झांसीराणी लक्ष्मीबाई -२

बुंदेले हर बोलो के मुह - हमने सुनी कहानी थी ।
खुब लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी !
राणी लक्ष्मीबाईंच्या स्वातंत्र्य समरातील आहुतीला १८ जुन रोजी जवळपास दिडशे(१४७) वर्ष पूर्ण होतील त्यानिमीत्ताने त्या समरातील विरांना एक श्रद्धांजली."१८५७ चा स्वातंत्र्य समर" ह्या स्वा.वीर सावरकर ह्यांच्या पुस्तकातील काही भाग घेउन त्याची इतिहासाशी जोडणी केली आहे.
=====================================================================


 होय ! तीच ही गर्जना.... जीने इंग्रज साम्राज्याला ललकारलेले होते. काल्पीच्या किल्याचा आश्रय सुटतांच ती प्रथम गोपाळपूर च्या वातावरणात गुंजली...पण ह्यावेळेस आशेचे चिन्ह राहिलेले नव्हते. नर्मदे पासून यमुने पर्यंत व पुढे हिमालयापर्यंत इंग्रजांनी सर्व प्रदेश जिंकून घेतला होता. जवळ सैन्य उरले नाहे, एका किल्ल्याचाही आधार नाही. पराजयाने व द्रव्य संपल्याने नवीन सैन्य मिळण्याची आशा नाही.
 एक काय तो तात्या टोपे उरलेला ! गोपाळपूरला तात्या परत आले होते.  कानपूर पडतांच काल्पी व काल्पी पडतांच कुठला तरी प्रदेश बगलेत मारणे आवश्यक होतेच. वडिलांच्या भेटीचे निमीत्तमात्र करून ग्वाल्हेरला भेट देण्यास गेलेला हा क्रांतीविर ग्वाल्हेर फोडूनच परत गोपाळपूराला रावसाहेबांना भेटण्यास आला. ग्वाल्हेरात गुप्त रुपाने वावरीत त्यांनी सैन्याच्या मुख्य अधिकाऱ्यांची वचने घेतली. दरबारी व सरदारी पुढाऱ्यांकडून लागेल ते सहाय्य मिळवण्यात त्यांना यश आले होते. ग्वाल्हेरची खडान खडा माहिती काढून व तिथले सिंहासन भुंग्या प्रमाणे पोखरून परत रावसाहेबांना जावून गोपाळपूरास मिळाला.
 


तात्या टोपे गोपाळपूरास येताच सर्व मिळून निघाले ग्वाल्हेर सर करायला. २८ मे ला सर्व येउन थडकले आमेन महालात. शिंद्याला पत्रही पाठवलेले होतेच."आम्ही तुमच्याकडे स्नेह भावाने येत आहोत.  पुर्वीचा संबंध ध्यान्यात ठेऊन साह्य करावे म्हणजे आम्हांस दक्षिणेकडे जाता येइल." ह्या पत्राचे प्रत्युत्तर म्हणून शिंद्यांनी १ जुनला आपली खास बालेघाटी फलटण व सर्व सैन्य सज्ज करून श्रीमंतांवर चालून आला. आपल्या स्वदेशध्वजाला मिळण्यासाठी जयाजी शिंदे येतो आहे असे वाटत असतांनाच राणीच्या लक्षात त्याचा कावा आला. "वंदन नव्हे तो ध्वज भंजन करण्यास येत आहे" म्हणत राणी आपल्या ३०० स्वारांसह पुढे घुसली व समशेर उपसून शिंद्यांच्या तोफांवर तुटून पडली. तेव्हढ्यात तीला जयाजी शिंदे दिसला. क्रोधाने भडकलेली ही धावती वीज मस्तकावर तडाडकन आदळताच शिंदेंची दाणादाण उडाली.    त्याच्या बालेघाटी सैन्याचा असा बोजवारा उडत असता, तिकडे त्याच्या इतर सैन्याने तात्या टोपेंना पाहताच लढण्याचे नाकारले व सर्व सैन्य तात्यांस जावून मिळाले. तेव्हा जयाजी उर्फ भागोजीराव शिंदे व त्याचे दिवाण दिनकरराव ह्यांनी ग्वाल्हेरचे रणच नव्हे तर सिंहासन सोडून आग्र्याकडे धुम ठोकली.


ग्वाल्हेर शहराने रावसाहेबांचे स्वागत मंगलवाद्यांचा कडकडाट करून केले. ग्वाल्हेरचा द्रव्यभांडार अमरचंद भाटियाने श्रीमंतांना अर्पण केला. ग्वाल्हेरांत स्वातंत्र्यविरांना सहानुभूती दाखवणारे कैदेत होते त्यांची मुक्तता झाली. स्वदेश व स्वधर्माला ग्वाल्हेर जागले...


