सुधाच्या पाठीवर पाय देऊन आल्यामुळे माझा आणि तिचा छत्तिसाचा आकडा असावा हे उघडच होत.अर्थात इतर भावंडांशी आमची भांडणे होत नव्हती अशातला भाग नव्हता पण या बाबतीत आमच्या दोघांचे विशेष सख्य होत. वय वाढल्यावर त्या भांडणांचे स्वरूप बदलून एकमेकाच्या वस्तु घेण्यासाठी होणारी भांडणे एकमेकांना आपल्या जवळ जे असेल ते कसे देता येईल या विचाराने होऊ लागली. सुधाने माझ्या शिक्षणासाठी आपल्या कडून जे काही करणे शक्य होते ते सर्व केले, किंवा ती होती म्हणूनच खेडॅगावातून शिक्षणासाठी शहरात राहणे मला शक्य झाले त्यामुळे आमचे संबंध नेहमीच अतिशय सौहार्दपूर्ण राहिले. शिवाय तिच्या घरी बडोद्यास अनेकवेळा मुक्काम टाकल्याने मीता आणि विजू ही भाचरेही मामावर फार जीव टाकायची
मग मीता येते आहे असे सुधाचे पत्र आल्यावर मी तिला आणायला स्टेशनवर जावे हे ओघाने आलेच पण त्याला मोडता घातला मीतानेच. तिची गाडी स्टेशनवर येण्यापूर्वी तिच्या मोबाइलवर मी तिच्याशी संपर्क साधल्यावर तिने मला जणू काही दरडावूनच सांगितले ;
" हे बघ मामा माझी गाडी केव्हाही येऊदे तू स्टेशनवर मला न्यायला यायच नाही .आता मी लहान नाही आणि पुणं काही एवढ मोठ शहर नाही की मला तुझ घर सापडणार नाही."
" अग पण तुला इथले रिक्षावाले माहीत नाहीत सगळे पुण तुला दाखवून आणतील" मी तिला चुचकारण्याचा प्रयत्न करीत म्हणालो
' त्याना तरी मीता ही काय चीज आहे हे कुठे माहीत आहे " मला गप्प करत ती म्हणाली.आता मी हट्टाने तिला आणायला गेलो तर माझ्या कारमध्ये न बसता रिक्षाने यायचा आपला आग्रह ती सोडणार नाही याची मला खात्री होती .तिन सांगितल्याप्रमाणे पुणेरी रिक्षावाल्याला इंगा दाखवलाच .पुण्यात पूर्वी फिरलेली असल्यामुळे आणि तिच्या मोबाइलमधील जी.पी.एस.वरून त्यान जरा वाकडी वाट पकडल्याच लक्षात येताच तिन आपल्या तोंडाचा पट्टा असा चालू केला की त्याला 'बाई चुकलो माफ कर " म्हणायची पाळी आली,पण त्याचबरोबर आमच्या घरापाशी बरोबर सोडल्यावर तिने मीटरप्रमाणे झालेल्या रकमेपेक्षा पाच रुपये जास्तच दिल्यामुळे तो रिक्षावालाही तिचे कौतुक करत निघाला, तिन घरात शिरताशिरता तिच्या प्रवासातही तिने बडोद्याच्या स्टेशनमास्तरला कसा सरळ केला हे तिने मला ऐकवलेच.
खरे तर मीता तिच्या कंपनीच्या कामाकरता आली होती पण सुधान आणि प्रकाशने म्हणजे तिच्या नवऱ्यान आमच्यावर आणखी एक कामगिरी सोपवली होती, आणि ती मीतापासून लपवून ठेवली होती,ती म्हणजे पुण्यातल्याच एका लग्नाळू तरुणाची आणि मीताची जोडी जमवण्याची ! हे काम माझ्याच्यान होईलसे मला वाटत नव्हते पण आमच्या सौभाग्यवतीचा या कामातला अनुभव दांडगा असल्याने मी तिच्यावर भार टाकून निश्चित होतो. मी अमेयला म्हणजे त्या तरुणाला पाहिले होते आणि तो मीताला योग्य असल्याची माझी खात्री पटली होती प्रश्न होता तो फक्त मीताला तसे वाटण्याचा आणि घोडे तिथेच पेंड खाणार होते.
