पत्ता

उन्हाळ्याची तल्खली असह्य होत होती. कार्यालयात बसून दिवस
कसातरी पुढे ढकलण्याची सोय होती, पण संध्याकाळी सात वाजून गेले तरी 'तपत्या झळा
उन्हाच्या झेलीत चाललो मी' याचेच तानापलटे घोकण्याची वेळ येई. तरी बरे, घर आणि
कार्यालय यांत पाच मिनिटांचेच अंतर असल्याने मधूनच घरी येऊन आंघोळून जाता येत
होते.
संध्याकाळी साडेसातचा सुमार होता. कार्यालयातून घरी नुकताच पोहोचलो
होतो.चौथ्यांदा आंघोळून घ्यावे आणि मग थंडगार बिअर रिचवत बसावे असा बेत करून मी बूट
काढतो आहे तोच घरातली लिंबे संपल्याची कलत्रवाणी झाली. लिंबाशिवाय बिअर
म्हणजे सर्दी आणि कोमट पाण्याशिवाय 'मॅन्शन हाऊस'. किंवा कडाक्याचा थंडीशिवाय 'जॅक
डॅनिअल'. पण बूट काढलेच होते तर दिवसभराचे कपडेही बदलले आणि टीशर्ट-अर्धी चड्डी अशा
वेषात फ्लोटर्समध्ये पाय अडकवून परत बाहेर पडलो. 'कोहिनूर'च्या गल्लीच्या कोपऱ्यावर
एक भाजीवाला बसतो. तो नसलाच तर 'सुवर्णरेखा'च्या कोपऱ्यावर नक्कीच असतो.
आमच्या
इमारतीतून बाहेर पडलो आणि पदपथावरच डावीकडे वळलो तो उजवीकडून एक इंडिका काच्चकन
ब्रेक मारत माझ्यापासून चार फुटावर उभी राहिली. 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणून
मी मुकाट स्वतःहून तिच्याकडे गेलो आणि प्रश्नार्थक चेहरा करून चालकाकडे पाहिले.
इंडिका पांढरी होती. तिच्या काचा काळ्याशार होत्या. गाडीक्रमांक तथाकथित मराठीत
"महा १२ क्ष २३८६" (वा तत्सम) लिहिलेला होता. त्या पाटीवरच एकमेकांना भिडलेल्या दोन
तलवारी आणि त्याखाली "भाऊंचा आर्शीवाद" असा धमकीवजा संदेश होता.
पण चालकाला
माझ्याकडून काय पाहिजे होते ते मला या सगळ्या वर्णनाशिवायही लख्ख माहीत होते. तो
मला पत्ता विचारणार होता.
सटवाई कुणाच्या कपाळावर काय लिहिते हे अगम्य असते. पण
माझ्या कपाळावर सगळ्यांना लख्ख दिसेल असे "पत्ते सांगण्यात येतील" लिहिलेले आहे हे
मला एव्हाना कळले आहे.
आणि हे लिहिलेले कुणालाही कुठल्याही कोनातून दिसते हे
विशेष. मग मी पाठमोरा असो, तिरकस असो वा शीर्षासन करीत असो.

याची सुरुवात कुठून झाली? अडीच दशके उलटून गेली त्या घटनेला. वैशाखातल्या टिपूर
चांदण्यात रात्री अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमागच्या गारेगार
हिरवळीवर लोळत वॉकमनचे हेडफोन डोक्याला लावून 'बंगरी मोरी मुरक गयी छांडो' ऐकत
होतो. त्या दिवसांत विद्यापीठात आजच्या पाचपट झाडे आणि एक दशांश सुरक्षारक्षक
होते.
अचानक एक चरचरीत घामाचा वास दरवळला. हा नुसत्या घामाचा वास नव्हता, तर
घाम टेरिकॉटच्या शर्टात मुरल्यावर जसा वास येतो तसा होता. त्यात नुकत्याच ओढलेल्या
'पनामा'चा मंदगंधही होता. अजूनही कसलातरी गंध होतासा वाटले, पण त्याबाबतीत मी
तेव्हा कच्चा होतो.
"हास्टेल पाच कुटंशीक आलं दादा?"
हॉस्टेल क्र
पाचच्या बाजूने येऊन हा सवाल करणारे दादासाहेब म्हणजे सटवाईने माझ्यावर सोडलेला
पहिला बाण. मग तिला त्या शरवर्षावाची चटकच लागल्यासारखी झाली. उसंत म्हणून नाही.
त्यातील काही लक्षात राहिलेले बाण येणेप्रमाणे.

