असे. त्यामुळे आबदार चालताना मधूनच तिने डोळा घातल्याचा भास होई.

सुंदरी महाराणी आणि महाराणीच होती याबद्दल तिच्या मनात अजिबात शंका नव्हती. आणि आमच्या मनात असलीच तर ती ताबडतोब नाहीशी व्हावी असे तिचे वागणे असे.

माणसे आपल्याला खाऊ पिऊ घालतात, झोपायला जागा पुरवतात एवढे तिला मान्य होते. पण म्हणून त्यांनी आपल्याला सारखे गोंजारावे, कुरवाळावे, उचलून घ्यावे हे तिला मान्य नसे. त्यातूनही आम्ही कुणी असले काय केले तर ती सहनही करून घेई एक वेळ. पण बाहेरच्या माणसांनी असले काही करावे हे तिला अजिबातच सहन होत नसे. त्यामुळे पाहुणे आले रे आले की ती थेट नाहीशी होई आणि पाहुणे गेल्यावरच उगवे.

ठकीचे असे नव्हते. एक तर चार माणसांना धरून रहाण्याची तिला आवड होती. आणि खाण्यापिण्यातला तिचा चोखंदळपणाही वाढत चालला होता. तो निभावायला माणसांचा सहवास जरूरीचा होता.

भाजलेल्या दाण्यांची आवड आता उत्क्रांत होत चालली होती. चिवड्यातले दाणे ही पुढची पायरी. ते भाजलेले/तळलेले असतात.

मग त्यातही पंक्तिप्रपंच आला. चिवड्याला लसणीची फोडणी हवी.... जर कढीलिंबाची फोडणी असेल तर ते दाणे पसंतीस येत नसत.

पापडात पोह्यांचा पापड (भाजलेला) पास, उडदाचा नापास.

उकडलेल्या बटाटयांची साले आणि अंड्याची टरफले प्रिय.

पोळी घडीची आणि घरी केलेलीच हवी.

आता पाहुणे आले की ही माणसे चिवडा, वेफर्स असले चवीपरीचे काय काय खातात हे तिला कळले होते. त्यामुळे त्यासाठी त्यांनी केलेले कोडकौतुक सहन केले पाहिजे हेही तिने स्वीकारले होते.

पाहुणे येण्याची वर्दी लागली की सुंदरी घरात असेल तिथून बाहेर आणि ठकी घराबाहेर असेल तिथून दिवाणखान्यात अशा दोन शर्यती ताबडतोब सुरू होत.

ठकीला अर्थातच आमच्या बोलण्यातले काही कळत नसे. पण जगातल्या यच्चयावत गंमती आपण झोपल्यावरच मोठी माणसे पार पाडतात याची ठाम खात्री असलेल्या लहान मुलाने झोप गरगरून आलेली असतानाही डोळे फाकवत जागे रहाण्याचा प्रयत्न करावा तसे ती आमच्या खुर्च्यांपाशी डुलक्या घेत बसून राही. काहीही कुरकुरल्याचा आवाज आला की एक "मियांव" फेकून प्रतिसादाची सोशिकपणे वाट पहात बसे.

सुंदरीला आता आपल्या सौंदर्याची जाणीव होत चालली होती. आणि प्रत्येक सौंदर्याला एक काजळबोट असते तसे तिच्या सौंदर्याला आप्पलपोटेपणाचा शाप होता. मी-मला-माझे यावाचून तिला काहीच सुचत नसे. खाण्या-पिण्याच्या वेळेला तर ते चांगलेच जाणवे. प्रथम आम्ही दोघींना एकत्रच वाटीभर सुकी मासळी भात पसरल्यासारखी घालत असू. पण दोघींनी दोन बाजूंनी खाण्यापेक्षा सुंदरीने हळूहळू निम्मा-अर्धा भाग आपल्या अंगाखाली घेऊन उरलेल्या भागात तोंड घालणे सुरू केले.

मुलीला रीत लावायला हवी म्हणून ठकीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. दोन फटके ठेवून बघितले. पण सुंदरीच्या वाढत्या वयाने आणि ताकदीने तिला कळले की आता मोती नाकापेक्षा जड झालेला आहे. मग तिने दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आम्हीही त्या दोघींचे खाणेपिणे वेगवेगळ्या ताटल्यांत ठेवणे सुरू केले.

आता सुंदरीचा ताठा फारच वाढला. अगदी आमच्यापैकी कुणी उचलून घेतले तरीही ती तिसर्‍या मिनिटाला उडी मारून शेपटीचा झेंडा फलकारत तोर्‍यात निघून जाई. ठकी मात्र आम्हांला धरून धरून असे. विशेषतः आमच्या जेवणाच्या वेळेला सोबत करणे ही तिने आपली जबाबदारी मानून ठेवली होती.

त्या काळात कुटुंबातल्या चार जणांच्या जेवणाच्या चार वेळा झाल्या होत्या. कधी तिपारी, कधी अपरात्री. पण प्रत्येक वेळेला ताट घेतल्याचा आवाज ऐकून ठकी बिनचूक हजर होई आणि पायाशी बसून राही. तिच्याकडे लक्ष न देता मुकाट जेवत बसले तर फक्त ताठ उभे राहून पुढच्या दोन्ही पंजांच्या गाद्यांनी जेवणार्‍याचा मांडीला नाजूक स्पर्श करी. किती नाजूक? नवजात अर्भकाचा मुका घ्यावा तितका. बरे तिला भूक असे असेही नाही. पण जेवणार्‍याबरोबर एक पोळीचा तुकडा आपणही मोडला पाहिजे हे तप तिने ठरवून पाळले.

