मुलाच्या वाढदिवशी...

सविता मल्टिनॅशनल कंपनीत फायनान्स मॅनेजर होती. कडक शिस्त, वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर तिनी जवळ जवळ सगळ्याच आघाड्यांवर यश संपादन केलं होतं. रघूनं तिला घटस्फोट दिल्यावर दोन्ही मुलांची आलेली जवाबदारी आणि स्वतःचं करीअर या दोन्ही गोष्टी सांभाळून एक एक पायरी चढत ती आता मॅनेजर पोस्टला आली होती. शारिरीक वय चाळीशीच्या उत्तरार्धातील असलं तरी स्वतःचं व्यक्तिमत्व तिनी तिच्या व्यवसायाला अनुसरून अतिशय उत्तमरित्या मेंटेन केलं होतं. गौरीची आई या वयातही गौरीपेक्षा सुंदर, स्मार्ट आणि डॅशिंग दिसते असं गौरीच्या अनेक मित्रांचं मत होतं. अमितच्या मैत्रिणी देखील त्याच्या घरी जायच्या आधी आपण कसे दिसतो आहोत, सविता काकूला आवडेल ना हा ड्रेस, अमुक मॅचिंग बरोबर दिसतंय का असा विचार करून मगच आत शिरायच्या. सविताकडून त्या अनेक वेळा पर्सनालिटी डेव्हलप कशी करायची, याबद्दल टिप्स घ्यायच्या. सविता सुद्धा अमित आणि गौरीच्या मित्रमैत्रीणिंमध्ये त्यांच्यातलीच एक असल्याप्रमाणे मिळून मिसळून वागायची. त्यांच्या पार्टीजमध्ये सामील व्हायची.
त्या दिवशी अमितचा वाढदिवस होता. त्याला आणि गौरीला ग्रेट सरप्राईझ द्यायचं म्हणून सविता आज ऑफिसातून हाफ डे आली होती. चांगला तीन मजली मिक्स फ्रूट केक रिबन्स अँड बलून्स मधून तिनी ऑर्डर केला होता. शिवाय बीअर, शॅंपेन, चिकन आणि फिश स्टार्टर्स, पिझाज आणि मेक्सिकन डिनर अशा एकाहून एक सरस गोष्टींची व्यवस्था तिनी जातीनी केली होती. घराची सजावट तर काही बघायलाच नको. तिच्या घराचं इंटिरिअरच असं काही होतं की खरं तर जास्त काही सजावटीची आवश्यकताच नव्हती. संपूर्ण फ्लॅटला एका फाईव्ह स्टार बॅंक्वेट हॉलचं स्वरूप आलं होतं. आज मला यायला उशीर होणार आहे असं मुद्दामच मुलांना सांगून आणि लाईटस ऑफ करून सविता बसली होती.

थोड्याच वेळात दार उघडून अमित, गौरी आणि त्यांचे मित्रमैत्रिणी आले. बंद दिवे पाहून अमित गौरीला म्हणाला, ''शिट यार गौरी. हाऊ सिली शी इज. लाईटस का ऑफ करते ही राधाबाई काम झाल्यावर? किती वेळा सांगितलं मी मॉमला. काढून टाक तिला. पण तिनी ऐकलंय का कधी आपलं? छे. नॉनसेन्स आहे यार. '' आईवर डाफरतच त्यानी सटासट हॉलमधले दिवे लावले. उजेड होताच समोर आई उभी होती. ती मोठ्यानी म्हणाली, ''सरप्राईझ गाईज. मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे टु माय डिअरेस्ट सन. कशी वाटली अरेंजमेंट? '' सगळा सरंजाम पाहून अमित आणि गौरीचे मित्रमैत्रीणी अवाक झाले. गौरीचा एक मित्र रवी स्वतःशीच पुटपुटत होता, ''माय गुडनेस. मॅम, काय सॉलीड आहात तुम्ही. आम्हा मुलांनासुद्धा अशी अरेंजमेंट करणं शक्यं झालं नसतं. सिरियसली अमित, युर मॉम इज सिंपली ग्रेट. '' अमितची मैत्रीण वैदेही आनंदानी बेहोश होऊन म्हणाली, ''तुम्ही किती सुंदर दिसताय या मिडिमध्ये मॅम. तुमचा कलर चॉईस, फिटिंग अँड ऑल, जस्ट रॉक्स यार. मला दत्तक घ्या ना मॅम तुम्ही. कायमचं नाही पण निदान दोन तीन वर्ष तरी तुमच्याकडे ठेवून घ्या. आय जस्ट वॉनं बी लाईक यू. ''