अनायासे मध्ये रविवार आल्याने मीताला एक दिवस मोकळा होता त्यावेळी अमेयला जेवायला बोलावून त्याची आणि मीताची ओळख करून द्यायचा आमचा विचार होता.पण अशा बनावाला बळी पडेल तर ती मीता कसली ! शनिवारीच तिन आम्हा दोघाना आणि आमच्या दोन चिल्यापिल्याना घेऊन रविवारी कुठतरी भटकंती करायला जाण्याचा विषय काढल्यावर माझी आणि विद्याची धाब्यावर धारण बसली कारण अमेयला आम्ही सांगून बसलो होतो,अर्थात त्याला मीताविषयी काही सांगितले नव्हते हे आमचे भाग्य ! काहीतरी करून तिला दुसऱ्या दिवशीच्या घरातच जेवण्यास राजी करणे हे अवघड काम होते पण ते विद्याने तिला काय सांगून पार पाडले काही समजले नाही पण दुसऱ्या दिवशीचा घरीच जेवण्याचा कार्यक्रम सहज पार पडला. पण त्यामुळे सुटकेचा सुस्कारा सोडायला मात्र मला उसंत मिळाली नाही कारण अमेयची पाठ फिरताच मीताच्या पट्ट्याला मला तोंड द्यावे लागले.
" मामा काय विचार काय आहे तुझा ?" अमेयचे पाऊल घराबाहेर पडताच तिने मला वेठीला धरत म्हटले.
" कसला विचार ?"मी वेड पांघरत म्हणालो.
' उगीच नाटक करू नकोस, तुझ्या लक्षात आले आहे मला काय म्हणायचे आहे ते , आणि मामी तुझीही साथ असेलच याला " इतका वेळ गम्मत पहाणाऱ्या विद्याला आता हल्ला आपल्यावरही होणार याची जाणीव झाली.त्यामुळे ती बिचारी गप्पच राहिली. मीतानच आपला पट्टा पुढे चालवला,
" हे बघ मामी आणि मामा तूसुद्धा, नीट ऐकून घ्या,माझ्या लग्नाच्या वगैरे फंदात तुम्ही पडू नका.माझ मी पहायला समर्थ आहे."
" अग पण एकाद्या तरुण मुलाशी तुझी गाठ घालून दिली आणि त्याला तू आणि तुला तो आवडला ---- "
" बस बस मला अगोदर लग्न सध्या कराय नाही आणि या पद्धतीन तर मुळी नाही " मीतान मला अगदी तोडून टाकत म्हटले.
मग त्यापुढील तिच्या पुण्याच्या मुक्कामात या विषयावर बोलण्याची आमची दोघांचीही काय बिशाद होती.अर्थात माझी शरणागती मी फोनवरूनच सुधाच्या कानावर घातली.
"अरे जाऊदे,तू मनाला नको लावून घेऊस.प्रकाशसारख्या जमदग्नीलाही तिन गप्प बसवलेय मग तुझा काय पाड?" असे मग तिनेच मला समजावले. आणि पुढ असही म्हणाली,
" अरे तिन आम्हाला दोघानाही असच सांगितलेय. त्यामुळे आम्ही तिचा नाद सोडूनच दिलाय."
" शाबास एवढ माहीत होत तर मग मला कशाला त्या तोफेच्या तोंडी दिलस ?" मी वैतागून विचारले.
