झांसीराणी लक्ष्मीबाई - ३ ~ शेवट ~

बुंदेले हर बोलो के मुह - हमने सुनी कहानी थी ।
खुब लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी !

राणी लक्ष्मीबाईंच्या स्वातंत्र्य समरातील आहुतीला १८ जुन रोजी जवळपास दिडशे(१४७) वर्ष पूर्ण होतील त्यानिमीत्ताने त्या समरातील विरांना एक श्रद्धांजली."१८५७ चा स्वातंत्र्य समर" ह्या स्वा.वीर सावरकर ह्यांच्या पुस्तकातील काही भाग घेउन त्याची इतिहासाशी जोडणी केली आहे.
==========================================


............................ अपयशाची चिन्हे दिसताच फाटाफूट होऊ लागली.


परंतू असल्या बिकट प्रसंगीही रणलक्ष्मी लक्ष्मीराणी अचंचल निश्चयाने तलवार घेऊन तयार आहे. तिला आता धास्ती कसली ? आशा आणी निराशा ह्यांना तिने पायाखाली तुडविले आहे. ऐहिक वैभवाची तिला किळस आलेली आहे. आता एकच महत्वाकांक्षा उरली आहे - लढत लढत रणांत मरेपर्यंत हा स्वातंत्र्यध्वज माझ्या तलवारीने ताठ तोललेला असो! ती किंवा तो धुळीत न पडता रणांत पडावा ! तिने त्या बेबंद सैन्याची शक्य तितकी व्यवस्था केली व आपण पूर्व बाजूचे संरक्षण करण्याचे काम अंगावर घेतले.
तिने नेहमीचा लष्करी पोषाख अंगावर चढविला, उमद्या घोड्यावर ती स्वार झाली, तिने म्यानातून आपली रत्नजडीत समशेर बाहेर काढली व आपल्या सैन्याची कडक कवाईत घेऊ लागली ! तिने कोटाकी सराईच्या बाजूने आपले मोर्चे उत्कृष्ठ तहेने सज्ज केले. अश्या ह्या युद्धदेवीच्या सैनापत्याखाली तिच्याच तेजाचे अनुरूप असे अतुल सैन्य असते तर ? अतुल नसलेले ते सैन्यदेखील तिच्या या रणोत्साहाने वीरावून गेले - कारण इंग्रजी सैन्य दिसतांच जिकडे तिकडे कर्ण, तंबूर, रणभेरी वाजू लागून आकाशमंडळ दणाणले. व राणी तिच्या निवडक स्वारांसह रणात समशेर चमकावीत तळपू लागली. तिच्या बरोबर 'मंदर' व 'काशी' ह्या तिच्या जिवलग दासीही तळपत आहेत.
 


राणी लक्ष्मीबाई आज शौर्यस्फूर्तीच्या शिखरास पोहचली. आकाश धूराने,धुळीने, रक्ताने,निनादाने व गर्जनेने जरी खच्चून भरलेले होते तरी तितक्यातूनही ती विजेसारखी चमका मारून निराळी पडत होती! तिच्या फळीवर स्मिथचा वारंवार मारा झाला. पण तिने तिच्या सैन्याची फळी फुटू दिली नाही. दिवसभर ती लढत होती. तिचे सैन्य जोषास चढून तिच्या समशेरीबरोबर शत्रुंना सपासप कापत होते. अखेर स्मिथ हटला. त्याने तिची फळी फोडण्याचा नाद सोडून दिला, व त्या काळसर्पीणीच्या बिळाची दिशा सोडून दुसया बाजूला तो वळू लागला.  
   


जूनची १८ ता. उजाडली. इंग्रजी सेनेचा दिवस अमोघ होता. निरनिराळ्या दिशांनी ग्वाल्हेरवर चढाई करीत आज ग्वाल्हेर घेण्यासाठी त्यांनी शिकस्त चालविली. इतर दिशांकडे खुद्द सर ह्यू रोज गेलेला होता व झाशीराणीच्या दिशेला तो कालचा परतवलेला परंतु आज हट्टास पेटलेला व नव्या कुमकीने सबळ झालेला योद्धा 'स्मिथ'च  चालून आला. राणी आपल्या दळासह सिद्धच होती.
 आज डोक्यास भरजरीची चंदेरी बत्ती, तमामी अंगरखा, पायात पायजमा आणि गळ्यात मोत्यांचा कंठा रुळत होता.
 भात्यातून बाण ~ मेघांतून विज ~ गुहेतून सिंहीण ~ तशी घोड्यावर तळपणारी लक्ष्मीबाई ~ हातातली समशेर उपसून शत्रूवर सरळ चालून गेली. इंग्रजी योद्धे मी मी म्हणणारे पण तिच्यासमोर बेजार झाले.
  "तिने आपल्या सैन्यासह तत्काल, अखंडीत व भयंकर हल्ले चालू केले आणि जरी तिचे सैन्य पुन:पुन्हा धारातीर्थात बुडून एकसारखे कमी कमी होत चालले, तरी राणी सर्वांच्या पुढे तळपत चाललेली दिसे. तिच्या भंगलेल्या सैन्यास पुन्हा गोळा करीत व शौर्याचे उत्कर्ष गाजवीत रणावलेली दिसे !" असे इंग्रज इतिहासात लिहीले आहे.
 तिची बाजू अशी अतुल शौर्याने झुंजत असता, इतर बाजूंनी समरविरांना भंगवून इंग्रजी सैन्य तिच्या पिछाडी वर गर्जत आलेले तिला दिसले. तोफा बंद झालेल्या, सैन्य उधळून गेलेले, जवळ १५-२० घोडेस्वार काय ते शिल्लक, चोहोबाजुंनी इंग्रजी विजयी लगट ! राणी लक्ष्मीने आपल्या दासीसह तो शत्रुचा कोट फोडून समरविरांच्या मुख्य भागास मिळण्यासाठी घोड्यास टाच दिली - मागोमाग हुर्सास फलटणीचे आंग्ल स्वार चित्त्याप्रमाणे गोळ्या सोडीत मागे पडले. तरी ती झांशीची राणी समशेरीने सपासप मार्ग काढीत पुढे जात होती. मागे तिच्या दासीला फिरंग्यांनी घेरले व यमसदनास धाडले - राणीच्या हे लक्ष्यात येताच तीच्या दासीच्या मदतीसाठी ती मागे फिरली - चवताळून त्या फिरंग्यांवर धावली, तिच्या एकेका वारात एकेक शिर धडावेगळे होत होते ! दासीच्या वधाचा बदला घेउन ती परत समरविरांच्या मुख्य प्रवाहाला मिळण्यासाठी घोडदौड करू लागली. 


