किडा......(भाग दोन)

रत्नाबाई उठल्या. गणपतीच्या तसबिरीपुढे त्यांनी उदबत्ती लावली. समई लावू लागल्या. पण वारा एवढा होता की पेटलेली समई विझू लागली. दोन चार वेळा प्रयत्न करूनही समई लागली नाही. तेवढ्यात विनायकरावांचा हॉलमधून आवाज आला. ''रत्ना, मी जरा पडतो. मला थोडसं अस्वस्थ वाटतय गं. ''सव्वा सहा होत आले. बाहेर पूर्ण काळोख झाला होता.हॉल मधील एकच खिडकी उघडी राहिली होती. ती वाऱ्याने दाणकन आपटली‌. मग त्यांना विनायक्रराव काय म्हणाले ते आठवलं. त्यावर त्या म्हणाल्या, ''गोळ्या घेऊ नका म्हणजे स्वस्थता येईल तुम्हाला . जरा थांबा की पाच मिनिटं. देवापुढे दिवा लावून होऊ दे . मग पडा

शेवटी एकदाची समई लागली. .पण विनायकराव सोफ्यावरच आडवे झाले होते. रत्नाबाई आतमध्ये आता जेवायला काय करायचं म्हणून विचार करित होत्या. मग फ्रिज मध्ये काय आहे ते बघायला त्या हॉलमध्ये आल्या. विनायकरावांना सोफ्यावरच आडवे झालेले पाहून त्या म्हणाल्या, '' जरा धीर नाही तुम्हाला'' असं म्हणून त्यांनी फ्रिज उघडला. आतल्या वेगवेगळ्या भाज्या पाहून त्या ठरवू लागलया. त्यांनी पालक घेतला आणि पनीरचा डबा घेतला. आज विनायकरावांच्या आवडीच पालक पनीर करण्याचा त्यांचा बेत होता. आत जाऊन त्या पालक निवडून चिरू लागल्या. मग मोठ्याने विनायकरावांना ऐकू जाईल असं म्हणाल्या, ''आपण असं केलं तर? उद्याच इथून निघू या. सकाळी ड्रायव्हिंग करणं तुम्हालाही जड जाणार नाही. काय म्हणते मी ऐकताय ना ? ''पण त्यांच्या कडून काहीच प्रतिसाद आला नाही. म्हणून पालक धुण्यासाठी एका चाळणीत घालून हॉल मध्ये आल्या. स्वतःशीच म्हणाल्या, '' अगदी लाइट लावे पर्यंत धीर निघाला नाही तुम्हाला? '' बाहेरची ट्यूब त्यांनी लावली. हॉलमधल्या उघड्या खिडकीतून वारा सैताना सारख आत घुसत होता. प्रथम रत्नाबाईंनी ती खिडकी बंद केली . ती करताना त्यांच्या तोंडावर झडीचे पाणी उडले ते पुसत त्या मागे सरल्या. मग स्वतःशीच म्हणाल्या, '' ह्यांना उठवायलाच हवं. काही गोड कराव का ते विचारलं पाहिजे. नाहीतरी श्रीकांतनी गोड बातमी दिलीच होती. '' त्या सोफ्याजवळ आल्या. विनायकरावांचे डोळे अर्धवट उघडे होते. त्यांचे डोळे झोपेत अर्धवट उघडे राहात असत. त्याचं रत्नाबाईना काहीच आश्चर्य वाटल नाही.

''काय ही झोप? काळ झोप नुसती. उठा.... '' म्हणून रत्नाबाईंनी त्यांच्या खांद्याला धरून हालवलं. तो त्यांचं सोफ्याच्या पाठी कडे असलेलं तोंड समोर आलं आणि एका बाजूला निर्जिवपणे पडलं. ते उघडं होतं.चेहरा आक्रसलेला होता. कसली तरी वेदना झाल्याचं रत्नाबाईना स्पष्ट दिसलं. छातीवरचा उजवा हातही हळू हळू खाली आला आणि सोफ्याच्या कडेवरून लोंबू लागला. रत्नाबाईंना भयानक शंका चाटून गेली. हे.... काय असावं ? त्यांना कळेना . ही झोप नक्कीच नाही. मग त्यांनी त्यांच्या कपाळाला आणि छातीला हात लावून पाहिला.धडधडणारं हृदय बंद झालं होतं. पण सगळे भाग तर गरम होते. छातीची काहीच हालचाल दिसत नव्हती. हळूहळू त्यांना परिस्थितीची जाणिव झाली. सगळा हॉलच त्यांच्या भोवती फिरू लागला. आणि त्या सोफ्या शेजारीच मटकन खाली बसल्या् . हे बहुतेक गेले असावेत अशी थंड जाणीव त्यांच्या मनात येऊ लागली. पण मनातलं ओठावर यायला भीत होतं. त्यांनी परत एक दोन वेळा त्यांना हालवून पाहिलं. पण छे..... काहीच हालचाल झाली नाही. त्यांच्या तोंडाला कोरड पडली. श्वास जड झाला. ..... हळू हळू त्यांना लक्षात आलं की त्या या एकाकी बंगल्यात आत्ता अगदी एकट्या .... पूर्णपणे ए क ट्या आहेत. बाहेरच्या पावसाशिवाय आणि छातीच्या धडधडण्या शिवाय त्यांना कुठलाच आवाज ऐकू येत नव्हता.

काय करावं?.... ‍. काय करावं ? ..... त्यांना एकदम सुचेना. कोणाला बोलवावं.? आजूबाजूचे बहुतेक बंगले बंद होते. बाहेर जाऊन उपयोग काय? त्यांची नजर सारखी सोफ्यावरच्या विनायक रावांकडे जात होती. सगळ्याच्या पलिकडे गेलेले ते. आणि एकट्या पडलेल्या त्या, याची बोचणारी जाणीव. जवळ जवळ अर्धा पाऊण तास त्या अंगाची जुडी करून , घाबरून त्या स्वस्थच बसल्या होत्या. त्यांना रडवेना की ओरडवेना. मग त्याना थोडीशी जाणिव झाली, आणि ''डॉक्टर''हा एक विचार त्यांच्या एकाकी मनात आला. त्या कशातरी उठल्या. भयाने मागे सरत त्या फोन जवळ आल्या. त्यांना जवळच पडलेला विनायकरावांचा मोबाईल दिसला. मोबाईलवरून त्यांनी थरथरत्या हातानी डॉक्टर शिधयांचा नंबर शोधला. डायलही केला. पण '' प्लीज चेक द डायल्ड नंबर'' असं ऐकू आलं. त्यांनी घाईघाईने तोच नंबर पुन्हा पाहिला आणि पुन्हा लावला. पण उत्तर एकच, ''प्लीज चेक द डायल्ड नंबर. ''परत परत लावल्यावर एकच वाक्य नवीन आलं. ''द नंबर यू हॅव डायल्ड इज नॉट रीचेबल. "

मग त्यांनी तोच नंबर लँड लाईन वरून लावला. पण ''ये नंबर मौजूद नही है. '' असं निर्जिव उत्तर आलं. त्यांनी चार पाच वेळा फोन लावल्यावर एकदाचा नंबर लागला. पलिकडून डॉक्टर शिधयांचा आवाज येत होता.'' हॅलो , हॅलो , बोला... बोला... कोण बोलतय ? '' पहिल्यांदा तर रत्नाबाईंच्या तोंडातून आवाजच येईना. कसातरी प्रयत्न केल्यावर त्यांनी कोण बोलतय ते सांगितलं. विनायकराव गेले असावेत आणि डॉक्टरांनी लवकर यावं. मग त्या फोनवरच विचित्र दबक्या आवाजात रडू लागल्या. पलीकडून डॉक्टरानी ताबडतोब निघण्याचे आश्वासन दिले . रत्नाबाईंनी त्यांना पत्ता सांगितला. डॉ‌‌. शिधये , विनायकरावांचे वर्गमित्र. त्यामुळे ते डॉ. कमी पण मित्र जास्त, असे होते. ते राहायला ठाण्याला होते. आता ते यायला निदान तीनचार तास तरी लागतील. ते येणार याची खात्री असल्याने रत्नाबाईना जरा बरं वाटलं. पण तीनचार तास हा मोठा अवधी असल्याची त्यांना जाणीव झाली नाही. आता आठ वाजायला आले होते.

रत्नाबाईना अचानक तहान लागल्याची जाणीव झाली . पण उठून कीचनमध्ये जाऊन पाणी पिण्याचं त्याना धाडस होईना़. उलट त्यांच्या मनातून एक जुनाच डायलॉग वर आला. ''घोंगडीवर काढून ठेव . ... ̱घोंगडीवर काढून ठेव. '' त्यांना कळेना , हे कोण बोलतय‌. श्वास रोखून त्यांनी सोफॅवरच्या विनायकरावांकडे पाह्यलं. ते जसे होते , तसेच होते. शांतपणे झोपल्यासारखे. मग रत्नाबाईंना आईच्या तोंडून हे वाक्य ऐकल्याच आठवलं.त्यांना काय झालं कोणास ठाऊक . पण आईची आठवण येऊन त्या ओरडल्या.''.... आई.... आई गं ...'''' बाहेरच्या पावसाच्या आवाजात त्यांचा आवाज विरला. ऐकायला होतच कोण ? मग त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. थोडावेळ विव्हळल्यानंतर त्यांना जरा बरं वाटलं. मग त्यांना आठवलं. त्यांच्या लहानपणी असच कोणीतरी शेजारी गेलं होतं. आणि आईला त्यांनी बाकीच्या बायकांशी बोलताना ऐकलं होतं. '' काय माणसं आहेत? घोंगडीवर काढून नको का ठेवायला ? लहानग्या रत्नाला त्याचा अर्थ काही कळला नाही. पण शब्द तेव्हापासून मनात शेवाळ्यासारखे चिकटून राहिले. ते इतक्या वर्षांनी वर आले. त्या शहारल्या . हे... हे... असलं मी काही करणार नाही. त्या मनातल्या मनात शहारल्या. एकदा का माणूस गेला की त्याचं शरीर म्हणजे, ''अस्पर्श '' वाटतं. जिवंत असेपर्यंत त्याचं काल्पनिक अस्तित्व सुद्धा महत्त्वाचं असतं. पण एकदा का तो गेला की त्याचं उरतं फक्त '' प्रे..... त'' , अस्पर्श , अमंगळ , भीतीदायक, वगैरे, वगैरे, . असले विचार रत्नाबाईंच्या मनात थैमान घालू लागले.

(क्र म शः)