सविता अमित आणि गौरीकडे आशेनी बघत होती. पण त्या दोघांची काहीच प्रतिक्रिया नाही. सविताला थोडं वाईट वाटलं पण ते चेहऱ्यावर दिसू न देता ती म्हणाली, ''सो माय सन, कशी वाटली अरेंजमेंट? आवडली का? काही कमी वाटतंय का? काय गं गौरी तुला कसं वाटलं? एखादी गोष्टं मॅच होत नसेल तर सांग हं. आपण काढून टाकू. '' गौरी नाराजीच्या सुरात म्हणाली, ''टू टेल यु दं फॅक्ट मॉम, एकच गोष्ट मॅच होत नाहीये. ती म्हणजे तू. '' सविताच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तरीही सगळा अपमान सहन करून ती म्हणाली, ''का गं? हा ड्रेस चांगला नाही का? दुसरीपण मिडी आहे. आय थिंक ती जास्त सूट होईल. गाईज, गिव मी सम टाईम. मी आलेच चेंज करून. '' आधिच रागात असलेला अमित सवितावर ओरडला, ''प्लीझ मॉम. तू अजून किती एंबॅरेस करणार आहेस आम्हाला? लुक ऍट युअर एज मॉम. तुला नाही शोभून दिसत हे असं काहीतरी. नेहमीच तू आमच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न का करतेस? आम्हाला आवडत असेल, नसेल याचा विचार कधी केला आहेस तू? यू आर नॉट यंग एनिमोअर मॉम. समजत कसं नाही तुला? आमच्या फ्रेंडसचं काय जातंय तुला ऍप्रिशिएट करायला. घरी जाऊन ते काय सांगणार त्यांच्या पेरेंटसना? अमितची आई इज डॅशिंग? शी इस अ बॉंब? शिट यार. काही कल्चर वगैरे आहे की नाही तुला? प्लीझ डोंट ट्राय टु बी अवर फ्रेंड. जस्ट बी अ गुड मॉम. एक चांगली कल्चर्ड आई तर होऊन दाखव आधी. ''

सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अमित फारच जास्त बोलला. तिनी विचार केला, एक साधा इंजिनिअरिंग कॉलेजला शिकणारा मुलगा हा. अजून अभ्यास कसा करायचा हे देखील कळत नाही याला. अभ्यास बाजूला ठेवून नुसता मुलिंच्या मागे फिरणारा अमित चार चौघात मला असं बोलूच कसं शकतो? कमालीचा संयम ठेवून ती अमितला समजावणीच्या सुरात म्हणाली, ''अरे मला वाटलं तुम्हाला आवडत असेल मी तुमच्यात मिक्स झालेलं. तुम्ही न्यू जनरेशनची मुलं म्हणून तुमच्याशी तसंच वागायला हवं असं वाटलं मला. म्हणून मी मोकळेपणानं वागते. तुम्हाला आवडतील असे कपडे घालते. माझ्यामुळे तुमची पोझिशन  ऑकवर्ड होऊ नये म्हणून आणि तुम्हाला कुठेही माझी लाज वाटू नये म्हणून मी हे करते. यात काय चुकलं माझं? तुमचे बाबा सोडून गेल्यावर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून अहोरात्र कष्ट करते मी. माझं प्रोफेशन बिझिनेस असल्यामुळे तिथेही स्मार्टनेस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला तसं वागणं भाग आहे. हे सगळं मी कधिच नाईलाजानी करत नाही रे. खूप मनापासून करते. आजचा सगळा थाटमाट मी तुम्हाला आवडेल, बरं वाटेल म्हणूनच केला. तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार कधी केला नाही बाळा. तुम्हालाच जर माझ्यामुळे ऑकवर्ड फील होत असेल तर मग या सगळ्याचा काय उपयोग? पुन्हा नाही करणार मी तुम्हाला विचारल्याशिवाय काही. खरंच सॉरी अमित. पण आता जाऊ दे ना बाळा. बघ मी इतका छान तुझ्या आवडीचा केक आणला आहे. चल ना. केक काप. मग हवं तर मी जाते. चला रे मुलांनो या सगळे. ''