राजा स्वदेशास मिळत नाही पण ग्वाल्हेर स्वदेशास साथ देते असे चित्र तयार झाले. मग स्वदेश शिंद्यांना कुठून मिळणार ? तोफा स्वदेशाकडे, पायदळ स्वदेशाकडे, घोडदळ स्वदेशाकडे......सर्व सरदार व मानकरी स्वदेशासाठी, सर्व देव व देवालये स्वदेशासाठी , सर्व ग्वाल्हेर स्वदेशासाठी. 


पण शिंदे ? ...... ते मात्र इंग्रजांकडे व इंग्रजांसाठी.... मग ग्वाल्हेर कुठून त्यांना साथ देणार ? 


३ जुन १८५८ ला ग्वाल्हेरने स्वराज्यभिषेक केला तो श्रीमंतांचा.... !
सर्व अपापल्या एतमामाप्रमाणे आसनांवर विराजमान होते...... सरदार, मुत्सद्दि, शिलेदार, सेनाधिकारी, अरब, रोहिल, पठाण, रजपूत, रांगडे, परदेशी, आणि इतर वीरश्रेष्ठ आपापल्या सैनिकी पोषखात सशस्त्र श्रीमतांना दाखल झाले. श्रीमंतांनी सर्वांची योग्य दखल घेतली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले....
रामराव गोविंदांना मुख्य प्रधानकी तर तात्या टोपेंची सरसेनापती पदी निवड झाली......


तात्या टोपे..... कुठलेही राज्य नव्हते त्यांच्या जवळ ..... कुठल्याही संस्थानाचे ते संस्थानिक नव्हते...... तरीही ... बिऱ्हाड पाठीवर बांधून हा विर देशभर शिर तळहातावर घेवून वणवण फिरला..... कुणासाठी ? कशासाठी ?? फक्त स्वातंत्र्यासाठी !!!   मग तो सरसेनापती होणार नाही तर कोण होणार ?


सर्व हिंदू संस्थानिक लढले.... मेले.... अमर झाले..... पण जेव्हा त्यांच्या स्वतःवर बालंट आले तेव्हा ..... लढले ... फक्त स्वत:चे संस्थान वाचवण्याच्या हिशेबाने... तात्या एकटे देशाच्या स्वातंत्र्याच्या हिशेबाने लढले होते म्हणून त्यांची निवड केली गेली ती सर सेनापती म्हणून !



त्यानंतर श्रीमंतांनी अष्ट प्रधान नेमले, वीस लाख रुपयांची सैन्यात वाटणी केली, सर्वांना योग्य तो मान मरतब मिळाल्याचे सुख श्रीमंतांनी पाहीले...
 आंग्ल सेनेला या नवीन प्रकट झालेल्या सिंहासनाच्या स्थापनेने पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला होता. आणी हेच उद्देश तात्यांचे व रावसाहेबांचे होते कारण ह्याची वार्ता मिळताच सर ह्यु रोज विश्रांतीची व प्रकृती अस्वास्थाची कल्पना पाठीस घालून रणांगणात येण्यास सिद्ध झाला.  सर ह्यु रोज ने कुणालाही कानोकान खबर न लावता मोठे सैन्य व तोफखाना जमवायला सुरूवात केली. इंग्रजांची कुटील रणनीती मर्द मराठ्या तात्याच्या नितीच्या वेगळी होती. इंग्रज निकालाला महत्व देत.... तात्या नितीमत्तेला...! विजय कुणाचा होणार हे काळ ठरविणार होता....


अचानक इंग्रजी फौजा मुरार ला दाखल झाल्याची वार्ता पोहचली अन तात्यांच्या मर्जी विरूद्ध त्यांना इंग्रजांचा बिमोड करण्यासाठी मुरार पर्यंत धाव घ्यावी लागली... चुकलेल्या ठोकताळ्यांचे हिशेब वर्षोनूवर्ष देशाच्या जनतेला मोजावे लागतात.....


सर ह्यु रोज आपल्या उत्कृष्ठ सेनेच्या बरोबर ग्वाल्हेर वर चालून आला. तो पर्यंत तात्या टोपेंनी जोरदार लढाई केली पण मुरार वाचवण्यात त्यांना यश आले नाही(१६ जून १८५७) इंग्रजांनी मुरारची छावणी जिंकून घेतली. सर ह्यु रोज बरोबर पळून गेलेला शिंद्याही आलेला होता. त्याने ग्वाल्हेरच्या भोळ्या लोकांना स्वामिनिष्ठेच्या आवरणाखाली फुटवण्याचा प्रयत्नही केला. मुरारची छावणी जाताच समरसेनेला पुन्हा अवसान भरले पण अपयशाची चिन्हे दिसू लागताच फाटाफूट होत चालली.


                                                     उर्वरीत भाग.... १८ जुन रोजी...


माधव कुळकर्णी.