ऐकून आहे बऱ्याच काळापासून ह्या काळाबद्दल बरेच काही
उदा.'काळाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत..' इत्यादी इत्यादी
पण प्रत्यक्षात काळही पेपर सोडविताना
कठीण प्रश्न ( उदा. माझा प्रश्न ) ऑप्शनला टाकून
सोडवतो छोटे, हमखास गुण देणारे 'अपेक्षित प्रश्नसंचातील' पर्यायी प्रश्न
आणि मग मिरवतो टक्केवारी
'गुणवंत' म्हणून
कौतुक समारंभातून, हिंडत फिरतो
दूरदर्शनवर मुलाखती देत,
फ्लॅश बल्बच्या लखलखाटात.
त्याच्या यशोगाथेत लपून जातात
त्याची अपयशे (उदा. माझा प्रश्न )
आणि मी त्याला विचारायला जातो तेव्हा
त्याची आई मला परतवून लावते दारातूनच
आणि सांगते 'तो आता यापुढे कोणालाही भेटणार नाही'
आणि थाडकन् दार आपटते माझ्या तोंडावर!
आणि मी परत जातो निमूटपणे जुन्या,"सोडवलेल्या" प्रश्नपत्रिकेत
पुन्हा बऱ्याच काळापासून बराच काळ
अनुत्तरित राहण्यासाठी..