एकदा संध्याकाळी बालभारतीसमोरून मित्रवर्यांसोबत कडाकडा वाद घालत चाललो होतो.
वादाचा विषय आठवत नाही, पण देशाचे/समाजाचे भवितव्य असा काहीसा अतिमहत्त्वाचा असावा.
मित्रवर्य समाजवादी होते, आणि त्या दिवशीच्या वादात त्यांचे पारडे हलके होत चालले
होते. एखाद्या समाजवाद्याला वादात हरवणे म्हणजे काय सुख असते हे जाणकारांनाच समजेल.
तेवढ्यात एक बहुस्तरीय बाण आला.
"निंबूतला जायची गाडी खुटून घावेल
भाऊ?"
"निंबूत कुठे आले? कुठल्या गावाच्या जवळ?"
"न्हाईतं असं करा, निंबूत
असू द्या, फलटणची गाडी सांगा."
"फलटणची गाडी"... इथे मी विचारात पडलो.
नाईक-निंबाळकरांपैकी कुणीही मला तोवर घरी बोलावले नव्हते त्यामुळे फलटणला जाण्याचा
योग आलेला नव्हता (अद्यापही बोलावलेले नाही, त्यामुळे अजूनही योग आलेला नाही). मग
फलटण कुठे आहे हे कसे कळणार?
पण माहीत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे
देण्याच्या क्षमतेवर तर मी प्रशिक्षणाच्या क्षेत्रात उतरलो नंतर. "स्वारगेटला
जावा".
"स्वाराच्या गेटाला मंजी सातार्‍याच्या रस्त्याला न्हवं?"
मी मुकाट
मान डोलावली.
"न्हाई, न्हाई, सातारामार्गे लई लांब होतंय. कोरेगावाला न्हाईतर
औंधाला जायाला सातारा ठीक हाय. सासवडमार्गे न्हाईतं बारामतीमार्गे सांगा".
परत
पंचाईत. जाधवराव आणि पवार या दोन्ही घराण्यांचीही अवस्था नाईक-निंबाळकर
घराण्यासारखीच होती (व आहे). 'पाऊस पडल्याने सामना रद्द' हा मित्रवर्यांच्या
चेहर्‍यावरचा भाव आता शाईच्या डागासारखा पसरायला लागला होता. आणि इकडे निंबूतकर
भाऊराय रंगात येऊ लागले होते. अजून काही वेळ गेला तर ते "सासवड नि बारामती असू
द्या, उलन बटोरला जायाला गाडी खुटून घावेल" असे विचारायला कचरले नसते. शेवटी मी दात
ओठ खाऊन सुटका करून घेतली.
"तुम्ही असं करा, सरळ शिवाजीनगर बस स्टँडला जा. तिथे
शेळकेसाहेब किंवा देशमुखसाहेब कुठे आहेत विचारा. त्यांना सांगा की बँकेतल्या
पटवर्धनसाहेबांकडून आलो. ते सगळी माहिती देतील".
आता शिवाजीनगर बस स्टँडला जर
कुणी शेळके वा देशमुख नसतील तर माझा नाईलाज होता. मी तरी कुठे पटवर्धन होतो?