गौरी आणि अमित संतापून नुसते चडफडत होते. गौरी म्हणाली, ''मॉम, तू आम्हाला जरा एकटं सोडणार आहेस का? बाय दं वे आम्ही ऑलरेडी वाईन केक आणलाय. सो प्लीझ लीव्ह अस अलोन फॉर गॉडस सेक. '' इतका पाणउतारा होऊनही आपण अजून इथेच उभे आहोत या गोष्टीचा सविताला खूप राग येत होता. मुलांसाठी ती सगळं विसरून पुन्हा एकदा अमितला म्हणाली, ''अमित, बाळा समजाव ना रे गौरीला. मी आई आहे तुमची. ऍटलीस्ट मला तुमच्या वाढदिवसात तरी इन्वॉल्व करा रे. शेवटचं एकदा मला सहन करा प्लीझ. पुन्हा नाही येणार मी तुम्हाला डिस्टर्ब करायला. प्लीझ अमित. ऐक नं रे माझं'' आता मात्र हे खूप जास्त झालंय असं वाटून मित्रमैत्रिणी एकेक करून घरी जायला निघाले. ''काकू, तुम्ही रिलॅक्स करा. सी यु लेटर अमित, गौरी. टेक केअर ऑफ हर. हॅप्पी बर्थडे. आज तरी भांडू नका प्लीझ. बाय. " असं म्हणून शेवटी वैदेही निघाली.

मित्रमैत्रिणी घरी गेल्यामुळे अमित आणि गौरी दोघेही वैतागले आणि या सगळ्याला आईच जवाबदार आहे असं समजून गौरी आईला म्हणाली, ''हॅपी नाऊ? काय मिळालं तुला असं करून. आता बस एकटीच आणलेला केक खात. शिट यार. सगळं स्पॉईल केलंस तू. '' गौरीला अडवत अमित मध्येच म्हणाला, ''मॉम तुला काय हवंय नक्की आमच्याकडून. तू फक्त तुझा आणि तुझ्या  लाईफस्टाईलचाच विचार करत आली आहेस. काय गरज आहे तुला आता इतकं हॉट वगैरे दिसण्याची. तुझं वय झालंय मॉम आता. सो प्लीझ हे असं फंकी वागणं सोड तू. जरा मॅच्युअर्ड आईसारखी वाग एकदा तरी. तुझ्या या असल्या बिहेवियरमुळे बाबा आपल्याला सोडून गेला. आम्ही पण जायला हवंय का? '' आता मात्र सविताचा तोल सुटायला लागला होता. तरीदेखील सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करून ती अमितला म्हणाली, ''प्लीझ अमित. आजच्या दिवशी तरी बाबाचा विषय काढू नकोस. तुमच्या फ्रेंडसना मी बोलावते ना परत. येतील ते. एक मिनीट थांब मी फोन करते वैदेहीला. '' ती वैदेहीला फोन करणार तोच अमितनं तिच्या हातून फोन काढून घेतला आणि रागानी म्हणाला, ''मॉम प्लीझ. जस्ट कीप आऊट ऑफ इट. माझ्या मैत्रिणिला फोन करायची काहीच गरज नाही. तू तुझ्या खास जवळच्या मित्राला फोन कर ना. राजेशला. त्यानीच केलं असणार हे सगळं सो कॉल्ड बर्थडे डेकोरेशन. ही इज नंबर वन बास्टर्ड. ''

