गाथा उदकानुभवाची - भाग २

डॉक्टरांच्या निदानानुसार आजीच्या पायाच्या जॉइंटचे हाड व बॉल तुटला होता...   त्याचे ऑपरेशन झाले....   पुढे आजी नॉर्मल चालू लागली पण नंतर तिने अनेक वर्ष आईला ह्यावरून ऐकवले.... ह्या घटनेने आजीचे माझ्यावरचे प्रेम अजिबात कमी झाले नाही.... कारण सगळा दोष आईने स्वतः पेलला होता....

पण ह्या घटनेपासून माझ्या आयुष्यात पाण्यामुळे निर्माण होणाय्रा संकटांचा/ पाण्याच्या त्रासाचा प्रवेश झाला....

माझ्या लहानपणीच्या बय्राच घटना मला आठवतात... असा एकही पावसाळा मला आठवत नाही जेव्हा मला भिजण्यामुळे त्रास झालेला नाही.... पाण्यावर प्रचंड प्रेम... पण ते मला कधीच सोसवलं नाही....

पावसाळ्यात आपण कुठल्याही प्रकारचा रेनकोट घातला किंवा छत्री कितीही सांभाळली तरी आपण जरा सुद्धा ओले झालो नाही असे होऊच शकत नाही....

शाळेत असताना पहिली ते सहावी मुलांना खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट, आणि मुलींना मुलांसारखाच पांढरा शर्ट आणि वरून फिकट निळा पिनोफ़्रॉक असा ड्रेस होता. तेव्हा वरूणराजाची सुद्धा भूमातेवर कृपा होती...आणि दरवर्षी तो मनापासून तिला हिरवा साज चढवायचा.... रोज नित्यनेमाने पाऊस पडायचा... आणि मी शाळेत जाताना थोडीशी का होईना पण भिजायचे.... मीच नव्हे सगळेच थोडे थोडे भिजायचे.... वर्गात शिरतानाच बाई प्रत्येकाचे कपडे नीट तपासून पाहायच्या.... आणि ज्या मुलाची चड्डी किंवा मुलीचा फ्रॉक ओला झाला असेल तो काढून खिडकीच्या गजावर वाळत घालायच्या.... (हे पहिली ते चौथी पर्यंत केले जात असे.... मुलांना एक एक्स्ट्रॉ चड्डी आणि मुलींना पेटीकोट/स्कर्ट/फ्रॉक आणायला सांगितलेला असायचा.... आणि पांढरे शर्ट असायचेच घातलेले...) माझे घर शाळेपासून २ मिनिटांच्या अंतरावर असल्याने माझ्यावर ही वेळ फारच कमी येत असे.... पण एके दिवशी एका गाडीने माझ्या अंगावर पाणी उडवले आणि माझ्यावरही ही वेळ आली.... आणि माझाही पिनोफ्रॉक इतर मुलींच्या फ्रॉकसोबत खिडकीच्या गजावर आरूढ झाला... अख्खा दिवस माझं लक्ष "कोणी माझा फ्रॉक नेणार तर नाही ना.... वाय्राने तो उडून जाणार नाही ना..." ह्या विचाराने खिडकीवर होतं.... सुदैवाने असं काही झालं नाही... पण वेगळाच प्रकार घडला.... 

शाळेतून निघायच्या आधी ५ मिनिटे बाई सगळ्या मुला-मुलींना वाळलेले कपडे घालून देत असत.... आणि आपला फ्रॉक/ चड्डी घालून झाली की मुले पळतच बाहेर पडत असत.... सगळ्यांचे कपडे घालून होत आले आणि माझी वेळ आली.... बाईंनी माझा फ्रॉक शोधून काढला आणि मला घातला.... आणि पाहते तर काय.... गुडघ्याखाली ३-४ इंचे लांब असलेला वाढत्या मापाचा माझा फ्रॉक कसाबसा मांडीपर्यंत येत होता... हा प्रकार पाहून बाईंनाही काही कळेना.... हा फ्रॉक असा इतका कसा आकसला? मी रडायला लागले.... बाईंना काहीच कळत नव्हते....  एव्हाना बाकीच्या राहिलेल्या मुलांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली होती.... "आधी त्यांना कपडे घालून देते आणि मग आपण तुझा फ्रॉक पाहू हं" बाई इतर मुलांना आधी आवरून देणार आणि माझा फ्रॉक लहान झाला असूनपण मला शेवट ठेवणार हे कळल्यावर मी अजूनच मोठ्याने रडायला सुरुवात केली.... मग बाईंनी मला मांडीवर घेतले, माझे डोळे पुसले आणि मला म्हणाल्या, "रडायचं नाही.... शहाणी ना तू .... मी तुला सोडायला घरी येईन हं" हे ऐकल्यावर माझी कळी खुलली.... आणि मी शांत झाले....

