चेहरे - पुस्तक प्रकाशन

     अशा एका अभूतपूर्व कार्यक्रमात एकाच वेळी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांना एकत्र ह्याची देही ह्याची डोळा पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात येईल असा न भूतो न भविष्याति विचार केला होता. स्वतःलाच चिमटा काढून हे सत्य आहे की नाही, ह्याची खात्री एकदाच नाहीतर अनेकदा करून घेतली.  तर ह्या कार्यक्रमात आलेली ही वेगवेगळी मंडळी ज्या क्षेत्रातली ती म्हणजे - संगीत, नाट्य व अभिनय. संगीत क्षेत्रातील तिघी बहिणींना आपण टीव्ही रेडिओच्या माध्यमातून भेटलेलो आहोत पण जी नुसती ऐकीवात असलेली बहीण प्रत्यक्षात ऐकायला-बघायला मिळाली. मी कुणाबद्दल बोलतेय हे तुमच्या लक्षात आलंच आहे. अर्थात मंगेशकर भगिनी!  आणि नाट्य क्षेत्रातली व्यक्ती म्हणजे नन आदर दॅन विजया मेहता! अभिनय क्षेत्रातल्या आप-आपल्या वेगळेपणामुळे ज्यांनी एक काळ गाजवला त्या जया भादुरी, हेमामालिनी, रेखा, पद्मिनी कोल्हापुरे व आजच्या काळातील जिने अभिनय सोडूच नये असं जिच्याबद्दल वाटतं ती म्हणजे काजोल! काय विलक्षण योग!  या दुर्मिळ, दुर्लभ योगाला काय नाव द्यावे? दुग्धशर्करा की कपिलाषष्ठी छे! सगळी नावं थिटीच पडतील. अर्थात हा योग घडून यायला कारणही तस्सच होतं. गौतम राजाध्यक्ष ह्यांच्या 'चेहरे' ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे.  ह्या सोहळ्याचे एका शब्दात करायचे झाले तर ...  मराठमोळा..  मराठमोळा म्हणजे नऊवार साडीतल्या, नथ घातलेल्या महिलावर्ग व फेटे बांधलेला, भाळी तिलक लावलेला पुरुष वर्ग .  छे! पण असं काही चित्र तिथे नव्हतं.   मराठमोळा नाहीतर मग, मराठीस्पर्शित (मराठी टच), नाही, तो तर मराठीच दिमाखदार छोटेखानी (short but sweet)कार्यक्रम. कार्यक्रमाची उत्कृष्ट सुरुवात झाली ती सारेगमपच्या वाद्यवृंदाने. गौतम राजाध्यक्षांनी चित्रबध्द केलेल्या नामवंत कलाकारांवर चित्रित केलेली गीते आणि अर्थात  मंगेशकर कुटुंबीयांनी गायलेल्या/संगीतबद्ध केलेली गाणी केवळ अप्रतिम. उंबरठा मधील प्रार्थना, उमरावजानमधील गझल, लावणी अशी वैविध्यपूर्ण गाणी गायकाशिवाय ऐकणे, हा एक बाहेर पडणाऱ्या पावसाइतकाच आल्हाददायी अनुभव होता. वादक मंडळीत विशेष उल्लेख करावासा वाटतो ते निलेश परबचा. त्याचे उत्स्फूर्त हावभाव व बोलका चेहर्‍यामुळे कार्यक्रमाची रंगत, लज्जत और बढ गई. सारेगमप आज ज्या शिखराला आहे त्यात ह्या वाद्यवृंदाचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. नेमक्या व मोजक्या शब्दात ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं पुष्कर श्रोतीने.

     गाणी सुरू असतानाच एक-एक कलाकारच आगमन होऊ लागलं.   सगळ्यात आधी आली ती रेखा व भानु अथय्या. आशाताई सोडून इतर सार्‍या मंगेशकर भगिनी, विजया मेहता, हेमामलिनी, जयाभादुरी, पद्मिनी कोल्हापुरे, सुरज बडजात्या, सतीश शहा व बरीच सिनेसृष्टीतली मंडळी एका पाठोपाठ येऊ लागली तशी छायाचित्रकारांची लगबग-धावपळ व उडालेली तारांबळ, हिला टिपू की तिला, बघून गंमतच वाटली.थोड्यावेळच ही गंमत टिकली. नंतर मात्र त्रासच वाटू लागला. आम्हालाच नाहीतर कलाकारांनाही. निवेदक मधुरा वेलणकर व राजन भिसे ताटकळत उभे होते कार्यक्रम सुरू करण्यासाठी. शेवटी दमदाटी व रक्षकांच्या साहाय्याने छायाचित्रकारांना शांत करण्यात आलं. मंचावर प्रेक्षकांच्या डाव्या हाताला होते अमेय हेटे, काजोल, जयाभादुरी,गौतम राजाध्यक्ष, लतादिदी तर उजव्या बाजूला हेमा मालिनी, विजया मेहता, पद्मिनी कोल्हापुरे व संजय गायकवाड.  मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली व्हॅल्युएबल ग्रुपच्या दृक-श्राव्य  माहितीपटाने.  प्रकाशनाच्या क्षेत्रात आपण उतरत नसल्याचं व्हॅल्युएबल ग्रुपचे संचालक अमेय हेटे ह्यांनी ह्यावेळी स्पष्ट केलं.  इंग्रजीत 'फेसेस' २००० मध्येच प्रकाशित झालंय. पण हे पुस्तक मराठीतही असावं असं त्यांना मनापासून वाटलं आणि त्यांचं हे वाटणं त्यांनी ते प्रकाशित करून दाखवून दिलं. हे सगळं एकीकडे मंचावर चालू होतं पण मिनिटा-मिनिटाला छायाचित्रकार समोर बसलेल्या कलाकारांच्या भावमुद्रा टिपण्यासाठी वळून्-वळून चित्रे काढून त्रास देत होते त्यामुळे समोर बसलेल्या कलाकारांनाही कार्यक्रमाचा आस्वाद, आनंद तर सोडूनच द्या, बघताही येत नव्हता.   बिच्चारे! किती कठीण असतं नाही ह्या लोकांच जीवन. साध्या-साध्या आनंदालाही पारखे व्हावे लागते. आपण सामान्य आहोत ह्याच मला कुठेतरी मनात समाधान वाटलं. पण असंही वाटलं की त्यांना ह्या गोष्टींची एवढ्या वर्षात इतकी सवय झाली असेल की हेच त्याचासेल व कदाचित खंत/दु:ख करण्याच्या पलीकडे ते पोचले असतील. काय वेड्यासारखी तुलना करू लागले. असो! गौतम राजाध्यक्षांनी सगळ्यांच्याच  ( त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्ती त्यांचे भाऊ-वहिनी, आत्या-काका व ज्या-ज्या व्यक्तींची त्यांनी छायाचित्रे काढली )प्रति कृज्ञनता व्यक्त करत आपले मनोगत थोडक्यात सांगितले. विशेषत्वाने लतादीदींचा उल्लेख करत ते म्हणाले की त्या एक उत्तम छायाचित्रकार तर आहेतच त्याचबरोबर उत्तम जाणकारही आहेत.