" अरे मला वाटल तुझ आणि तिच विशेषत: वहिनीच चांगल जमत तेव्हां म्हटल बघाव काही जमते का तुन्हाला "
मीताचा लहानपणापासून स्वभाव असाच होता.प्रत्येक बाबतीत ती तिचाच हेका चालवल्याशिवाय रहात नसे,अर्थात त्यावेळी तिच्या म्हणण्यात तथ्य असायचे हे मात्र खरे.कॉलेजातही त्यामुळे अनेक प्राध्यापकांनाही तिन नाक मुठीत धरून आपल म्हणण मान्य करायला लावल होत.अगदी कॉलेजच्या प्रवेशापासून तिचा पी. एच. डी चा प्रबंध विद्यापीठात सादर करेपर्यंत कधीच प्रकाश अथवा सुधाला तिन कॉलेजची पायरी चढू दिली नव्हती.तिच्या पदवीदानसमारंभाच्या वेळीच काय ते त्यांना विद्यापीठात हजर रहावे लागले होते.
फार्मसीत मास्टर्स पदवी घेतल्यावर तिला कॅडिलामध्ये नोकरी मिळाली आणि बडोद्याहून तिला अहमदाबादला जावे लागले.तेथे तिच्यासाठी घर वगैरे घेऊन देण्यासाठी तिच्याबरोबर जाण्याची तयारी सुधाने दाखवली पण त्यावेळीही तिन दोघांनाही बरोबर येण्यास विरोध केला आणि तिन एकटीनच तिथे जाऊन बरोबर बस्तान बसवले.तिच्या मैत्रिणीची एक दूरची नातेवाईक अहमदाबादमध्ये रहात होती तिच्यावर तिने अशी छाप टाकली की तिच्या मोठ्या बंगल्यातच रहाण्याचा प्रेमळ आग्रह तिने केल्यावर बडोद्याच्या फ्लॅटपेक्षाही आरामात ती तेथे राहिली.
कॅडिलात दोन वर्षे पूर्ण होता होताच एक दिवस तिन सगळ्या सामानासह बडोद्यात प्रवेश केला आणि आपण पी.एच.डी.करणार असल्याचे जाहीर केले.एम.एस.युनिव्हर्सिटीत तिने प्रवेश घेऊनही टाकला होता.
मीताचे पी एच.डी.चालू असतानाच सुधाच्या छातीवर गाठ आली आणि दुर्दैवाने ती कर्करोगाचीच निघाली आणि त्यावर शस्त्रक्रिया हाच पर्याय होता.त्यावेळी खंबीरपणे या संकटाचा सामना करायला प्रकाशला मीताचाच मोठा आधार होता.शस्त्रक्रियेच्या वेळी मीही विद्याला घेऊन बडोद्यास गेलो. सुदैवाने शस्त्रक्रिया उत्तम झाली आणि त्यानिमित्ताने आणखी एक चांगली घटना घडली.सुधाच्या समाचारास मीतानरोबर मधून मधून एक उंचापुरा युवक येत होता आणि तशाही अवस्थेत सुधाच्या तीक्ष्ण नजरेने ही गोष्ट टिपली आणि थोड्याच दिवसांनी तिने मीताजवळ विषय काढला आणि तिने सहजपणे कबूलही केले. विशाल अगदी मीताला योग्यच मुलगा होता, उंचापुरा निमगोरा आणि तरतरीत.पण होता बिहारी बाबू.त्याचे आईवडील बिहारमध्ये मुझफ्फरपूरला होते.
सुधाची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर हळूहळू सुधारत होती,पण अजूनही ती हॉस्पिटलमध्येच होती.एक दिवस मीताबरोबर कारमधून घरी परत येताना प्रकाशने विषय काढला,
"मीता आता विशालच्या आईवडिलांना भेटून लग्नाची बोलणी करायला हरकत नाही तेव्हां चार पाच दिवसात मी निघेन म्हणतो,आता सुधाची काळजी घ्यायला तुम्ही दोघे आहात आणि विद्यावहिनी पण राहिली आहे तेवढ्याच साठी---"
" पण अप्पा, तुम्हाला जायचे कारण नाही." असे मीताने म्हटल्यावर प्रकाश तिच्याकडे पहातच राहिला.
" म्हणजे लग्बाची बोलणी करायला हवीत ना? खरतर रीतीप्रमाणे आम्ही दोघांनीही जायला हवे पण सुधाला एवढ्यात जाता येणार नाही त्यामुळे मी एकटाच प्रथम जाऊन विशालच्या आई वडिलांची भेट घेतो आणि पुढे काय करायचे ते ठरवतो,तुझा काय विचार आहे ?"
