"आभाळ फुटणं" म्हणजे काय हे आम्ही त्या दिवशी अनुभवलं. आतापर्यंत हा एक फक्त वाक्प्रचार म्हणूनच ऐकला होता. पण त्या दिवशी त्याचा तो भयंकर अर्थ कळला.
१७ एप्रिल ! सकाळ नेहेमीसारखीच उगवली. आमची सकाळ ६ वाजता सुरु झाली. पिल्लू क्रिकेट कोचिंगला जायला निघालं. त्याची तयारी झाली……..आणि मी कामं आटपायला सुरवात केली कारण आज हे सेऊलहून येणार होते. Emirates ची फ्लाइट होती. दुबईला थांबून मग इथे कुवेतला ८.२५ ला पोचणार होती. मी त्यांना घ्यायला साधारण सव्वा आठला निघणार होते. आठ वाजले. मी देवाजवळ दिवा लावला. मी दिवा लावला तेव्हा सकाळचा प्रकाश होता. दिवा लावल्यावर एका सेकंदात अचानक अंधार झाला………….अगदी गुडूप्प काळोख…..रात्रीसारखा. मी घाबरुन बाहेर बघितलं तर सगळीकडे अंधार…………रस्त्यावरचे दिवेपण नव्हते……….मी बाल्कनीत आले. तेवढ्यात रस्त्यांवरचे दिवे लागले आणि काय घडतंय हे दिसायला लागलं. भयंकर वारा सुटला होता. सगळी झाडं गदगदा हलत होती. रस्त्यावरची वाळू उडत होती. समोरच्या मैदानात तर सगळीकडे रेतीचा पाऊस ! अंगावर रेती अगदी पावसासारखी पडत होती. अचानक आकाशात एक मोठा काळा अक्राळविक्राळ ढग चालत येतांना दिसला. कार्टून मधे जसा दाखवतात तस्सा तो ढग चालत येत होता आणि अचानक तो ढग फुटला आणि धो धो पाऊस पडायला लागला. मुसळधार पाऊस सुरु झाला. सोबत जोरदार वारा……..! समोर जे काय घडत होतं त्यावर विश्वासच बसत नव्हता. मग अचानक पिल्लाची आठवण आली. तो तर मैदानावर होता. त्या सगळ्या मुलांचं काय झालं असेल……….?? त्याचे सर सोबत होते …….ते नक्कीच काळजी घेतील सगळ्यांची. पण काळजात धडधड होत होती. मग आठवलं……..अरे हे विमानात असतील…..आणि आता तर लॅंडींगची वेळ. कसं करणार विमान लॅंड…….?? तेवढ्यात फोन वाजला. मी ज्या टॅक्सीत जाणार होती त्या अलीभाईंचा फोन आला की थोडावेळ थांबूया……कदाचित फ्लाइट उशीरा येईल……..थोडं शांत झाल्यावर जाऊया म्हणून. मी "ठीक" म्हणून फोन ठेवला. पाठोपाठ सगळ्या मैत्रिणींचे फोन आले. इतक्यात विमानतळावर जाऊ नकोस म्हणून सगळ्यांनी सांगितलं. विमान जरी आलं तरी ते विमानतळावर थांबू शकतील. पण इतक्या वादळात तू बाहेर जाऊ नकोस असंच म्हणणं होतं सगळ्यांचं. मलाही पट्लं. मी धडधडत्या मनानेच पूजा केली. देवाजवळ अगदी मनापासून प्रार्थना केली. देवा सगळ्यांना सुखरुप ठेव रे बाबा !
कॉम्प्युटर वर फ़्लाइट्स चं टाइमटेबल लावूनच ठेवलं होतं. फ़्लाइट वेळेवरच दिसत होती. पण वेळ तर उलटून गेली होती. काही केल्या चैन पडेना. तेवढ्यात अजून एका मैत्रिणीचा फोन आला की मुलं सगळी ठीक आहेत आणि लवकरच घरी येतील. मन जरा शांत झालं. बाहेर बघितलं तर पाऊस कमी झाला होता. अंधारही कमी झाला होता. सारखी आत बाहेर सुरु होती. ३-४ मिनिटात सगळं शांत झालं. पाऊसही थांबला. पुन्हा उजाडलं. आभाळ होतंच पण उजेडही नेहेमीसारखाच होता. आता जरा जीवात जीव आला. अक्षरश : १५ मिनिटांचा खेळ होता. पण तेवढ्या वेळात सगळ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. निसर्गाच्या हातचं आपण बाहुलं असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
पिल्लू घरी पोचलं. तो पण इतका excited होता ना…….! त्याला सगळं सांगायचं होतं. तो म्हणाला आम्ही खेळत असताना अचानक जोरात वारा सुटला आणि रेतीचा पाऊस पडायला लागला. आणि आकाशात ……..पाण्यात डेटॉल टाकलं की कसं दिसतं…….. तसा काळा ढग चालत येतांना दिसला. आणि अचानक तो ढग उघडला आणि पाऊस सुरु झाला……….समोर काहीच दिसेना…….पुन्हा रात्र झाली. आम्ही पळत बिल्डिंगकडे धावलो. एकमेकांवर आपटलो सुद्धा. मग आम्हाला बेसमेंटमधे नेलं. थोड्या वेळाने सगळं शांत झाल्यावर आम्हाला सोडलं. आता पप्पा कधी येणार आणि कसे येणार ह्याची काळजी त्यालाही लागली.
ह्यांचं फ्लाइट अजूनही वेळेवर दिसत होतं म्हणून मी ह्यांच्या मोबाईलवर फोन केला आणि चक्क ह्यांनी उचलला. ह्यांचा आवाज ऐकून इतका आनंद झाला ना…….! सुरवातीला "अवी……..अवी………तुम्ही पोचले…??" येवढंच बोलले. तेव्हा हे विमानातच होते. पण विमान उतरलं होतं. आम्ही निघतोच आहोत असं त्यांना सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले……."मला वाटलं तू इकडे पोचली असशील". म्हटलं……"ते सगळं नंतर सांगते…. आम्ही निघतोय आता." आम्ही पोचलो तेव्हा हे बाहेर आले होते. ह्यांना बघून इतका आनंद झाला ना……..! देवाच्या कृपेनी सगळं काही सुखरुप पार पडलं होतं. ह्यांच्याकडूनही त्या वेळेची कहाणी ऐकून तर अंगावर काटाच आला. हे म्हणाले…….. लॅंड व्हायच्या आधी १५ मिनिट पायलट ने धोक्याची सूचना दिली होती. विमान खूप जोरात हलत होतं ……खडखडत उडत होतं……..बंपी राईड होती आणि अचानक एकदम विमान झूपकन खाली आलं. विमानातले सगळे प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडायला लागले. देवाची प्रार्थना करायला लागले. विमान अचानक खूप खाली आलं……एक मिनिट असं वाटलं की संपलं सगळं…….पण दुसऱ्याच मिनिटाला पायलटने विमानावर ताबा मिळवला आणि विमान सुखरुप उतरलं. विमान उतरल्याबरोबर सगळ्या प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या……..अक्षरश: आनंदोत्सव केला.
ह्यांच्याकडून सगळं ऐकल्यावर खरोखरंच देवाचे अगदी मनापासून आभार मानले. इतक्या मोठ्या संकटातून त्याने अगदी सुखरुप ह्यांना परत आणलं होतं. देवावरचा विश्वास कित्येक पटीने वाढला.