हे ऐकल्यावर सविताचा तोल पूर्णपणे सुटला आणि पुढे सरसावून तिनं अमितच्या थोबाडीत मारली. गौरी तिच्यावर ओरडली, ''स्टॉप इट मॉम. बर्थडेला तू मारतेस अमितला. यु आर जस्ट टेरीबल. '' अमितला जवळ घेऊन गौरी त्याचं सांत्वन करू लागली. गौरीचा प्रचंड राग येऊन सविता म्हणाली, ''तू गप्प बैस गं. आगाऊ कुठली. ऐकून घेतेय म्हणून काय वाटेल ते बोलणार आहे का हा नालायक? काय रे ए घोड्या? हे असले आरोप स्वतःच्या आईवर करायला लाज नाही वाटली तुला. तुझी लायकी तरी आहे का राजेशचं नाव घेण्याची? मला कल्चर आणि मॅच्युरिटीच्या गोष्टी सांगतोस तू? अरे नीच माणसा, रात्री रूम मध्ये काय धंदे करतोस तू, विसरलास? केळकर काकू सांगत होत्या मला सगळं. तू आणि तुझे पिसाट मित्र चोरून केळकर काकूंना कपडे बदलताना बघता. बोल आता. आता का दातखीळ बसली? आपल्या आईच्या वयाच्या बाईबद्दल हे असे विचार करणारा तू मला शिकवणार आहेस कल्चर म्हणजे काय? आणि तू गं. गावभवानी कुठली. आपल्या बापानी आजपर्यंत कशा पोरी फिरवल्या हे तू शेजाऱ्यांना अभिमानानी सांगतेस. अगं भरल्या संसारातून आपल्याला एकटं सोडून तुमचा बाप कोण्या एका उठवळ बाईबरोबर पळून गेला हे कल्चरला धरून होतं का? हलकट पोरं. तुम्ही मला शिकवणार का मी कसं दिसावं आणि दिसू नये ते. आधी आयुष्यात काहीतरी करून दाखवा आणि मग बोला. उद्या मी घराच्या बाहेर काढलं तर तुमचा दारुड्या बाप ठेवून घेणार आहे का तुम्हाला? चांगलं दिसण्याचा, नटण्याचा मक्ता फक्त तुम्ही तरुण मुलांमुलींनीच घेतलाय का? वर पुढारलेपणाच्या गोष्टी करणारे तुम्ही यंग लोक एखाद्या वय झालेल्या बाईनी जरा बरं दिसायचा प्रयत्न केल्यावर तिला हसता? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमचं सगळं प्रोग्रेसिव्ह थिंकिंग वगैरे हे फक्त स्वतःच्या सोयिपुरतं, दारू सिगारेट ओढण्यापुरतं, पुरुषी अहंकारानी भरलेलं आणि स्वतःच्या सोयिनुसार बाईला वागवण्यापुरतंच मर्यादीत आहे. स्वतःच्या मनातली घाण तुम्हाला दिसत नाही. माझ्यात आणि राजेशमध्ये काहीतरी संबंध आहेत हे मात्र तुम्ही अगदी छातिठोकपणे सांगू शकता. तुमची ती मैत्री आणि आमचा तो व्याभिचार, अफेअर काय? बापाची लफडी दिसत नाहीत तुम्हाला. पण आईचा मित्र वाईट चालीचा वाटतो. आम्ही स्वतः काय वाट्टेल तो नंगानाच करणार पण आईनी मात्र घरी वेळेवरच आलं पाहिजे. आम्ही मागू तेव्हा मुकाट पैसे दिले पाहिजेत. स्वतःच्या बळावर, हुशारीवर  ब्रॅंड न्यू होंडा सिविक घेऊन मुलाना फाईव्ह स्टार मध्ये जेवायला नेणारी आई, ही मुलांचे वडील नसले किंवा पळून गेलेले असले म्हणजे वाईट चालीचीच वाटते सगळ्यांना. स्त्री पुरूष समानता हे सगळं  नाटक नुसतं कागदावर आहे. तुमच्यासारख्या नतद्रष्ट कार्ट्यांना भिकार मुलामुलिंबरोबर नाच केले, नाक्यावर उभं राहून बिड्या ओढल्या, चार वाक्य इंग्रजीत बोलून दाखवली की एकदम फॉरवर्ड झाल्यासारखं वाटतं. स्वतःच्या आईचा एक मित्र देखील तुम्हाला सहन होत नाही. कसले डोंबलाचे मदर्स डे सेलिब्रेट करता रे तुम्ही? एकीकडे मदर्स डे सेलिब्रेट करायचा आणि दुसरीकडे आईला एखादा मित्र असेल तर तिच्यावर संशय घ्यायचा याला तुमची ब्रॉड मेंटॅलिटी म्हणायचं का? ''

