कागदावर...

जन्मल्यावर दोनतीन तासात
नर्सबाईने ओढून पुढ्यात
खरडले माझे नाव... कागदावर
मग झालो मी मोकळा
मुक्त काढायला गळा
झाले शिक्कामोर्तब माझ्या... असण्यावर

नुकताच लागलो होतो पळू
शब्दांची चव लागली कळू
तर पुढ्यात आली बाराखडी... कागदावर
जरी गेले रुसून फुगून
सारे शब्द मला सोडून
बसलो गिरवत अक्षरेच मी... पाटीवर

नीट मन लावून अगदी
वाचली पुस्तके कागदी
आणि पुन्हा तेच ओकलो... कागदावर
वीस वर्षांच्या काठी जेव्हा
आली हातात 'पदवी' तेव्हा
उमटली मग मोहोर माझ्या... बुद्धीवर

काम करतो मान मोडून
दिवस रात्र कधी जोडून
मिळतो मग मोबदला छापील... कागदावर
किती आणतो महिन्या काठी
कागदी नोटा बांधून गाठी
आकडा तोच लावला जाई... कर्तृत्वावर

जरी संपून गेले आयुष्य
संपणार नाही भविष्य
जोवरी आहे जिवंत मी... कागदावर
कागद वाईट नाही तसा
आपण त्याला वापरू तसा
पाहा कविता छान झाली ना...कागदावर?