सत्येन देसाई.... (भाग आठ.)

सत्येन आणि वासंती दोघेही ऑफिसमध्ये येत होते. आजकाल वासंती मौन पाळीत होती , असं मला प्रतिभाकडून कळलं. असेच दोन दिवस गेले. ऑफिसमध्ये काही ही घडत नव्हतं. २ जुलैला शुक्रवार होता. एक प्रकारचे कुंद वातावरण होते. धड नवीन काही करावसं वाटत नव्हतं, धड आहे ते काम पूर्ण करावसं वाटत नव्हतं. तरी ही कामं वेळेवर होत होती. याचाच अर्थ माझी मनस्थिती चांगली नव्हती. घरातही यांत्रिकपणे वागणं चालू होतं. सुप्रिया पण शांत होती . मला सस्पेंडेड वाटत होतं. उत्साह नाही आळसही नाही. शुक्रवारी रात्री डिटे. सृजनशीलचा फोन आला. मी जेवत होतो . सुप्रियाने तो घेतला. तिला स्क्रीनवरचं नाव विचित्र वाटलं असणार, म्हणून माझ्याकडे देत ती म्हणाली, "आत्ताच आलात , पण जेऊनही देत नाहीत. " माझा आवाज ऐकून सृजनशील म्हणाला "सर, एक भयंकर बातमी आहे. वासंतीला कसलातरी झटका आलाय. आणि तिला डॉक्टर कर्वेंच्या हॉस्पीटल मध्ये दाखल केलेले आहे. माझ्या माणसाने वॉर्डबॉय कडून माहिती काढली आहे. वासंतीला मेंदुचा काहीतरी त्रास असल्याने लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे. तिला सध्या दोन दोन प्रतिमा दिसतात. पुढचा फोन लवकरच करीन. "

घास माझ्या तोंडात फिरायला लागला. सुप्रियाचं माझ्याकडे लक्ष असावं. ती वैतागून म्हणाली, " काय माणसं आहेत, जेऊन सुद्धा देत नाहीत. सकाळपासून बारा तास काम करूनही कंपनीचं समाधान होत नाही का? ती खीर तरी संपवा. " म्हणजे सुप्रियाला कोण बोलतय हे कळलं नव्हतं. मी कसतरी जेवण संपवून , साधे कपडे घालून बाहेर पडलो. तिला माहित होतं की मी सिगारेट ओढायला चाललोय. हा माझा रोजचा शिरस्ता होता. आणि आजतर मला विचार करणं भाग होतं. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. सिगारेटचे दोन दम मारून मला जरा बरं वाटलं. हॉस्पिटलचं नाव माहित असूनही मी वासंतीला भेटू शकत नव्हतो. मला हे कसं कळलं , असं तिला वाटलं असत. आणि आजींचीही मला भीती होतीच. वासंतीच्या डोक्यावर परिणाम झाला की काय ? प्रेग्नंट असताना इतकं गंभीर ऑपरेशन कस काय करणार . मी सृजनशीलला फोन लावला. तो उत्साहाने म्हणाला, " बोला सर, माझा माणूस आज हॉस्पिटलवर नजर ठेवून राहणार आहे. आपल्याला उद्या रिपोर्ट करतो सर. " मी म्हंटलं, " सकाळी लवकर फोन केलात तरी चालेल. ऑपरेशन असलं तरी तिच्या प्रेग्नन्सीचं काय याची माहिती काढा. " " यस सर,नक्कीच सर. " फोन बंद झाला. मी घरी गेलो. तीन जुलै , शनिवार होता. मी साडेआठलाच ऑफिसला गेलो.मला लवकर आलेला पाहून वॉचमनही जरा बावचळला. माझ्या अपेक्षेप्रमाणे नऊ वाजताच सृजनशीलचा फोन आला. तो म्हणाला, " सर आपल्या म्हणण्याप्रमाणे चौकशी केली. सर, आधी तिचं ऍबॉर्शन करणार आहेत , मग ऑपरेशन होईल.बहुतेक तीस जुलैला. " मी म्हंटलं, "सत्येन ची खबर काढा. " त्याने फोन ठेवला. मी विचार केला , ऍबॉर्शन झालं तर सत्येन यातून सुटेल. पण सत्येन सुटू नये अशी माझी मनोमन इच्छा होती. चार पाच वाजेपर्यंत तरी सृजनशीलचा ( फार जड नाव आहे.) फोन आला नाही.अपेक्षेप्रमाणे आज वासंती आलीच नाही तिचा मेडिकल सर्टिफिकेट जोडलेला अर्ज मात्र कोणी तरी प्रतिभा जवळ आणून दिला. पण तो थांबलाच नाही. त्यामुळे जास्त काही माहिती मिळाली नाही. आज सत्येनही नव्हता. तो नक्कीच हॉस्पिटलमध्ये गेला असणार. मला पुन्हा पुन्हा तिच्या आजीला जाऊन भेटावसं वाटत होतं. यावर मी सुप्रियाचा सल्ला घेण्याचं ठरवलं. संध्याकाळी सात वाजता सृजनशीलचा फोन आला. बराचसा स्टाफ गेल्याने मी मोकळेपणाने बोलू शकलो. तो म्हणाला, " सर, सत्येन साहेब वासंतीच्या घरी गेले होते. पण दाराला कुलुप असल्याने , शेजारी चौकशी करून ते हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांना आजींनी वासंतीला भेटू दिलं नाही , सर. ते वासंतील भेटू शकले नाहीत हे नक्की . माझा माणूस त्यांच्या घरावर नजर ठेऊन आहे. " मग मी थोडा विचार करून म्हंटलं, " सृजनशील , तुमची सर्व्हिस आजपासून बंद करा. " तो म्हणाला, " काय झालं सर ? माझं काम पसंत आलं नाही का ? " मी म्हंटलं, " नाही तसं नाही. पण मला सध्या तरी आवश्यकता नाही. लागेल तेव्हा सांगीन. तुमचा रिपोर्ट मात्र उद्या पाठवा आणि बाकी पैसे घेऊन जा. "