जेवण झाल्याबरोबर ती लगेच स्वयंपाकघराच्या माळ्यावर रवाना होई. तिची जाण्याची पद्धतही विलोभनीय असे. जमिनीवरून एक उसळी घेऊन ती खिडकीच्या जाळीला हल्लक स्पर्श केला न केला असे करून थेट माळा गाठे.

सुंदरीचा नखरा आता समजण्यापलिकडे गेला होता. 'असते एकेकाचे नशीब फुटके' अशी एकमेकांची समजूत काढत आम्ही आणि ठकीने हे वास्तव स्वीकारले.

परत घर बदलण्याची वेळ आली. आता आम्ही स्वतःच्या घरी, तळेगावला, चाललो होतो.

सामान भरण्याच्या दिवशी दोघीही गायब होत्या. त्यांना सादवायला आम्ही धूर्तपणे सुक्या मासळीचा डबा वेगळा ठेवला होता. सगळे सामान ट्रकमध्ये भरल्यावर तो डबा डमरूसारखा वाजवून मायलेकींना बोलावले. ठकी बिनबोभाट आली, पण सुंदरीने बोचकारले.

तळेगावला पोचल्यावर सुंदरी सुरुवातीला बिथरलीच. एक कपाट पाहून तिने त्याखालीच मुक्काम ठोकला. आपली राहती जागा बदलण्याचा अक्षम्य अपराध केलेल्या या माणसांना माफ करण्याची तिची बिलकुल तयारी नव्हती. खाणे-पिणे करून ती परत आपल्या कपाटाखाली शिरे.

ठकीने हे सर्व समजुतीने घेतले. एक मांजर म्हणून आपण घराला धार्जिणे आहोत, माणसांना नव्हे, हे खरे असले तरी ही माणसे वाईट नाहीत, त्यांच्याही काही अडचणी असतील म्हणूनच आपल्याला असे घरोघर भटकावे लागत असेल, अशी स्वतःची समजूत काढून ती परत आमच्यात आली.

सुंदरीनेही माघार घेतली, पण नखरे करतच.

इथे दोघींना एक नवीनच साधन मिळाले - पक्ष्यांची शिकार. आमच्या घरालगत एक चाफ्याचे झाड सरळसोट वाढले होते. त्यावर निरनिराळे पक्षी येत. शिकार करण्याकरता त्या दोघी ज्या ज्या हालचाली करत त्या बघताना कुठेतरी आपली आदिम शिकारी संस्कृतीशी नाळ जोडली जातेय असा साक्षात्कार आम्हांला होऊ लागला.

घरातल्या माणसांची दिनचर्या बदलली. कुटुंबप्रमुख नोकरीनिमित्त (बदली होऊन) शंभर किलोमीटर दूर गेला. मी पुण्यात राहिलो. भाऊ पुणे-तळेगाव जाऱ्ये करत राहिला.

माझे येणे अनिश्चित होत गेले. पण कधीही आलो (अपरात्रीच येणे होई बहुतेक) तरी ठकी स्वागताला हजर असे. सुंदरी मात्र नखरा सोडायला तयार नव्हती.

मी हातातला जमलेला डाव उधळून उपजीविकेचा तिसराच मार्ग स्वीकारला होता. हे सरळ मनाच्या माझ्या कुटुंबियांना पचणे जड गेले.

अवघडलेपणा आला.

माझे येणे अजूनच तुरळक झाले.

दिवाळीची गोष्ट. घरी गेलो. मी घातलेल्या उडीत प्रवाहाचा थांग लागत नव्हता. दम कोंडून घुसमटायला होत होते.

घर गाठले. ठकीचा पत्ता नव्हता. सुंदरी म्यांवम्यांवाट करून जेवण वसूल करून गेली.

दिवाळीची अशी काही विशेष तयारी नव्हती. पण बाहेर फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा कडकडाट होता.

हाती रमची एक बाटली लागली. अंधार्‍या डोहात कसे तरावे याचा विचार करीत मी ती निम्मी केली. फटाक्यांनी कान किटले. झोपलो.

सकाळी आईने हलवून उठवले. डोके तिरतिरत होते.

तिची जिवणी थरथरत होती. हे अशुभसूचक असल्याचे मला आतवर पोचले. प्रसंगी पोलादाहून कठोर झालेल्या या बाईने कसेबसे एकच वाक्य उच्चारले, "ठकी गेली. तिला माती द्यायला ये!"

माझ्या (अजूनही तिरतिरणार्‍या) डोक्यात ब्रम्हांड भिरभिरले.

संताप दाटून आला.

कुणावर, कोण जाणे?

आमच्या घराच्या मागच्या रस्त्यावर ठकीला विषारी साप चावला होता. आणि रात्रीत कधीतरी तिने आमच्यापासून वीस फुटांवर प्राण सोडले.

काय झाले असेल?

तिने कळवळून आम्हांला साद घातली असेल का?

'आपली माणसे' आहेत, ती आता नक्की आपल्याला यातून सोडवतील, या आशेवर तो भाबडा जीव खुरडत असेल का?

अंगात भिनत जाणारे विष या आशेला चिरडून टाकत असेल का?

का, आपण या हाका दुर्लक्षित करतो?

का स्वतःच विणलेल्या तकलुपी जाळ्यात गुंतत जातो?

हा फटाक्यांचा कडकडाट, हे मद्यपानाने भिरंगलेले डोके, का? का??

स्वतःवरच घाव घातल्याच्या आवेशात मी खड्डा खणला.

आई ओठ चावून उभी होती. तिच्या डोळ्यांत आयुष्यात पहिल्यांदा अश्रू पाहिले.

त्यानंतर दिवाळी कधी साजरी करावीशी वाटली नाही.