गाथा उदकानुभवाची

माझ्या लेखाच्या शीर्षकावरून तुम्हाला पूर्वी लोकसत्ता मध्ये "गाथा बलिदानाची" ह्या नावाने क्रांतिकारकाची माहिती येत असे ती आठवली असेल.... क्रांतिकारकाने स्वतंत्रतेसाठी विविध प्रकारचा छळ सहन केला, मी तसा छळ सहन केला नसला तरी  मी ही काही कमी त्रास सोसलेले नाहीत ....आणि आज मी त्याच त्रासजनक अनुभवांची उजळणी करणार आहे.... निमित्त आहे गेले आठ दिवस पुण्यात आमच्या घरात पाणी न येण्याचं....

हे वाचण्यापूर्वीच सर्व वाचकांना ही सूचना नव्हे धमकी देत आहे की हे वाचताना तुमच्या चेहय्रावर हास्याची लकेर उमटली किंवा तुम्हाला हसू आले तर मी तुम्हाला देखील तुमच्या घरी आठ दिवस पाणी येणार नाही असा शाप देईन....  म्हणून .... सावधान.... हा लेख वाचताना कोणीही हसू नये...

माझ्या आयुष्यातले पाण्याचे त्रास माझ्या लहानपणापासूनच सुरू झाले.... ह्यातला सर्वात पहिला अनुभव मला वयाच्या पहिल्या वर्षी आला.... पाण्यात खेळणे हा माझा आवडता खेळ होता.... त्यावेळी आम्ही सर्वजण म्हणजे माझे आई वडील... माझी मोठी बहीण, आजी आजोबा आणि वडिलांपेक्षा वयाने लहान दोघे काका ... एवढे सगळे आम्ही एकत्र डोंबिवलीत एका इमारतीत चौथ्या मजल्यावर एका तीन खोल्यांच्या घरात राहत होतो.... घरात पाहुणे आलेले होते... सर्वांचे नीट खाणे पिणे झाल्यावर थोडा वेळ बसून, गप्पा ठोकून सर्व पाहुणे आपआपल्या घराकडे पांगले.... माझे काका त्यावेळेस विद्यार्थी दशेत होते... पाहुणे गेल्यावर दोघेही बाहेर भटकायला गेले... आजोबाही काही कामानिमित्त बाहेर पडले...आम्ही बाकी सगळे घरात होतो... मला दुपट्यावर सोडून आईने सगळ्या गोष्टींची आवराआवर  सुरू केली...

खाली राहिलेला एक पाण्याचा ग्लास मी खूप आधीच हेरून ठेवला होता... जसे सगळे जण आपल्या कामात गुंतले तसे मी हळूहळू त्या पाण्याच्या ग्लासाकडे कूच केले... आणि त्या ग्लासमधले पाणी खाली सांडून मनसोक्त खेळायला सुरुवात केली.... काहीच क्षणात मला आई बाहेर येत आहे अशी चाहूल लागली आणि माझी जलक्रीडा थांबवून मी दुपट्याकडे वळले.... आणि मी तर केव्हापासून इथेच आहे अश्या आविर्भावात दुपट्यावर लोळण घातली.... परंतु माझी आईच ती... कसे काय कोण जाणे पण तिचे लक्ष पर्फेक्ट त्या पाण्याकडे गेले... मी पाण्यात बसकण मारलेली असल्याने माझे कपडे ओले झालेले होते... आणि त्यावरून तिने अर्थ लावला की मी माझे नैसर्गिक विधी ह्या कपड्यात उरकले आहेत.... खरे पाहता इतके काम केल्यावर तिने वैतागायला हवे होते मी अजून एक काम वाढवले म्हणून ... पण गोष्ट उलटीच घडली.... मी दुपटे खराब केले नाही ह्या आनंदात तिने माझे २-४ मुके घेतले आणि मला पुन्हा खाली सोडून माझ्यासाठी दुसरे कपडे आणि सांडलेले पाणी पुसण्यासाठी फडके आणायला आत गेली... मला आईवर हसावे की रडावे तेच कळेना... ह्याच क्षणी अचानक कुठूनतरी आजीचे आगमन झाले आणि "घडूSSS नयेSSS तेSS घडले..." माझ्याकडे पाहत पाहत आजीने पाण्यावर पाय ठेवला आणि स्वतःला धरणीमातेच्या कुशीत सोपवले आणि मोठ्याने बाबांना हाका मारायला सुरुवात केली... 

-----------

-------

---

तिच्या पडण्याचा/ओरडण्याचा आवाज ऐकून आई, बाबा धावतच बाहेर आले... त्यांनी तिला उचलून वर दिवाणावर ठेवले.... आजीचा आवाज काही कमी होत नव्हता... ती आईला म्हणत होती .... "तुझ्या मुलीच्या XXX क्रियेमुळे मी पडले.... " समोरच्या ओरडाआरड्यामुळे मी घाबरून भोकाड पसरले....आईला मला पाहायचं की आजीला हेच कळत नव्हते....

फायनली बाबांनी शेजारच्या काकांना सोबत घेऊन आजीला दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली.... आईने मला कडेवर घेतले.... आणि आई म्हणाली.... "ना गं माझी शोनुली.... तुला नाही हं आजी मला रागावली...."

डॉक्टरांच्या निदानानुसार आजीच्या पायाच्या जॉइंटचे हाड व बॉल तुटला होता...  त्याचे ऑपरेशन झाले....  पुढे आजी नॉर्मल चालू लागली पण नंतर तिने अनेक वर्ष आईला ह्यावरून ऐकवले.... ह्या घटनेने आजीचे माझ्यावरचे प्रेम अजिबात कमी झाले नाही.... कारण सगळा दोष आईने स्वतः पेलला होता....

पण ह्या घटनेपासून माझ्या आयुष्यात पाण्यामुळे निर्माण होणाय्रा संकटांचा/ पाण्याच्या त्रासाचा प्रवेश झाला....