रावणाची सीता

सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन'
होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची)
होते.
तब्बल साठ कोटींची दौलत ओतून, तेलगू-तमिळऱ्हिंदी अशा तिन्ही
भाषेतील एकूण २२०० रिळे मणिरत्नमने अक्षरशः कचऱ्‍याच्या डबड्यात घातली
आहेत. रावण पिक्चर काढून त्याला 'रत्ने' तर नाहीच पुरेसे 'मनी' देखील
मिळणार नाहीत हे उघड सत्य आहे. रावणाचे ऍडव्हान्स बुकिंग तर सोडाच फर्स्ट
डे फर्स्ट शो सुद्धा कुठेही हाऊसफुल्ल चा बोर्ड मिरवू शकलेला नाही. एकंदर
'रावणा'च्या नशिबी घोर मृत्युदंड आला आहे.
रामायणातील आदर्शवत
व्यक्तिरेखांना काळीमा फासून, प्रेमाचा 'भलताच' त्रिकोण दाखवून
रावणवाल्यांनी प्रेक्षकांचा रोष ओढावून घेतला आहे. केवळ रेहमानचे संगीत,
ऐश्वर्याची स्टंटबाजी, अन् टेक्निकल इफेक्टची भारंभार दृश्ये रावणाची बुडती
नौका तारू शकणार नाहीत असे दिसते...
कथा फारशी वेगळी नाहिये. रावणासारखा
वागणारा, भासणारा अभिषेक बहुतेक नक्षलवादी क्षेत्रात कार्यरत(?) असतो.
तिथला प्रमुखही तोच असतो. स्थानिक लोकांविरुद्ध पोलिसांची चकमक उडते.
त्यावेळी पोलिस अधिक्षक विक्रम (जो रामासारखा वागणारा) अभिषेक विरुद्ध दंड
थोपटतो. त्याला शह देण्यासाठी अभिषेक त्याच्या सीतेला (पत्नीला)
-ऐश्वर्याला- पळवून नेतो व आपल्या इलाख्यात आपल्याजवळ चौदा दिवस 'ठेवतो'.
पूर्वी ऐश्वर्या त्याला रावण समजत असते. परंतु त्याच्या सहवासामध्ये तिला
त्याच्यातला राम अनुभवास येतो. उलट पोलिसांमधीलच रावणवृत्ती तिला कळून
चुकते. ऐश्वर्याच्या बहिणीवर (भर मांडवातून पळवून नेऊन) पोलिसांनीच
अत्याचार केला असल्याचे सत्य तिला समजल्यावर विक्रम हा रावण वाटू लागतो व
अभिषेक राम!
कशीबशी ती अभिषेकच्या तावडीतून सुटका करून विक्रमकडे पोचते.
तेव्हा विक्रमला त्याचा चौदा दिवसांचा 'वनवास' आठवतो. म्हणून तो तिच्यावर
संशय व्यक्त करून तिला जाब विचारतो. थोडक्यात अग्निपरीक्षा देण्यास
प्रवृत्त करतो. त्यावर ती तडक अभिषेककडे जाऊन 'असं कसं काय झालं?' याचा
जबाब दे म्हणते. तोपर्यंत विक्रम मोठ्या ताफ्यासह हजर राहून रावणाचे पात्र
संपुष्टात आणतो. पुढे सीतेचे काय? काही कळत नाही. असो.
एवढा अगडबंब खर्च
करून, इतकी मेहनत घेऊन मणीला कुठली रत्ने गवसली ते (आपल्याला) समजत नाही.
त्याऐवजी मसालापट किंवा आधुनिक रामकथा बनविली असती तर गुंतवलेले भांडवल तरी
वसूल झाले असते.
रामायणातील संदर्भांचा आधार घेऊन काय साधावयाचे आहे
तेही उलगडत नाही. 'रावण'कारांनी सीतेचं अविश्वसनीय किंवा पचनी न पडणारं
प्रेम'प्रकरण' दाखवून या चित्रपटाचं वाट्टोळं केलंय.
हा चित्रपट फार फार
तर ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो.
अभिनयाच्या बाबतीत अभि-ऐश पेक्षा विक्रमची बाजू उजवी ठरलीय. खासदार गोविंदा
स्मॉल बट स्वीट भूमिकेत भाव खावून जातो. रेहमानचं 'ठेकेबाज' संगीत अन्
स्टंटबाजी एवढ्याच काही जमेच्या बाजू. बाकी सगळा आनंदी आनंद आहे!