एका लहानशा ओढ्याला येऊन ती भिडली. एक उडी व शत्रूच्या टप्प्यातून निसटलीच ! परंतू घोडा उडी घेईना- मांत्रीकाच्या विस्तवाचे वर्तुळ जणू त्याच्या भोवती पसरलेले होते- तो घोडा त्या ओढ्याच्या भोवती भोवती फिरे पण उडी घेईना ! तिचा तो रणांगणात प्रथीत झालेला जुना घोडा जर आज असतां ! तोवर द्ष्टीक्षेपात इंग्रजी सैन्य आले ! अन क्षणार्धात तिच्यावर कोसळले !! पण तिच्या तोंडून शरणाचा शब्द नाही !!! त्यांच्या अनेक तलवारींशी तिच्या समशेरीचे एकुलते एक पाते भिडले !


 समोरच्या अघाताशी तिने खडाखड खटका उडविला, पण एका फिरंग्याने तिच्या मस्तकावर मागून वार केला ! त्या वारासरशी तिच्या मस्तकाचा दक्षिण भाग विच्छीन्न होऊन तो नेत्रही बाहेर आला !! - तितक्यात तिच्या छातीवर समोरून वार झाला अन मग चारही बाजूंनी !!! लक्ष्मीच्या शरिरातला शेवटचा रक्तबिंदू गळू लागला-"समर देवते, हा घे तूला शेवटचा बळी" असेच जणू सुचवित असावा! तसल्या आसन्नमरण स्थितीतही त्या मानिनीने आपल्यावर वार करणाया त्या गोया सार्जंटचा चुराडा केला... धन्य ती राणी आणी धन्य तीला जन्म देणारी ती भारतभूमी !
 ती शेवटचे श्वासोश्वास करू लागली. इमानी सेवक रामचंद्रराव देशमुख जवळ पोहचले-त्यांनी त्या स्थानावरून त्या जखमी वाघीणीला दुर नेण्यात यश मिळवले-रक्ताने लाल झालेली ती रणलक्ष्मी रणशय्येवर पहुडली- गंगादास बाबांनी तिला शितजल दिले व तीचा प्राण-तो दिव्य आत्मा-तिच्या मृण्मय पिंजयातून उडून अंतर्धान पावला. तिचे निधन होताच रामचंद्ररावांनी जवळच्या गंजीतल्या गवताने तिची चिता रचली-गादिवर नव्हे... चितेवर-ती स्वतंत्र्य राणी सारखीच लढता लढता अमरत्वाच्या मंदिरात विराजमान झाली ! सत्तावन्न च्या स्वातंत्र्य समरातील अग्नीकल्लोळाची ही शेवटची ज्वाला स्वर्गाकडे गेली ! 


अशी ही रणलक्ष्मी लक्ष्मीराणी - कृतकिर्ती - कृतकृत्य विभुती राष्ट्राच्या अस्मितेला सफलता देते. अत्युत्तम सद गुणांची  ही मंजूषा होती.


जातीने स्त्री ......
 वयाने पंचविशीच्या आत.......
  रुपाने खुबसूरत............
   वर्तनाने मनमोहक.........
     प्रजेची प्रिती.....
      आचरणाने सच्छील.....
        स्वदेश भक्तीची ज्वाला....
         स्वातंत्र्याची स्वतंत्र्यता......
            मानाची माननियता.....
              रणाची रणलक्ष्मी........
               भारतभूमीची सुकन्या......
                 झांशीची राणी लक्ष्मीबाई......
 


"लक्ष्मीराणी आमची आहे" हे म्हणण्याचा मान मिळणे परम वैभव... इंग्लंडच्या  इतिहासालाही तसला मान अजून मिळालेला नाही!


भारतभुमीचे सौभाग्य की राणी लक्ष्मीवर गर्वोक्ती करण्याचे भाग्य ह्या भुमीला मिळाले !


     आज १८ जुन रोजी तीच्या पुण्यतिथी निमीत्त एक आठवणपूर्वक श्रद्धांजली - 
                                       ~ समाप्त ~