ह्यासोबत
रत्नाबाई साधारण बासट त्रेसट वर्षांच्या होत्या. गोल गोरटेला चेहरा. वेगवेगळ्या ट्रीटमेंटस घेऊन चेहेऱ्यावरच्या सुरकुत्यांवर विजय मिळवलेला होता. मुद्दाम कोरलेल्या भुवयांमध्ये लहानशी टिकली लावलेली होती. रत्नासारखे चकचकीत पाणिदार डोळे. इतके पाणिदार की खरोखरीच डोळ्यात पाणी आहे की काय असं वाटावं.कदाचित विनायकरावांनी त्यांच नाव डोळे पाहूनच ठेवलं असावं. विनायकरावही त्यांच्यापेक्षा दोन तीन वर्षानी मोठे होते. कमावलेली शरीरयष्टी. अर्ध डोकं टकलानं व्यापलेलं आणि उरलेलं अर्ध केसांनी. अजूनही व्यायाम सोडलेला नव्हता. रत्नाबाई जुन्या काळातल्या असल्या तरी पुरोगामी विचारांच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रगतीच्या आड कोणतेही पारंपारिक विचार आले नाही. त्या आणि विनायकराव एकाच कॉलेजात लेक्चरर म्हणून लागले होते. दोघांची ओळख झाली . ओळखीचे रुपांतर अर्थातच प्रेमात आणि यथावकाश लग्नात झाले. रत्नाबाई अत्यंत टापटीप होत्या. कोणतेही काम त्या प्लान करुनच करीत असत . विनायकरावाचेही तसेच. त्यांचही सगळं कसं आखीव होतं. त्यामुळे त्यांचे सूर जुळले. लग्नही धूमधडाक्यात झालं. बिनविरोध.लग्नानंतर दोन वर्षानी श्रीकांतचा जन्म झाला.
श्रीकांतच्या जन्मानंतर दोघानाही प्रोफेसरशिप मिळाली. सगळं कसं छान चाललं होतं. पैसा कमी नव्हता. आयुष्यातलं प्रत्येक सूख दोघेही पूर्णपणे भोगत होते. असं ते सुखी त्रिकोणी कुटुंब होतं . श्रीकांतही अतिशय हुशार होता. एम. ई . झाल्यावर त्याला एका फॉरीन कंपनीची ऑफर आली आणि तो यू. एस. ला गेला. काही वर्षातच त्याचं तिथे लग्न झालं.विनायकरावांच्या पत्नीसह यू. एस̮ला बऱ्याच वाऱ्या झाल्या. मुलाचा संसार थाटला गेला.मुलाला अमेरिकन लाइफ स्टाइलची एवढी सवय झाली कीतो परत यायला तयार होईना. दोघांनी खूप समजावलं . पण तो मानायला तयार होईना. उलट त्याचं म्हणणं होतं की आईवडिलांनी पण भारत सोडून इकडेच सेटल व्हावं व आपण सगळ्यांनि एकत्र राहावं वगैरे. पण विनयकरावांना ते पटलं नाही. असो. श्रिकांतनी मग एक बंगला घेतला सेकंड होम म्हणून खास आईवडिलांसाठी. विनायकराव त्या वेळी म्हणाले होते, अरे आता दोन तीन वर्षच तर राहिल्येत आणि इथे आम्ही दोघेच तर आहोत. काय करायचं सेकंड होम. पण श्रिकांतनी ऐकलं नाही. तो नाराजीनेच म्हणाला, ''तुम्हाला वाटलं, मुंबईतल्या गर्दीपासून लांब जावं, म्हणून घेतलाय हा बंगला.'' अशीच एक दोन वर्ष गेली.
वर्षातून दोन वेळा विनायकराव आणि रत्नाबाई माथेरानच्या जवळ जंगल भागात असलेल्या बंगल्यात राहत असंत. बंगला वाईट नव्हता. वास्तूशास्त्राला धरून बांधलेला असल्यामुळे कोणताही वास्तूदोष नव्हता. रस्ता मात्र डोंगराळ होता. साधारणपणे अर्ध्या फर्लांगाचं अंतर दोन बंगल्यांमध्ये होतं. आजूबाजूला डोंगर दऱ्यांनी वेढलेले बंगले म्हणजे सृष्टीसौंदर्याचे नमूने होते. मोठमोठया वृक्षांची जंगले होती. अधून मधून माकडांच्या वस्त्याही होत्याच. पण गावापासून लांब असलेल्या या बंगल्यात कोणतेही शहरी आवाज पोहोचत नव्हते. एखाद्याला काही साधना किंवा ध्यानधारणा वगैरे करायची असेल तर जागा उत्तम होती. इथे पाऊस आणि थंडी मात्र भयंकर होती. छोटेखानी असला तरी बंगल्याला एक मोठा हॉल, त्याच्यापुढे किचन आणि दोन्ही अंगाला लागून एकेक बेडरूम होती. वरच्या मजल्यावर पण एक बेडरूम होती. तिथे हॉलच्या कोपऱ्यातून जाणारा एक लोखंडी गोल जीना होता. वरच्या बेडरूमला लागून एक मोठी बालकनी होती जी बंगल्याच्या पुढच्या बाजूला उघडायची. बालकनीत उभं राहून पाह्यलं की उगवता सुर्य दिसायचा आणि जंगालांनी भरलेले डोंगर दिसायचे.