विशेषतः मी व्यायाम म्हणून चालायला निघालो की हमखास कुणीतरी आडवे येते. एकदा मी
छान दोनेक तास चालून परतत होतो. छातीचा भाता झकासपणे तापला होता. आता घरी जाऊन छान
कोकमसरबत हाणावे असे बेत रचत मी दीपबंगला चौक ओलांडून कॅनॉलच्या रस्त्याला लागलो
आणि एक बुवा आडवे आले. "अहो, मॉडेल कॉलनी कुठे आली?" मी खड्डा खणल्याच्या
अविर्भावात तर्जनीने अधर दिशेला भोके पाडली. मग मलाच जरा दया आली. मी विचारले,
"मॉडेल कॉलनीत कुठे?" "नाही, मॉडेल कॉलनीत एवढेच सांगितलेय". बुवांना त्यांच्या
नशिबावर सोडून चालण्याची लय तुटल्याबद्दल स्वतःशीच चडफडत निघालो.

एकडा व्यायामशाळा ऊर्फ 'जिम' इथे नियमित जाण्याचा किडा मला चावला. ते चावणे मी
मनावर घेतले आणि एका व्यायामशाळेत नियमित जायला लागलो. तिथल्या 'वजने विभागा'त एक
गंमतशीर यंत्र होते. दोन सायकलच्या चाकांसारखी (आणि इतकी) चाके, त्यामधल्या अक्षावर
एक पाठीवर झोपायला सहा बाय तीनचे रेक्झिनने आच्छादलेले फळकूट, त्याला दोन टोकांना
दोन आडणे, आणि तो अक्षात्मक दांडा जमिनीपासून चारेक फुटावर तोलून धरणारी धातूची
आयताकृती फ्रेम. त्या फ्रेमचा पायाही खाली आयताकृती होता. असो. व्यायामशाळेचे दर्शन
घेतलेल्यांना समजेल.
त्याचा उपयोग येणेप्रमाणे असे - चाके फिरवून ते फळकूट
उभे करायचे, त्यावर चढून खालच्या आडण्यात पाय अडकवून उभे रहायचे. मग दोन्ही चाके
हातांनी फिरवत निजण्याच्या अवस्थेला (भूसमांतर) यायचे. चाके फिरवतच राहायची. हळूहळू
जवळपास शीर्षासनाची अवस्था प्राप्त होई. त्याआधी कार्डिओ विभागातला काही व्यायाम मन
लावून केला असेल तर ती अवस्था फारच हवीहवीशी वाटे.
एकदा मी त्या अवस्थेत असताना
मागून स्त्रीस्वर निनादला "एक्स्क्यूज मी, कार्डिओ सेक्शन कुठे आहे डू यू नो?" मी
खाड्कन जागा झालो. या दोन नवमांश मराठी वाक्याला कसे उत्तर द्यावे कळेना. मी
ऊर्ध्व दिशेला बोट केले. माझी शीर्षासन केल्यावरची ऊर्ध्व दिशा. हा दोन नवमांश मराठी प्रकार (महिला आवृत्ती) कार्डिओ सेक्शनचा मजला ओलांडून थेट माझ्यापाशी पत्ता विचारायला
पोहोचला होता. सटवाईला एवढे किरकोळीत काढू नका. आणि वरती 'वा शीर्षासन करीत असो'
लिहिले, ते उगाच नव्हे.

