आला पाऊस गावात
झाली दिवसाची रात
आणि अंधाऱ्या घरात
जळे दुपारची वात
आला पाऊस गावात
वारा सुटला जोरात
शीळ घालितं सुरात
निघे पानांची वरात
आला पाऊस गावात
वाजे ढगांचा नगारा
पक्षी झाले सैरावैरा
कोठे शोधती निवारा?
आला पाऊस गावात
त्याची आगळीच भाषा
ओढी नभावर रेषा
वाजे छतावर ताशा
आला पाऊस गावात
आली गवताला पाती
शेवाळली ओली माती
झाले पाण्याचेच मोती
आला पाऊस गावात
दिसू लागली गांडुळे
लाल पैशाचे वेटोळे
किड्यामुंग्याचे सोहळे
आला पाऊस गावात
पाणी खेळले पाटात
धान्य रुजले शेतात
मोद मावेना उरात
आला पाऊस गावात
ज्वानी पडली प्रेमात
पावसाळी ह्या ज्वरात
आली नवती रंगात
- अनुबंध