मग तो म्हणाला, " सर हि केस चांगलीच इंटरेस्टिंग आहे. आपण पुढची माहिती काढावी असं मला वाटतं. " मी जरा वैतागून च म्हंटलं. " मी सागितलं ना तुम्हाला, उद्यापासून तुमची सर्व्हिस मला नको आहे. "

" ओ. के सर, काही लागलं तर लगेच कळवा सर. मी आपल्या सेवेला हजर आहे. " तो अजिजीने म्हणाला. ती तारीख होती ५ जुलै.

दुसऱ्या दिवशी त्याचा माणूस आला त्याने रिपोर्टस दिले. मी त्याला आणखी पाचशे रुपये दिले. मग मी विचार केला की प्रतिभालाच वासंतीच्या घरी पाठवू. तेवढ्यात आय. टी. चा फोन आला. तो म्हणाला, " अरे विनायक, सत्येन बोल राहा था की वासंती का ऑपरेशन होनेवाला है. तु जरा जा के देख, या तो किसी को भेज पैसे की जरुरत है कया. तेरा काम तो ठीक चल राहा है, लेकीन रिलेशन नाम की भी कोई चीज होती है. दो तीन दिनमे मुझे रिपोर्ट कर. ". मला हे सगळं माहित होतं पण तसं कसं म्हणणार ?. असो मी प्रतिभाला जायला सांगितलं आणि घर आतून नीट बघून येण्यासही, म्हणजे मला तिच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आली असती. मंगळवारी मी अधीरपणे प्रतिभाची वाट बघत होतो. ती आली आणि वासंतीच्या घरी पैशाची चणचण असल्याचे म्हणाली. वासंतीने बोरिवलीत एक फ्लॅटही घेतलाय. आणि त्याचे हप्तेही येत्या महिन्यापासून चालू होणार आहेत. तिला एक भाऊ आहे तो शाळेत जातो. बहुतेक नववी दहावीत असावा. तो तर सत्येन च्या नावाने शिव्या देत असतो. ऑपरेशनला दोन लाख तरी खर्च येईल. असं दिसतय. मी डॉक्टरांनाही भेटले. डॉ. च्या मते तिला या सगळ्या टेन्शन मुळे त्रास झाला असावा. तसच सत्येन कडून तिला आधाराची अपेक्षा होती. पण सत्येन अगदीच विचित्र वागला. आय. टी. च्या कानावर हे घातल्या वर तो ऑपरेशनच खर्च आपण देऊ असं म्हणाला. मला कळत नव्हतं सत्येन अशी बघ्याची भूमिका का घेत होता. तो ऑफिसला यायचा , पण बोलायचा नाही. मूड असला तर ठीक काम करायचा. त्याला नोकरी जाण्याची भीती नव्हती. शेवटी तो" पर्मनंट जमाई" होता.