बरंच बोलून झाल्यावर सविता सोफ्यावर बसून रडू लागली. एवढं सगळं होऊनही गौरीनं पुन्हा सविताला डिवचायचा प्रयत्न केला. ती म्हणाली, ''मॉम, तू आम्हाला घर सोडण्याच्या सारख्या थ्रेटस का देतेस? हे घर आमचं पण आहे नं. बाबा म्हणाला मला. आमचं कोणी काही वेडं वाकडं करू शकत नाही. '' सविता पुन्हा रागावून म्हणाली, ''ए मूर्ख मुली. तुझ्या बाबाचं कौतुक सांगू नकोस मला. अजुनही तो ज्या भिकारड्या फ्लॅटमध्येच राहतोय ना, तो फ्लॅट त्याचा नाही. माझ्या सासऱ्यांचा आहे. माझ्या आणि राजेशबद्दल त्यानंच तुमच्या मनात भरवून दिलंय हेही मला माहिती आहे. तो लाख वाट्टेल ते बोलेल गं. पण तुम्ही त्याच्यासारख्या खोटारड्या माणसावर विश्वास ठेवता ना याचं मला आश्चर्य वाटतंय. पंधरा वर्ष तोंड तरी दाखवलं का त्यानं आपल्याला? आता आपली परिस्थिती चांगली आहे आणि हा भिकाऱ्यासारखा फिरतोय अजूनही. पैसे हवे असतील त्याला ऍज युज्वल. त्याचं जाऊ द्या, पण तुमचं काय? ज्या मुलांना मी आजवर प्राणापलिकडे जपलं त्यांनीच माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. पण आता हे फार झालं. अमित आणि गौरी, जस्ट पॅक अप ऍंड लीव्ह इमिजिएटली. गेट दं हेल आऊट ऑफ हिअर. ''

आता मात्र अमित आणि गौरीची पाचावर धारण बसली. आई आपल्याला घराच्या बाहेर काढेल असा विचार त्यांनी कधीच केला नव्हता. अमितनं आईला विचारलं, ''आर यू शुअर तू आम्हाला जायला सांगतेस? वेल, त्या केसमध्ये आम्हाला बाबाशी बोलावं लागेल. अजून एक असं की तुला आम्हाला पैसे द्यावे लागतील. '' सवितानं चिडून उत्तर दिलं, ''मी सांगितलेलं तुम्हाला कळलं नाही बहुतेक. एकही नवा पैसा मी देणार नाही. ताबडतोब बाहेर व्हायचं. तुम्हाला काय लीगल ऍक्शन घ्यायची असेल ती तुमच्या दारुड्या बापाला विचारून घ्या. काय हवं ते करा. गेट आऊट. ''

उन्मत्तपणानं आणि मस्तीत अमित आणि गौरी घराबाहेर पडले. जाताना सविताला साधं बाय सुद्धा म्हणाले नाहीत. दोघे निघून गेल्यावर सविताला अचानक आठवलं की अमितला त्याची बर्थडे गिफ्ट द्यायची राहूनच गेली. अमितसाठी गिफ्ट म्हणून आणलेला लेटेस्ट मॉडेलचा सेलफोन घेऊन ती तशीच रस्त्यावर आली आणि मुलांना शोधू लागली. पण मुलं सापडली नाहीत. तिनं तडक रघूला फोन लावला. पण रघूनं उचलला नाही. दुसऱ्या दिवशी ती रघूच्या घरी गेली. दार उघडून पाहिलं तर मुलं आत झोपलेली होती. रघूच्या डोळ्यात सविताला हरवल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. मुलं सज्ञान झाली आहेत आणि यापुढे त्याना हवं असेल तसं जगण्याचा आणि कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार कोर्टानं घटस्फोटाच्या वेळी दिला होता याचा सविताला विसर पडला होता. आत्तापर्यंत मुलांच्या संगोपनात, त्यांना वाढवण्यात, आपली मुलं आता मोठी होत आहेत आणि एक दिवस त्यांना वडिलांकडे जाण्यापासून आपण रोखू शकणार नाही हे लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. पण आता इलाज नव्हता.

मुलांनी वडिलांबरोबर राहायला सविताची काहीच हरकत नव्हती. पण रघू त्यांचा सांभाळ यशस्वीरित्या करू शकेल की नाही याबद्दल तिला शंका होती. त्याचा बाहेरख्याली स्वभाव, दारू पिणं, सारखं नोकऱ्या बदलणं, दारूच्या नशेत अर्वाच्य शिविगाळ करून प्रसंगी मारामारी करायला देखील मागे पुढे नं पाहणं या सगळ्या गोष्टी सविताला माहित होत्या. तिलाही मुलं बाबाजवळ राहायला हवी होती आणि ती त्यांना हळू हळू रघूकडे पाठवणारही होती. पण केवळ सूड घेण्याच्या उद्देशानं पछाडून रघूनं मुलांच्या मनात आईबद्दल काय वाट्टेल ते भरवलं याचा सविताला मानसिक त्रास होत होता. पुढे बरीच वर्ष मुलांनी आणि रघूनी सविताशी काहीच संबंध ठेवले नाहीत. सवितानं कामात स्वतःला पूर्णपणे गुरफटून घेतलं तरीसुद्धा मुलांचा विचार तिच्या मनातून काही केल्या जाईना.

एके दिवशी काही कामानिमित्त सविता झेरॉक्स काढण्यासाठी म्हणून एका दुकानात गेली. झेरॉक्स काढणाऱ्या अनेक मुली तिथं होत्या. एक मुलगी स्वतःहून सविताकडे आली आणि म्हणाली, ''बोला मॅडम किती कॉपीज काढू? '' सवितानं त्या मुलिकडे पाहिलं आणि तिला धक्काच बसला. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून गौरी होती. गौरी सुद्धा सविताला पाहून अस्वस्थ झाली. सविता रडवेल्या आवाजात गौरीला म्हणाली, ''गौरी, अगं इथे काय करतेस तू? किती वर्ष झाली तुला पाहून. काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची. अमित कुठे आहे? बाबा बरा आहे का? तुमचा मॅनेजर कुठे आहे? त्याला बोलाव आणि सांग माझी आई आली आहे म्हणून. चल आपण कॉफी घेऊ कुठेतरी जाऊन. '' गौरी मॅनेजरला सांगून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आईबरोबर कॅफे कॉफी डे मध्ये गेली. जरा वेळ बसल्यावर गौरी आईला म्हणाली, ''आई''.. गौरीच्या तोंडून मॉमच्या ऐवजी आई शब्द ऐकून सविताचे डोळे भरून आले. गौरी पुढे म्हणाली, ''आई तुला गेल्या सात आठ वर्षात आम्हाला एकदाही भेटावसं वाटलं नाही का गं? तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. बाबाला जाऊन दोन वर्ष झाली. त्याचं लिव्हर बर्स्ट झालं होतं दारू पिऊन. शेवटी गेला तो. शेवटच्या वेळी सारखी तुझी आठवण काढत होता. मी सविताला खूप त्रास दिला, मुलांना तिच्यापासून तोडलं, त्याचीच ही शिक्षा आहे असं म्हणत होता सारखं. '' सविता तिला थांबवून पुढे म्हणाली, ''अमित? अमितचं काय? तो काय करतो? '' गौरीनं त्रासिकपणानी उत्तर दिलं, ''तो काय करणार? बाबाचा वारसा चालवतोय. बाबा गेल्याला तूच जवाबदार आहेस असं म्हणतो. बाबासारखीच दारू ढोसतो आणि बसून असतो घरात. मी कंटाळले गं आई आता. कसाबसा खर्च चालवतेय मी घराचा. बाबाचा फ्लॅट विकून जोशीवाडितल्या बैठ्या चाळीत घर घ्यावं लागलं आम्हाला. तिथेच राहतोय दोघे. तुला कॉंटॅक्ट करायचाही खूप प्रयत्न केला बाबा गेल्यावर. पण तू लंडनला गेलीस असं कळलं आम्हाला. खरंच आई, अमितचा तो वाढदिवस आम्हाला इतका महागात पडेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नाही कधी. '' एखाद्या लहान मुलीसारखी गौरी रडत होती. मध्येच रडणं थांबवून ती आईला म्हणाली, ''चुकलो आई आम्ही. माफ कर असं म्हणायला सुद्धा तोंड नाही आहे आम्हाला. पण प्लीझ आम्हाला घेऊन जा ना तुझ्याबरोबर. नाही नको म्हणूस प्लीझ. ''  

गौरीचं बोलणं ऐकल्यावर सविताचं काळीज अक्षरशः हेलावून गेलं. आपल्या हट्टी स्वभावामुळे मुलांवर हे दिवस पाहण्याची वेळ आली असं वाटून आपणच या सगळ्याला जवाबदार आहोत असं तिला वाटू लागलं. शेवटी आईचं काळीज ते. मागचा सगळा अपमान विसरून सविता गौरी आणि अमितला पुन्हा घरी घेऊन आली. अमितची अवस्था पाहून तिला त्याची कीव आली. काही वर्षांपूर्वी तिच्या चारित्र्यावर संशय घेणारा हाच तो अमित. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. अति दारू प्यायल्यामुळे असेल किंवा रघूच्या एकंदरीत वागण्यामुळे असेल पण अमितचा अक्षरशः दुसरा रघू झाला होता. फरक इतकाच होता कि सविताऐवजी अमित आता गौरीवर वाईट चालीचा ठपका ठेवत होता. सवितानी मनाशी पक्क ठरवलं की पूर्वीसारखी चूक आता करायची नाही. मुलांना कुठेही एकटं सोडायचं नाही. अमित जसा असेल तसा त्याला आपल्यालाच सांभाळावा लागेल.

एक मात्र तिला कळून चुकलं होतं की कितीही शिकलं, मोठं झालं आणि काहीही झालं तरी आईला आणि बाईला क्षमा नाही. स्वतःच्या मनाचा विचार करून काही करायचं म्हण्टलं तर ते स्वातंत्र्य अजूनही पूर्णपणे बायकांना मिळत नाही. रघू दारू ढोसून मेला आणि सुटला. दारू पिताना त्यानं क्षणभरही मुलांचा विचार केला नाही. बरोबरच आहे. त्याला काही राखायचं, सांभाळायचं नव्हतंच. असं असून सुद्धा लोक रघूला वाईट ठरवणार नाहीत. 'शेवटी आईनीच नको का सांभाळून घ्यायला, सवितामध्येच काहितरी प्रॉब्लेम असला पाहिजे, करिअरिस्ट आई असली ना की मुलांची ही अशी अवस्था होते, नवऱ्याला सांभाळता आलं नाही आता मुलांना काय सांभाळणार? ' असले फालतू डायलॉग्स निरुद्योगी लोक सकाळी चहा पिताना मारणारच. ज्याला काही सावरायचं असतं त्याच्यावरच बंधनं असतात हे कोणीही समजून घेत नाही.

असेल त्या अवस्थेत अमितला आणि गौरीला सांभाळून घेण्याखेरीज सविताकडे दुसरा पर्याय उरला नाही. पूर्वीचं सगळं विसरून पुन्हा एकदा नव्या लढाईसाठी ती मनापासून सज्ज झाली.