हुरहूर असते तीच उरी...

खूप दिवस झाले.. काय होतय काही कळतच नाही.. वरकरणी सगळ काही चांगल दिसत असताना मनात काहीतरी बेचैनी दाटून का येते? कसलीतरी अपराधीपणाची जाणीव का होत असते?.. कुठल्याही गोष्टीचा मनमोकळेपणे आनंद का घेतला जात नाही?..
मी  एक तीशीच्या उंबरठ्यावरील तरुणी.. एका सव्वा वर्षाच्या गोंडस मुलाची आई.. केवळ लिखाणापुरताच नव्हे तर खरोखरीचा समजुतदार आणि माझयावर जीवापाड प्रेम करणारा नवरा. घर, गाडी, नोकरी सर्व अगदी मनाप्रमाणे..दांड्या मारणारी मोलकरीण,  उद्ध्ट रिक्शावाले,
 सिग्नल तोडणारे वाह्नचालक वगैरे किरकोळ कटकटी सोडल्यास सारे कसे चित्रातल्यासारखे आखीव रेखीव ! तरीही..
कधीकधी खूप उदास वाटते. गलबलून येते.. माहेरी निवांतपणे घालवलेले क्षण मनात रुंजी घालतात.. तो झोपाळा, ते ओटीपुढचे सारवलेले अंगण,त्यात लावलेली जास्वंद, ती नारळ सुपारीची झाडे.. सारे डोळ्यापुढे फेर धरू लागते.. माझ्या सुगरण आईची स्वयंपाक्घरात काम करत असलेली सोज्वळ मूर्ती सारखी आठवत राहाते.. जीव अगदी 'तुटका तुटका' होतो..
माझे बालपण अलिबाग जवळच्या चौल नावाच्या टुमदार खेड्यात गेले. सुदैवाने आई, बाबा, भाऊ, आजी अशी सर्व प्रेमाची माणसे मला मिळाली..
तरीही ५००० रुपयांमध्ये मिळणारे समाधान आज कुठे हरवून गेले? हातात पैसा खेळतोय, पण उन्हळ्यातील कुल्फीची गम्मत महागड्या आइसक्रीम मध्ये का नाही? हट्टाने बाबांकडून
मिळवलेल्या २०० रुपयांच्या ड्रेसपुढे माझे आत्ताचे कपड्यानी भरलेले कपाट फिके का पडते?  लहानपणी घातलेल्या२०रुपयांच्या अंग्ठीची सर आताच्या हिऱ्याच्या अंगठीला का नाही?
सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत असूनही नसल्यासारखी का?..