(चालः चला जेजुरीला जाऊ)
कारं मांडिला ह्यो खेळ, गड्या मांडिला ह्यो खेळ
जनू द्येवानं दिलं खेळाया तुला धरती न आभाळ॥धृ॥
धरतीला पाडून बीळं शोषून घेतलं जळ
आटून गेलं नद्या न नालं आता निस्ताच वाही गाळ॥१॥
तुला कशाला पायजे भाषा वाजवीशी तोंडाचा ताशा
शब्दामदीच अडकून पडलं मन झालं तुझं आंधळं॥२॥
तू म्हनं शोधिला काळ आन मोजित बसला येळ
क्षणाक्षणानी हरवून गेलं तुला द्येवानं जे दिलं॥३॥
तुझा पैका न तुझ्या या खुर्च्या तुझ्या जाती खालच्या न वरच्या
असा कसा रं अडकून पडला आपलंच इणलं जाळं॥४॥
तुझी चित्रं न तुझ्या या मूर्त्या, तुझ्या पदव्या न तुझ्या या आरत्या
चिह्नच निस्ती पुजित बसला तुला खरं कळना झालं॥५॥