मराठी माध्यमातून शिक्षण

काल दुपारी ऑफिमध्ये जेवताना आमची "लहान मुलांचे शिक्षण" या विषयावर चर्चा झाली. निमित्त होते एका सहकारी (colleague) च्या मुलाचा शाळेचा प्रवेश. तिच्या बोलण्यातून असे कळले कि तिला तिच्या मुलाला मराठी माध्यमात (महाराष्ट्र बोर्ड) टाकायची इच्छा आहे पण त्याला तिच्या काही नातेवाईकांचा विरोध आहे. या निमित्ताने मनात आलेले काही   प्रश्न
१. मराठी माध्यम हे केवळ गरीब वा सनातनी लोकांच्या मुलांसाठी असे चित्र तयार झाले आहे का?
२. आता मराठी माध्यमातून शिकलेली मुले इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांबरोबर पुढे स्पर्धा करण्यास असमर्थ ठरतात/ठरतील का ?
३. इंग्रजी माध्यमातून शिक्षण ही प्रतिष्ठेची बाब झाली आहे का?
४. मीम वरील पालक आपल्या मुलांना कोणत्या माध्यमात शिकवतात?
माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. पण मला त्याचा कुठेही तोटा झाला नाही. किंबहुना माझे असे मत आहे कि, मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांची आकलनशक्ती आणि कल्पनाशक्ती उत्तम असते.
अधिकः-तिच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यात मराठी शाळा फक्त गावात आहेत. तिच्यासारख्या गावाबाहेर (पाषाण, बाणेर ई.) राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ते गैरसोयीचे आहे. माहीत असल्यास पुण्यातील चांगल्या मराठी शाळांची नावे सांगावीत.
येथे या विषयावर यापुर्वी चर्चा झाली असल्यास त्याचा दुवा द्यावा