काही वेळेला पटकथेत बदलही होतात. एकदा बेडसे लेण्यांमध्ये गेलो होतो. दुपारचे ऊन
तावत होते. निवांत सावलीला बसून पाणी प्यायलो आणि मग सोबत नेलेल्या मंडळींना
एक्स्प्रेसवे-दर्शन, त्यांचे फोटोसेशन आदि कार्यक्रमांत गुंगलो. एक
कॉलेजकुमार-कुमारी असे जोडपे आमची चाहूल लागताच पलिकडच्या गुहेतून बाहेर आले. "अंकल
(मला आता याचे वाईट वाटत नाही), ये जगा कौनसी है?" हे  छान वाटले. जायचे आहे म्हणून पत्ता विचारण्यापेक्षा जाऊन मग ती जागा कुठली आहे हे विचारणे जास्ती
सुसह्य (मला) होते.
त्याचाच एक भाऊबंद तिकोन्यावर भेटला. वरच्या
झेंड्यापाशी निवांत बसून फडफडणारा टीशर्ट अनुभवत होतो तेवढ्यात एक आंध्रातली
जोडगोळी आली. पंचविशीतले तरुण होते. आपापसात तेलुगूतून कल्लोळ केल्यावर त्यातल्या
एकाने माझी साक्ष काढली "इज दिस तिकोना ऑर तुंग?" त्याला शेजारशेजारचे म्हणजे
लोहगड-विसापूर, आणि तिथून दिसणारे म्हणजे तुंग-तिकोना एवढे माहीत होते. मला अंमळ
भरूनच आले. पुण्यात जन्म काढून वेताळटेकडीवर न गेलेली माणसे मी पाहिली आहेत.
आंध्रातून येऊन एवढी माहिती असणे हे......
परवाच वेताळटेकडीवर खाणीच्या बाजून
पंचवटीकडे उतरत असताना अजून एक नमुना तिकडून चढताना भेटला. "त्या खाणीनंतर उजवीकडे वळले तर तो
रस्ता कुठे जातो? मी त्या रस्त्यावर जाऊन पाहिले, पण काहीच लागले नाही म्हणून परत
आलो. चतुश्रुंगीला तोच रस्ता जातो का? चतुश्रुंगी म्हणजेच वेताळ ना? मग कांचन गल्ली कुठे आली?"
अशाच एका
नमुन्याने मात्र माझी चांगलीच भंबेरी उडवली. स्वाईन फ्लूच्या साथीच्या
काळात (तेव्हा तरी गर्दी कमी असेल म्हणून) एकदा सिंहगडला गेलो होतो. गर्दी खरंच
नव्हती. अगदी वीस वर्षांपूर्वी गेल्यासारखे वाटले. वातावरण ढगाळ होते. त्यात रमतगमत
शेंगा खात हिंडत होतो. तानाजी मालुसरेंच्या समाधीपासून फरसबंदी पायवाटेने खाली
उतरताना एक त्रिकोनी कुटुंब हाशहुश करत तिथवर पोचले. हाशहुश करायचे कारण
म्हणजे चांगलाच वाढलेला तिसरा कोन नवर्‍याच्या कडेवर होता, आणि दुसरा
कोनही पोतेवर्गातला होता. दम टाकत नवर्‍याने मला कुतूहलाने विचारले, "सिंहगडला
कुठून रस्ता आहे?" मला भिरभिरल्यासारखे झाले. तिथल्या दुसर्‍याही एका व्यक्तीने तो
प्रश्न ऐकला आणि माझ्याकडे पाहिले. 'आपण साल्वादोर दालीच्या एखाद्या चित्रात शिरलो की काय?'
अशी वाटणारी शंका त्या दुसर्‍या व्यक्तीच्या चेहर्‍यावरचे भाव वाचून मिटली. नाहीतर मी थेट येरवड्याला जायच्या तयारीला लागलो असतो.

कुठलाही तपशीलवार पत्ता कुठेही विचारणार्‍या उदाहरणांची कमी नाही. ३२७, सोमवार
पेठ हा पत्ता कुठे आहे हे विचारणारे एक साहेब भेटले आयडियल कॉलनीच्या ग्राऊंडजवळ.
आणि "ये भौमाराज बोल किधर है" विचारणारा अण्णा भेटला खडकी बाजारात. अर्थात कुणी
कुठून कुठे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा.

