भरड...

कंसाची अंतिम गंतव्यता निगडित होती
देवकीच्या आठव्या अपत्याशी
त्या पूर्व सातांचा काय दोष होता?
हकनाक चिणून मरण्यासाठीच
क्षणभंगुर रूदन त्यांचं !

अन्नदात्याच्या मतलबी उपकाराखाली
विवेक गहाण टाकलेल्या
अश्वत्थाम्याच्या दुःखाची किंमत काय?
तर, निष्पाप निद्रिस्त निश्चिंत
तमाम पांडव पुत्रांचं
अतर्क्य पद्धतीनं निर्घृण शिरकाण !

आजही तेच
कुणाच्या तरी हेकट तथाकथित
आदर्श कल्पनेच्या अट्टाहासासाठी
एकामागून एक
निष्पाप जीवांचे असंख्य बळी,
आणि,
मतलबी पोशिंद्यांचे नाटणारे नक्राश्रू !