असेच सात आठ दिवस गेले. सृजनशीलला काढल्या पासून मला सत्येनची किंवा वासंतीची बातमी लागेना. मध्ये एकदा प्रतिभा जाऊन आल्यामुळे कळलं की ऍबोर्शन झालेलं आहे आणि ऑपरेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात करणार आहेत. मला आता बघायचं होतं की सत्येन केव्हा दांडी मारतो. थोड्याच दिवसात आय. टी. कडून दोन लाखाचा चेक आला. तो घेऊन मी प्रतिभाला पाठवलं. मी गेलो आणि आजींना नाही आवडलं, तर उगाच एकांगी वाद तरी कशाला , कारण मी बोलणारच नव्हतो. प्रतिभाकडून कळलं की सत्येन आजींच्या गैरहजेरीत वासंतीला भेटून गेला. पण काय बोलणं झालं काही कळलं नाही. आजी फार काळजीत असाव्यात. पण चेक दिल्यामुळे त्यांना जरा बरं वाटलं. त्यामुळे प्रतिभाचा पुन्हा पुन्हा जाण्याचा मार्ग सुकर झाला. वासंतीची तब्बेत आता सुधारत होती. सत्येन अजूनही दगडासारखा बसायचा. काम सांगितल्याशिवाय करित नसे. तेही मूड असेल तर. कधी कधी तो रात्री दहा वाजेपर्यंत बसायचा . मग मी त्याला जायला सांगायचो. पण माझ्याकडे लक्ष न देता तो घरी जायचा. कदाचित माझ्या ऍपॉइंटमेंट मुळे त्याच्या मक्तेदारीत भागिदारी निर्माण झाली असावी आणि माझी त्याला दिली जाणारी कोरडी वागणूक जबाबदार असावी, असं मला आता वाटतं. त्याच्याही डोक्यावर परिणाम झाला असावा. मी हळूहळू सृजनशील त्याचे रिपोर्टस , फोन वगैरे सगळं विसरू लागलो. आता नक्की होतं की वासंती माझ्याकडे येणार नव्हती तशी ती सत्येन कडेही जाणार नव्हती . यथावकाश ऑगस्टच्या पाच तारखेला वासंतीचं ऑपरेशन झालं. ते यशस्वी झालं. सगळ्या खबरा प्रतिभाकडून येत होत्या.

मी हे सगळं विसरायच ठरवलं. गणपती होऊन गेले. मी सोलापूरला जाणार होतो. पण जमलं नाही् . हळूहळू दसरा आला . बोनस डिक्लेअर झाला. स्टाफ आणि अर्थातच मी पण आनंदात होतो. सत्येन परत नॉर्मल झाला. फक्त वासंतीची गैरहजेरी जाणवत होती . पाठीत वाकलेला सत्येन परत ताठ चालू लागला. पण त्यात पूर्वीचा ताठा नव्हता. वासंतीला होणाऱ्या मुलाचं ओझं त्याच्या डोक्यावरून उतरलं होतं. ऑफिस व्यवस्थित चालू होतं. मी सृजनशीलचे सगळे रिपोर्ट घरी नेले. इथे ते कोणालाही सापडायला नकोत. म्हणजे सापडण्यासाठी प्रयत्न होणार हे माझ्या लक्षात आलं नाही. म्हणजे कोणितरी माझा खण तपासणार असेल. माणूस जेव्हा भविष्यकाळाच्या तरतुदी करतो तेव्हा त्याने जरा विचारच करावा. पुढील घटनांच्या संदर्भांची मनाला कल्पना असावी. म्हणूनच नकळत असल्या गोष्टी माणूस करत असावा. असो. केवळ एक काळजी घेणं , म्हणून मी हे केलं असं तव्हा तरी डोक्यात होतं. मध्येच एकदा सुप्रियाचा फोन आला . ती मला लगेच घरी यायला सांगत होती. तिला माहित होतं. की मला कामावरून घरी बोलावलेलं आवडत नाही. तिने काय ते फोन वर सांगण्यास नकार दिला. म्हणून मी साडेपाच वाजताच घरी गेलो. (नाही तर नऊ वाजेपर्यंत मी बसत असे. ) मी घरी गेलो आणि बॅग ठेवण्याच्या आतच ती गळ्यात पडली. म्हणाली, "ओळखा पाहू. मी का बोलावलं असेल ? " मला फारसं आवडलं नाही. मी फक्त खांदे उडवले. मला कोडी घातलेली आवडत नसत. तिने आज विशेष मेक अप केला होता. ती म्हणाली, " आज आपण बाहेत जेवायला जाऊ. " मी चिडून म्हंटलं. "हे सांगण्यासाठी मला लवकर बोलावलस ? " .... ती म्हणाली, " अहो गुड न्यूज आहे. " मी म्हंटलं , कसली ? " ति म्हणाली, " अहो तुम्ही बाबा होणार आहात ". मी मग विचार केला, " बाबा ? " तिची अपेक्षा , मी तिच्याइतकाच उत्तेजित होईन. मग ति चिडून म्हणाली, " चला तुम्हाला कशाचचं नाविन् नाही. " माझ्या आवाजात उत्साह आणित म्हंटलं, " काहीतरिच काय? सुप्रिया , धिस इज रियली ए गुड न्यूज. लेट अस सेलिब्रेट. खरच जाऊ आपण जेवायला बाहेर. तिचं समाधान झालं. आम्ही रात्री एका मोठ्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो. रात्र फारच छान गेली . बाप होण्याचं फिलींग एवढं आनंददायी असेल याची मला कल्पना नव्हती. असणारच कशी ? लग्नानंतरच या गोष्टी अनुभवण्याची पद्धत आहे, त्यापूर्वी हे सुख कसं लाभणार ?

असो ऑक्टोबरच्या वीस तारखेला वासंती कामावर रुजू झाली. मी तिला माझ्या समोर बसवली आणि म्हंटलं. " वासंती तब्बेतीची काळजी घे. फार ताण घेऊन काहीही करू नकोस. आवश्यक असेल तर रजा वाढव . " मला जरा कीव आली. नाही म्हंटलं तरी माझ्या सदिच्छांचं (? ) फळ तिला अप्रत्यक्षपणे मिळालं होतं. ती थोडावेळ बसली . म्नला वाटतं तिला काहीतरी बोलायच असावं. पण ती म्हणाली, " मी फार आभारी आहे. (अगदीच फॉर्मल) कंपनीने पैशाची मदत केली . म्हणून हे शक्य झालं. खरच फार बरं वाटलं. " आणि ती उठली. मला कसतरीच वाटलं. मी काही पैसे दिलेले नव्हते. आणि तिच्या बद्दलच्या माझ्या भावनाही फार पवित्र होत्या अस नाही. तिने मला कधीच प्रतिसाद दिला नाही. हे माझ्या मनात पक्क बसलं होतं. ऑफिस मध्ये सत्येनची बडबड चालू झाली. पण वासंतीचा आवाज बंद होता. मला का वाटलं कोण जाणे, पण अजूनतरी हे प्रकरण संपलं नसावं, किंबहुना ते संपू नये अशी माझी इच्छा होती. मी , नंतर सृजनशीलला फोन केला , " मला तुमची सर्व्हिस पाहिजे. " तो तयारच होता. त्याच्याकडेही नवीन केस नसावी. मग मी त्याला सत्येन आणि वासंती यांच्यावर नजर ठेवायला सांगितलं. फक्त मला लेखी रिपोर्ट नको होते. त्याचा माणुस दुपारी चारच्या सुमारास आला आणि पैसे घेऊन गेला.. (क्र म शः)