पुण्यात कुठेही गेलो तरी मला पत्ता विचारणारे मागावर येतात यात नवल नव्हे. पण
पुण्याबाहेरही हाच प्रकार चालू राहतो म्हणजे सटवाईचे लिखाण किती पावरबाज असते
बघा.
गुडगांवला आयुष्यात एकदाच गेलो. तिथेही "ओ पाहीसाब, ये सॅक्टर पैताली
कित्थे पडेगा जी?" विचारणारे सरदारजी भेटले.
नागपूरच्या
एकुलत्या दौर्‍यात धरमपेठचा पत्ता विचारणारे महाराज भेटले. नंतर कळाले की ते नि मी
दोघेही धरमपेठेतच उभे होतो. मी चालताचालता दमलो म्हणून. आणि ते धरमपेठचा पत्ता
विचारायला म्हणून.
सातार्‍याला पालेकर बेकरीतून टोस्ट घेऊन बाहेर पडलो तोच
"अजिंक्यतार्‍याचा रस्ता कुटंशी आला" विचारणारे जोडपे भेटले. कोपर्‍यावर एक लोकल
यूथ गॉगल लावून स्वतःला आरशात न्याहाळत खूष होऊन बसला होता त्याच्याकडे ती क्वेरी
रीडायरेक्ट केली. 

आता पत्ता विचारण्याची वेळ माझ्यावर येत नाही असे नाही. पण ते वेगळं असतं. एकतर
मी कुठल्याही गण्या-गंप्याला पत्ता विचारत नाही. ते माझ्या दर्जाला शोभत नाही (असे
मीच ठरवलेले आहे).
पण त्यामुळे एक भानगड बहुतेक वेळेला होते. माझ्या दर्जाचा
गण्या-गंप्या दिसेपर्यंत मी गंतव्य स्थान पार करून पुढे गेलेलो असतो. त्यामुळे
जिकडे जायचे आहे तिकडूनच आलेल्या या नमुन्याकडे माझ्या दर्जाचा गण्या-गंप्या
हताशपणे बघत बसतो.

एकदा त्याच्यावर उपाय म्हणून मी एकदा डोके चालवले. पणजीच्या गल्ल्याबोळांतून स्कूटरने
हिंडत होतो. तासाभराने जायचे होते तालिगांवला. तिथे जायचे कसे? माझ्या दर्जाचा गण्यागंप्या
दिसेना. मग आठवले की तालिगांव हे पणजी-दोना पावला या रस्त्यावर आहे. एक कदंबाची बस
दिसली पणजी-दोना पावला लिहिलेली. तिचा पाठलाग सुरू केला. दहा मिनिटांत पोचलो.
कदंबाच्या पणजी स्टँडला. त्या ड्रायव्हरने परत येताना बोर्ड  बदललेला नव्हता.

परत माझ्या कपाळावरच्या ललाटलेखाकडे. ज्याला ज्याला मी हे सांगतो
त्यातल्या बहुतेकांचे मी अतिशयोक्ती करतो आहे असे मत पडते. माझ्याबरोबर काही
काळ रस्त्यावर काढला की ताळ्यावर येतात. माझ्यासोबत कितीही माणसे असू देत, सटवाईचे
बाण बरोबर माझ्याच दिशेला येतात. मी गाडी चालवत असलो तर डावीकडून आलेला बाण क्लिनर
साईडला बसलेल्या व्यक्तीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून थेट माझ्याशी संवाद साधतो. मी
दुचाकीवर असलो तर सिग्नलला उभे राहिल्याराहिल्या एखादा बाण वेध घेतो. वळणावर वाहन
हळू करावे तर एखादा बाण टपून बसलेला असतो.

परवाचीच गोष्ट. भल्या पहाटे साडेचारला घर सोडले. चांगले भरपूर तीन तास चालावे
म्हणून. अजंता कॉम्प्लेक्सपाशी पौड रस्ता ओलांडला आणि चार पंचावन्नला मुंबईहून आलेल्या एका इंडिगोमधून एक बाण
अचूकपणे आला. "सोलापूरला कसं जायचं?"