दर्जेदार पुस्तकं

वर्ग १२ पर्यंत पुस्तकं म्हणजे बालभारती, कुमारभारती आणि तत्सम क्रमिक पुस्तकेच माहिती होती. अवांतर पुस्तके म्हणजे सुहास शिरवळकर, बाबा कदम, चंद्रकांत काकोडकर वगैरेंची असं वाटायचं. पण बी.एस्सीला प्रवेश घेतला अन कळलं की क्रमीक पुस्तकांव्यतिरिक्तही अनेक पुस्तकं असतात.

बाकी काहिही असो, पण घाटंजीसारख्या गावात कॉलेजच्या वाचनालयात इतके चांगले पुस्तकं असतील असं कोणालाच वाटणार नाही. परदेशी लेखकांची पुस्तके केवळ शोभेचीच असतात आणि ती केवळ दाखवायची म्हणून वाचनालयात ठेवायची असतात, असा एक प्रकार बऱ्याच वाचनालयात असतो, तसा थोडाफार इथेही होता. याचं कारण म्हणजे कोणी ती पुस्तके वाचायलाच तयार नसे. एक दिवस मीच वाचनालयात घुसून वाचनालय प्रमुखांना विचारलं की मला व्हीएसईपीआर थेअरीसाठी पुस्तक सुचवा. त्यावर त्यांनी आधी कपाळावर आठी घातली अन मग म्हणाले, "इकडे ये. ही रसायनशास्त्राची पुस्तकं. इथं बसून बघून घे, आणि जे पाहिजे असेल ते उद्या घेउन जा". मग काय जिथे केवळ आमचे प्राध्यापक बसायचे (आणि केवळ वर्तमानपत्र चिवडायचे) तिथे बसून मी वजनदार पुस्तकं शोधू लागलो.

मला पहिला धक्का बसला तो परदेशी लेखकांच्या लेखनशैलीचा. सुहास शिरवळकरांच्या कादंबरीसारखं काहिसं लिखाण असणारी काही पुस्तकं सापडली. त्यात ए. पी. माल्विनोचं "इलेक्ट्रॉनिक प्रिंसिपल्स" हे पुस्तक म्हणजे काय म्हणावं. ह्याच रशियन लेखकाचं दुसरही पुस्तक पुढे एम.एस्सीला वापरलं. एखादी कादंबरी लिहावी, अश्या थाटात या लेखकाने इलेक्ट्रॉनिक्स समजावून सांगितलं आहे. असेच दुसरे दोघे म्हणजे बॉईलस्टॅड आणि नॅशलेस्की. एखादी सुंदर तरुणी तिची स्तुती केल्यावर कशी लाजेल तश्या नजाकतीत ट्रांझिस्टर कसा वागतो, हे लिहिलय. या तिघांच्या भरवश्यावर मी पुढे जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स शिकवलं, तेव्हा केवळ सीआरओच्या आकृत्या बघून आपलं काय चुकत आहे, हे कसं ठरवावं, हे विद्यार्थ्यांना सांगितलं, तेव्हा त्यांच्यामते मी जिनियस ठरलो, हा भाग वेगळा. खरं श्रेय या तिघांना. एक आकृती १०,००० शब्दांचं काम करतं, हे सहज सिद्ध होते.

मुळात भौतिकशास्त्र हा एक कठीण विषय, अशी समजून बाळगून परदेशी लेखकांची इंग्रजी आपल्या पचनी पडणार नाही, अशी काहिशी चुकिची समजूत बाळगणारी मंडळी कमी नसतात. पण जर शिक्षकाने ठरवलं तर चांगल्या पुस्तकांच्या प्रती कमी पडतील, असाही उठाव चांगल्या पुस्तकाला मिळू शकतो. हाच अनुभव मला बरेलीत शिकवतांना आला.

आधी बेसिक पक्कं करा असा धोशा लावणाऱ्या आमच्या प्राध्यापकांना चांगली पुस्तके म्हणजे "प्रगती प्रकाशन" वा तत्सम गुप्ता, कुमार, शर्मा यांपलिकडे काही माहितीच नव्हतं, हे आम्हाला फार उशिरा कळलं. अर्थात हि सगळी पुस्तकं कुण्यातरी परदेशी लेखकाच्या पुस्तकावरून जशीच्या तशी ढापली आहेत, फक्त काही मॅथेमॅटीकल स्टेप्स सोडवल्या आहेत, इतकच. बेसिकसाठी यंग आणि फ्रीडमनचं "युनिव्हर्सिटी फिजिक्स"चा मी इतका चाहता आहे की ८ वीतल्या माझ्या भाचिला हे पुस्तक मी विकत घेउन दिलं. सोबत "युनिव्हर्सिटी केमिस्ट्री" नावच आणखी एक पुस्तक दिलं. त्यामुळे तिचे जुने प्रश्न सुटले, पण नवीन वाढले  

पण केवळ परदेशी लेखक चांगले आणि आमचे वांगले असं नव्हे. क्लासिकल मेकॅनिक्ससाठी गोल्डस्टिनचं पुस्तक माझ्या डोक्यावरून गेलं, पण तेच राणा आणि जोग यांच पुस्तक वाचल्यावर नेमकं क्लासिकल मेकॅनिक्स म्हणजे काय, हे कळायला लागलं. तसच ग्रॅव्हीटि, टाईम-स्पेस वगैरे "अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम" वाचल्यावरच कळलं.

नुकतच आय. आय. टी. मद्रासच्या संकेतस्थळावरची काही लेक्चर्स बघितली. त्यावरच्या प्रतिक्रियांपैकी एक प्रतिक्रिया, " मी एक अमेरिकन विद्यार्थी आहे. असे प्राध्यापक जर आमच्या देशाला लाभले असते तर ते आमचे भाग्य राहिले असते. " याला १०-१५ लोकांनी सहमतीसुद्धा दिली आहे.

मॉस्को पब्लिकेशनच्या छोट्या पण उपयुक्त पुस्तकांमुळेच समीकरणे केवळ पाठ करण्यासाठी नव्हे तर समजून घेउन वापरण्यासाठी असतात हे कळले. सध्या हि पुस्तके लुप्त झालीत कि काय असं वाटतय.

शेवटी काय, दर्जेदार पुस्तकं आणि शिक्षक (किमान या युगात तरी) नेहमीच लोकप्रिय होतात. विद्वान सर्वत्र पुज्यते, हेच खरं, नाही का ?

काही पुस्तकांचा उल्लेख नावे आणि लेखक आठवत नसल्याने करू शकत नाही