इथे पावसाळ्यात फिरलं की जंगलात वेगवेगळे रंग दिसंत. एकच एक हिरवा रंग नव्हता. कधी निळसट, कधी पोपटी तर कधी पिवळसर हिरवा असे रंग दिसत. माणसं कमी असतील तर सर्व खोल्या जणू खायला उठत. आवाजही घुमायचा. त्या वर्षीच्या जुलै मध्ये ते दोघेही एक दोन आठवडे राहण्याच्या इराद्याने निघाले होते. राहायला जायचं म्हणजे, तिथला एक लोकल माणूस त्यांनी हाताशी धरला होता. त्याला आधी फोन करून सांगावं लागे. मग तो तिथे जाऊन भाजी दूध किराणा वगैरे सर्व व्यवस्था करायचा. तसंच गॅस सिलिंडर आणि इतर लागणाऱ्या जुजबी वस्तू तो आणून ठेवायचा. हॉल मध्ये एक मोठा डबल दोअर फ्रीझ होता त्यात सर्व काही ठेवलेलं असायचं. विनायकराव सगळंकाही नीट ठरवून तयारी करीत. आता त्यांनी एक दोन आठवडे राहण्यासाठी सामान आणून ठेवले होते. मुंबईला पाऊस एक दोन वेळा पडून गेला होता. हवा तशी बरी होती. पण बंगल्यात राहायला पावसाळ्यात प्रथमच ते जात होते. दोन तीन दिवसांपेक्षा जास्त मुक्काम ते करीत नसत. आत्ता सुद्धा वाटलं तरच ते दोन आठवडे राहणार होते. टेलीफोन होताच. कॉंप्युटरही होता. पण त्या दोघांना त्याची जुजबी माहिती होती. श्रिकांतशी त्यांचं क्वचितच चॅटिंग होत असे. बरेच वेळा ते जाऊनच यायचे.
किचनमध्ये एक गणपतीचा फोटो टांगलेला होता. त्याला प्लॅस्टिकचा जास्वंदीचा हार घातलेला होता. विनायकराव वं रत्नाबाई तसे तंदुरुस्त होते. नियमीत व्यायाम आणि योग्य आहार यामुळे ते स्वस्थ होते. त्यांचं ब्लडप्रेशर मात्र कधी कधी वाढत असे. गोळ्या मात्र ते नियमीत घेत नसत हे आश्चर्यच होतं. एवढं नियमीत वागणं आणि एवढं दुर्लक्ष असं कोणालाही वाटेल. स्वतः ड्राईव्ह करीत विनायकराव बंगल्याजवळ पोचले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत होते. बंगला जरा टेकाडावर होता. गाडी पार्क करून त्यांनी पुढचे दार उघडले. आत शिरल्यावर दिवे लावून ते दोघे विश्रांती
घेत होते . विनायकरावांना चहाची तलफ आली. रत्नाबाई कंटाळून चहा करायला उठल्या. बाहेर पिवळसर लालसर संधिप्रकाशात काळे ढग जमा झालेले दिसत होते. वारा वेडावाकडा वाहत होता. चहा घेऊन रत्नाबाई हॉलमध्ये आल्या. दोघेही चहाचा कप तोंडाला लावणार एवढ्यात फोनची बेल वाजली. त्या शांत वातावरणात् बेल ऐकून विनायकराव दचकले. ते फोन उचलून हॅलो म्हणाले. पलीकडे श्रीकांत होता. '"बाबा तुम्ही घरी नाही
आहात का ? तुमचा मोबाइल पण लागत नाही. "त्यावर ते म्हणाले, "'अरे इथे येण्याचं आमचं अचानक ठरलं. इथे रेंज मिळत नाही. बर बोल. कशाकरता फोन केलास? "' आईला द्या जरा. "' रत्नाबाईंच्या खाणाखुणा चालूच होत्या. त्यांनि फोन घेतला. थोडावेळ बोलणं झाल्यावर ते दोघेही
आजोबा आजी होणार असल्याची बातमी श्रीने दिली. रत्नाबाईंनी घाईघाईने त्यांना सांगितलं. त्या म्हणाल्या, ''अरे आजच आम्ही इथे आलोय. जमलं तर पुढच्या महिन्यात येऊनच जाऊ. '' फार बरं होईल '' श्री म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.