" अप्पा ,अगोदर आईची तब्येत नीट ठीक होऊदे.विशाल काही कुठे पळून जात नाही.आणखी एक गोष्ट सांगते,तुम्ही दोघानीही इतक्या दूर जाऊन विशालच्या घरच्यांची भेट घेण्याचे कारण नाही,ते सगळे माझ्यावर सोपवा."
" म्हणजे ? तू जाणार आहेस की काय लग्नाची बोलणी करायला ?" प्रकाशने जवळ जवळ दरडावून विचारले.
पण मीता त्याला अगदी धुडकावून लावतच उत्तरली,
" अप्पा लग्नाची बोलणी लग्नाची बोलणी काय लावलय सारख ? ही काय भारत पाकिस्तानमधील बोलणी आहेत का अटी ठरवायला ? मी विशालला सांगितले आहे की अप्पा फक्त बडोद्यात लग्न लावून देतील. तुमच्या ज्या नातेवाईकांना यावयाचे असेल त्यांची यादी तयार कर आईची प्रकृती योग्य तेवढी सुधारली की मीच मुझफ्फरपूरला जाऊन त्याच्या मा पप्पाजींची भेट घेणार आहे,तेव्हां तुम्ही त्याविषयी मुळीच विचार करू नका.तुम्ही मुख्य आईकडे आणि तुमच्याकडे लक्ष द्या"
मीताच्या या बोलण्यात तथ्य होते यात शंकाच नव्हती कारण अचानक आलेल्या या आपत्तीमुळे प्रकाशवर मोठाच आघात झाला होता आणि जरी त्याने नेहमीच्या धीरगंभीर वृत्तीने त्याला तोंड दिले असले तरी त्याच्याही प्रकृतीवर त्याचा परिणाम झालाच होता.पण तरीही मुलीच्या लग्नाची बोलणी करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.पण मीताने आपलाच हट्ट चालवला आणि प्रकाशला तो मानावाच लागला.
सुधाची तब्येत हळू हळू सुधारत होती .मोठ्या शस्त्रक्रियेला तिला तोंड द्यावे लागले होते पण ती बऱ्यापैकी सावरली इतकी की तिनेसुद्धा मुझफ्फरपूरला जायची तयारी दाखवली पण तिचे काहीही न ऐकता मीताने एक दिवस विशालला बरोबर घेऊन मुझफ्फरपूरला प्रयाण केले आणि तेथे एकच दिवस राहून दोघे परत आलीदेखील.तेथेही तिने विशालच्या मा पाप्पाजींवर काय जादू केली कोणास ठाऊक पण फोनवर प्रकाशशी बोलताना पप्पाजींना मीताची किती आणि कशी प्रशंसा करू असे झाले होते हे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते.
" प्रकाशजी आप बिलकुल फिकर न करना " आपल्या खास लालूप्रसाद बोलीत त्यांनी प्रकाशला सांगितले. "मीता बिटियाने हमरा दिल जीत लिया है.अब आप जैसा कहोगे वैसाही ब्याह होगा.आप जो करेंगे वही हमे मंजूर है "
प्रकाशची आणि सुधाची मोठीच काळजी दूर झाली होती.
मीताचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात बडोद्यासच पार पडले.प्रकाशही मोठ्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर होता त्यामुळे पैशाची काही काळजी नव्हतीच,पण हुंडा म्हणून एक पैसाही द्यायचा नाही ही मीताचीच नव्हे तर त्याची स्वत:चीही अट होती आणि कोणत्याही प्रकारच्या अटी वरपक्षाने लादायच्या नाहीत असेही त्याचे मत होते विशालच्या मा पप्पाजींनीही कोठलाच आग्रह धरला नाही आणि कोठलाच रुसवा फुगवा न होता लग्न मोठ्या आनंदात पार पडले.
क्रमश: