पार्क

दो बाजूंस वेटाळून बसलेला खडबडीत डांबरी रस्ता. कुंपणाच्या आत नीरस, शुष्क हिरवट रंग मिरवणाऱ्या झाडाझुडुपांनी माजवलेली दंगल. भकास भावना पूर्णत्वास नेण्यासाठी आत पसरलेली रेती आणि त्यावर खोचलेली सिमेंटची बाके. रंग उडालेल्या लाकडाची आणि गंज चढलेल्या लोखंडाची खेळसाधने. झोपाळा वगैरे.

त्याला सर्व जन पार्क म्हणत.

वेळ संध्याकाळची. अजून एक हजेरी लावून सूर्य घरी पळत असलेला.

जरा लौकर घरी पळून आलेले नवरेलोक. शाळेच्या घोकंपट्टीतून सुटून आलेले बच्चेलोक. नोकरी करून आलेल्या, मरगळलेल्या अशा निम्म्या, आणि कणीक-भाज्या-भात-कुकर-गॅस या आणि अशा विवंचनांमधून आलेल्या निम्म्या, अशा स्त्रिया. (एका प्राथमिक पाहणीनुसार या गावातील शेकडा ५० टक्के मध्यमवर्गीय स्त्रिया नोकरी करतात. पाहणी कुणी केले हे गुप्त असून ती नावे उघड झाल्यास त्यांना सरकारी पुरस्कार देऊन बिघडवण्यात येईल अशी भीती आहे).

या सगळ्या घोळक्यांतून प्रत्येकी एक नमुना उचलून तयार केलेला त्रिकोनी/चौकोनी कुटुंब नावाचा माल. रूप, रंग, जात, गाव, नाव या बदलत्या घटकांमुळे किंमतही बदलती.

पार्कच्या बाहेर भेळेच्या गाड्या.

कांदा-लिंबू यांनी दरवळणारी, "भय्या, जरा तिखट कम" असे अस्सल मराठमोळ्या भेळविक्याला सांगून घेतलेली भेळ. तरीही तिखट लागलीच तर अमूल आईस्क्रीम आहेच.

सर्व बाजूंनी खुरटलेल्या जीवनवेलीस भेळ, बागेत फिरायला जाणे इ गोष्टींचे खतपाणी घालून वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न.

सगळेच खुरटलेले.

नोकरी, फ्लॅट, त्याचे हप्ते, वाहन, त्याचे हप्ते, कन्व्हेयन्स अलाउन्स, त्यासाठीची खरीखोटी बिले, शाळेसाठी देणगी, मुलांचे (आणि हो, मुलींचेही) उच्च शिक्षण, त्यासाठीचा खर्च, त्यांची नोकरी, त्यांची लग्ने, इ इ इ.

उंबरातले किडे मकोडे उंबरी करिती लीला....

आत खुरटल्या झुडुपांना विटका माळी गंजक्या झारीने पाणी घालतो.