विनायकरावांना सुटल्यासारखं वाटलं. एक काळजी संपली म्हणायची. नाहीतर ती एक काळजीच असते. रत्नाबाईंना म्हणाले, '' चला पुढच्या फॉरमॅलिटीज करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे एक दोन महिन्यात जाता तरी येईल. '' रत्नाबाईंनी खुशीत मान डोलावली. मग दोघांनी बाहेरून नाश्ता आणून ठेवला होता तो गरम करून खाऊन घेतला. थोडीशी पावसाला सुरुवात झाली होती. आत पावसाळी किडे येतील म्हणून त्यांनी खिडक्या लावून घेतल्या. टिव्ही लावून पाह्यला पण सगळे चॅनेल बंद होते. त्यांची ती रात्र लहान सहान गप्पा मारण्यात आणि वाचण्यात गेली. दोघेही नातवाचं स्वप्न रंजन करण्यात गुंतले . इतक्या वर्षानी लहान मूल घरात येणार म्हणून रत्नाबाई अगदी हळव्या झाल्या होत्या. विनायकरावांनी त्यांना मूल इथे जन्माला येणार नसून अमेरिकेत जन्माला येणार असल्याची जाणीव करून दिली. मग ते झोपी गेले. सकाळी केव्हातरी सात साडेसातला त्यांना जाग आली. अंघोळी वगैरे उरकून ते चहा घेत बसले होते. रत्नाबाईंनी गणपतीपुढे समई आणि उदबत्ती लावली. मनोभावे नमस्कार केला. तशा त्या पुजा बिजा करित नसत. त्यांना इथून निघून लगेचच विमानात बसावसं वाटलं. श्री कडे जाऊन त्याच्या पोटुशी असलेल्या बायकोचं कौतुक करावसं वाटलं . पण हे इतकं सोपं थोडच होत ? त्यांना एकदम इथे राहण्यात मजा वाटेनाशी झाली. बाहेर पावसानी फेर धरायला सुरुवात केली . पावसाळची अंधारी पसरली. सकाळचे जेमतेम दहा वाजत होते. पण संध्याकाळ झाल्यासारखी वाटू लागली. घड्याळाने पण आळसटल्यासारखे साडेबारा वाजवले. साधारण स्वयंपाक करून दोघांनी जेऊन घेतले.
विनायकराव वरच्या बाल्कनीत येउन उभे राह्यले. पावसाच्या झडीने उभं राहणं फ़ारकठीण गेलं. वारा घू घू ...... आवाज करू लागला. वातावरणात थंडी निर्माण झाली. त्यांनी शाल अंगाभोवती घट्ट गुंडाळून घेतली. समोरचे डोंगर दिसेनासे झाले. हिरवं जंगल नाचण्याचा ताल धरू लागलं. त्यांनी आत येऊन एक पुस्तक न बघता काढलं. आज एकदम त्यांना मोकळं आणि बंधनं तोडून वागावसं वाटत होतं. मधून मधून त्यांना आपणही हवेसारखे हलके झालो तर काय मजा येईल असं वाटलं. ते स्वतःशीच हसले. त्यांनी हातातलं पुस्तक उघडलं.ते होतं प्रो. चंदनशिवे यांचं. पुस्तकाचं नाव होतं, ''माणसाच्या हातात नसलेल्या गोष्टी. "" त्यांना आपण निवडलेल्या पुस्तकाचं आश्चर्य वाटलं.
सध्याच्या परिस्थितीशी ते त्या शीर्षकाची सांगड घालू लागले. त्यांना ते काही जमेना. मग त्यांना डुलकी लागली. आणि ते झोपले. साधारण तासाभराच्या झोपेनंतर ते जागे झाले. हातातलं पुस्तक छातीवरून पोटावर आलं होतं. कसेतरी चार वाजले. रत्नाबाई झोपून उठल्या. वेळ जात नव्हता. म्हणून त्यांनी चहा केला. विनायकराव खाली आले. दोघांचा चहा झाला. अर्धा पाऊण तास त्यात गेला. पावसाची अंधारी कमी व्हायला तयार नव्हती. पावसाचा जोर मात्र कमी जास्त होत होता. सूर्यानी बहुतेक सुटी घेतली असावी. किंवा तोही त्याच्या सेकंड होममध्ये राहायला गेला असावा. अशी एक कल्पनाही विनायकरावांना चाटून गेली. त्यांना सगळ्या गोष्टींच कसं नवल वाटलं.माणसानी गजबज नको , गर्दी नको असं म्हंटलं तरी आवाजाची त्याला एवढी सवय असते की त्याला शांतता बोचू लागते. गर्दीबद्दल आणि कोलाहलाबद्दल तक्रार करणारी माणसं अशा ठिकाणी हतबल होतात. ही म्हणजे त्यांना नजरकैद वाटते. तशी बाहेर आल्यावर कोणाचही बंधन नाही. पण बाहेर येऊन करणार त्तरी काय, असल्या वातावरणात. शांतता हवी , शांतता असं म्हणण्याची नुसतीच फॅशन आहे कि काय अस वाटेल अशा ठिकाणी. माणसाला कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मान्य नसावा. अशी अतिरेकी शांतता नकोशी होते. हिला स्मशान शांतता पण म्हणता येत नाही. ती आणखीन वेगळीच असते.
विनायकरावांचं विचारचक्र शांततेच्या पुढे जाईना. ते कंटाळले.. कशाला घेतला हा बंगला? विकू या का ? असो. आस्ते आस्ते संध्याकाळचे सहा वाजत आले. विनायकरावांना इथे येऊन चोविसतास झाले.
(क्र म शः )