वाट वेडी भरकटे पायात माझ्या,
टोचते हे कवडसे डोळ्यात माझ्या.
सारखे हे मरण मी झेलीत आहे,
काय आहे घडत हे भाग्यात माझ्या.
वेग सारे हरवले घोळात जाता,
चालण्याचा समय ना हातात माझ्या.
जागती डोळे उगा रात्रीस साऱ्या,
वेदना ही राहते हृदयात माझ्या.
दुःख आता मिसळले सौख्यात माझ्या,
मी उगा ते लपवले हास्यात माझ्या.
मी तुझी रेष जपली हातात आता,
तू मला आज छळले स्वप्नात माझ्या.