     पुस्तकाचे प्रकाशन लतादीदींच्या हस्ते करण्यात आले. विजया मेहतांनी आपल्या मनोगताची सुरुवात मराठीत केली व सगळ्यांना कळावं म्हणून नंतर हिंदीत बोलल्या. पंदी(पद्मिनी कोल्हापुरे), हेमामालिनी ह्या दोघींनी अभिनंदन व शुभेच्छापर भाषण थोडक्यात दिले. मला जरी मराठी येत असलं तरी मी हिंदीतूनच बोलते असं हिंदीतूनच बोलून मी गौतमला किती त्रास दिला हे सांगत काजोलने त्याचे आभार व अभिनंदन केले. जयाजींनीही त्यांना मराठी चांगलं कळतं पण चांगल्या प्रकारे बोलू शकत नसल्याचं कबूल करत सर्वप्रथम हेमाशी आज पासून नातं जोडल्या गेल्याचा आनंद व्यक्त केला. त्याचं असं झालं - गौतमने काजोल व विजयाताई ह्या नातेवाईक आहेत तसेच पंदी व लतादीदी ह्या दोघीपण नातेवाईक असल्याचा उल्लेख मनोगतात व्यक्त केला होता. त्यामुळे  गणिती समीकरणाप्रमाणे मंचावरील उरलेल्या डाव्या बाजूची जया व उजव्या बाजूची हेमा झाल्या नातेवाईक! सगळ्याजणी छानच बोलल्या त्यातून जाणवत होतं ते गौतमबद्दल त्यांच्या मनात असलेला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, एक सहज सुंदर मैत्र...

     शेवटचं मनोगत होतं, लतादीदींच. त्याच्या थोडंसं आधी आशाताईंच आगमन झालं होतं.  मंजुळ,मधुर, गोड आवाज...... आज प्रत्यक्षात ऐकणे ही अनुभूती वर्णनातीत! आशाने प्रस्तावनेत लिहिलंय की असं काम एखादा वेडाच करू शकतो. वेडेपणात अशी कलाकृती घडू शकते तर शहाणा असताना हा (गौतम) काय काय  करू शकतो, अश्या शब्दात लतादीदींनी गौतमचे कौतुक केले. गौतमने स्वहस्ते ह्या पुस्तकाच्या प्रती त्याला ह्या कामात साहाय्य करणार्‍यां व्यक्तींना व मान्यवर उपस्थितांना दिल्या. रेखाने प्रत स्वीकारत गौतम एक चांगला गायक असल्याचं सांगून त्याला गायचा आग्रह केला आणि गौतमनेही आग्रहाला मान देत एक सुंदर तान घेऊन सगळ्यांनाच खूश करून टाकलं. असा हा सुंदर अनुभव तुमच्या पर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न!

    सामान्य लोकांना  कलाकारांबद्दल नेहमीच एक आकर्षण व कुतूहल वाटत असते. ह्या कलाकारांना पाहताक्षणी काय वाटले-            
                         हेमामालिनी = शालीनता                 जया बच्चन  = सादगी        रेखा = नजाकत, अदाऐं

                             काजोल =  पारदर्शक, नटखट          विजया मेहता = बुद्धिजीवी   पद्मिनी कोल्हापुरे = निरागस

                                                            आशाताई = चीर तारुण्य, ताजी हवा का झोंका

तसेच मनातले काही प्रश्न शंका, कुतूहल - निलेश परब सोडून बाकी वादक मंडळी एवढी गंभीर का होती? रेखा पाच मिनिटं आशाताईंच्या पायाशी बसून काय बोलत होती? आशाताई अचानक निघून का गेल्या? रेखा-जया एकमेकींशी दोनच वाक्य बोलल्या ती दोन वाक्य कोणती? (दुसर्‍या दिवशी चॅनेलवाल्यांनी त्यावर अर्धा तासाचा कार्यक्रम केला) हेमामालिनीने जी साडी नेसली होती ती नक्की इंदुरी साडी होती व  तिने ती इंदोरला भाजपच राष्ट्रीय अधिवेशन झालं तेव्हा घेतली असावी......