बाई खरंच मला घेऊन घरी आल्या.... आणि आई आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की माझा फ्रॉक आकसला नसून हा दुसय्रा मुलीच्या फ्रॉकशी बदलला गेला आहे.... दुसय्रा दिवशी आईने मला तो फ्रॉक नीट धुऊन इस्त्री करून एका पिशवीत घालून दिला आणि म्हणाली "बाई सांगतील ह तुला काय ते.... हा फ्रॉक आपला नाहीये ना.... मग तो जिचा आहे तिला तो नीट द्यायला हवा..."

पडत्या फळाची आज्ञा मानून मी तो फ्रॉक घेऊन शाळेत गेले.... पण माझे लक्षच लागत नव्हते.... "हा माझा फ्रॉक नाही तर मग माझा फ्रॉक आहे तरी कुठे..? " सारखे माझे लक्ष इतर मुलींच्या फ्रॉक कडे जात होते.... आणि बाईंनी कुणाला काही विचारायला उभं केलं की मी त्या मुलीच्या फ्रॉकची उंची पाहत होते.... सगळ्यांचेच फ्रॉक नीट मापाचे होते? मग माझा फ्रॉक??? / मला सारखे रडू येत होते....

आठ दिवस बाईंनी माझा फ्रॉक कुणाकडे गेलाय हे शोधायचा खूप प्रयत्न केला... पण कोणाकडूनच फ्रॉक मिळायची चिन्ह नव्हती... बाईंनी अथक प्रयत्न केले.... रोज ज्यांचे फ्रॉक ओले होत त्यांचे फ्रॉक वाळत घालताना त्या २-२ वेळा पाहत असत.... बरं सगळ्यांचेच कपडे ठराविक दुकानातले... त्यामुळे ब्रँड / लेबल वगैरेवर काहीच ठरवता येत नव्हते.... बरं कोणाच्याच आईने मुलीसोबत चिट्ठी वगैरेही पाठवली नव्हती.... मी रोज तो लहान फ्रॉक घेऊन येत असे... आणि त्याची मालकीण काही, काही केल्या सापडत नसे....

शेवटी आईने माझ्यासोबत बाईंना एक चिट्ठी पाठवली ज्यात असे लिहिलेले की आता फ्रॉक शोध मोहीम पुढे नको चालवायला.... जर कोणी स्वतःहून आलेच तर तो फ्रॉक देऊ आपण पण माझा फ्रॉक शोधायचे काम आता राहूदे.....

मला काहीच कळत नव्हते.... माझा नवा फ्रॉक असा कोणी कसा नेला? आणि तो परत का देत नाहीयेत? आणि आई बाईंना फ्रॉक नका शोधू अस का म्हणतेय??? मग माझं कसं होणार?  आईला आता खडसावूनच विचारायचं अशा तयारीत मी घरी गेले आणि पाहते तर काय??? आईने माझ्यासाठी नवा फ्रॉक आणला होता....  

मागचं सगळं विसरून मी पुन्हा शाळेत रुळले.... तरी माझं इतर मुलींच्या फ्रॉककडे लक्ष जातच होतं.... ह्या वेळीही पावसाने आणि पर्यायाने पाण्याने माझ्या फ्रॉकचा/ माझा घात केलेला आणि आईबाबांना पुन्हा खर्चात पाडले होते....