सत्येन देसाई.... (अंतिम भाग)

सृजनशील कडून तशी मला काही खास माहिती मिळत नव्हती. जवळ जवळ एक आठवडा झाला. मला त्याला आता ठेवण्याची घाई केल्या सारखं वाटू लागलं. त्याच्याकडून सध्या एवढच कळलं होतं की सत्येन जरी बाहेर वासंतीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता तरी ती मात्र त्याच्याशी वोलत नव्हती. तिच्या मनात नक्की काय होतं ते कळत नव्हतं. सृजनशीलने मात्र सत्येन ची न सांगताच घरची सर्व माहिती काढली होती. त्याच्या घरी दिवसा त्याची फक्त बायको असते. त्याचा मुलगा आणि सून दोघेही एकाच मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होते. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. मुली चं लग्न एका चार्टर्ड अकौंटंटशी ठरलं होतं. लग्न केव्हातरी फेब्रुवारी महिन्यात होईल. सध्या मात्र त्यांच्या घरात अधून मधून सत्येन आणि त्याची बायको यांच्यत भांडणं होतात. कारण कळू शकलं नाही. दिवस असेच मंद चालले होते. तसं वातावरण बरं होतं. सुप्रिया खूष होती. आमच्या पण डॉक्टरांकडे नियमित फेऱ्या होऊ लागल्या. मला वाटलं ही कथा इथेच थांबते की काय? पण सत्येन ला केलेल्या कर्माची किंमत द्यायलाच हवी. निदान माझी तरी तशी इच्छा होती.

आणि एका रात्री अकरा वाजता मला सृजनशीलचा फोन आला. सुप्रिया नुकतीच झोपली होती. मी बाल्कनीत जाऊन बोलू लागलो. "सर एक महत्त्वाची बातमी आहे. आजींनी पुष्कळ समजाऊन सांगितलं तरिही वासंती दोन मोठ्या बॅगा भरून रात्रीच सत्येनच्या घरी राहायला गेली. सर मी आता दोन माणसं कामाला लावलेली आहेत. एक वासंतीच्या घरावर आणि दुसरा सत्येनच्या घरावर नजर ठेऊन आहे. सत्येनच्या घरावरचा माणूस म्हणाला, की सत्येनने वासंतीला धक्का बुक्की करून घालवण्याचा प्रयत्न केला. सर त्यांचं काय बोलणं झालं ते सांगू का ? तुम्हाला बोअर तर होत नाही ना? " मी म्हंटलं. " नाही नाही, इट इज इंपॉर्टंट. " " सर, वासंती सत्येनच्या घरी राहणार आहे म्हंटल्यावर , सत्येन आणि त्याच्या बायको मध्ये भांडण चालू झालं. सत्येन म्हणाला , अगं वासंती वेडीबिडी झालिस का काय? इथे राहणं कसं शक्य आहे. ? . व्हॉट नॉनसेन्स ?. वासंती म्हणाली, ते मला काही माहित नाही. हा विचार तू पुर्वी करायचा होतास. तू , पोलिसांना बोलावलस तर त्यांना तुला सगळं सांगावं लागेल. त्यावर सत्येनची बायको म्हणाली,तुम्हाला काही लाज लज्जा वगैरे नाही का ? तुमच्या या अशा वागण्या मुळे सुषमाचं (त्याच्या मुलीचं नाव) लग्न मोडलं नाही म्हणजे मिळवलं. इतके दिवस आम्ही हे सगळं ऐकून होतो. पण या थराला गोष्टी जातील असं वाटलं नाही. आणि काय ग भवाने तू इथे कशी राहणार ? . वासंती म्हणाली, तो तुमचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने हेच सोल्यूशन आहे. सत्येननी मला सांभाळायलाच हवं. तुमच्या नवऱ्या मुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला. यांनी माझ्या मुलचा जीव घेतलाय. त्यावर बायको म्हणाली, अगं निर्लज्ज मुली तुला काही शरम वगैरे वाटत नाही का ? . मग वासंती त्वेषाने म्हणाली, तुमच्या नवऱ्याने कोणती शरम बाळगली ,? हे सर्व करताना . ती सत्येनच्या बायकोला धक्का मारून आत शिरली सर. घरात सत्येनचा मुलगा आणि सूनही उभे होते. नंतर दरवाजा लागला सर.

दुसऱ्या दिवशी वासंती ऑफिसला आली. ती थोडी रिलॅक्स वाटली. तात्पुरता का होईना तिचा विजय झालाहोता. सत्येन मात्र दोन तीन दिवस कामावर आला नाही. मला वासंतीचं कौतुक वाटलं. धडा शिकवण्याचा हा मार्ग नवीन होता पण एकदम बरोबर . बरं झालं आपण या भानगडीत अडकलो नाही . माझे विचार एकदम साधारण पातळी वर आले. सुप्रियावर भलताच परिणाम झाला असता. आता कसं दूर राहून सत्येनची तडफड बघता येत होती. काठाजवळ पोहोणं सोपं होतं. सत्येन मध्ये पोहोत होता. सत्येनच्या घरात रोज भांडणं होत होती असं कळलं. दिवाळी पण झाली. बोनस मिळाला. असेच एक दीड महिना गेला. डिसेंबरची थंडी चालू झाली. मुंबईत कसली आली थंडी ? असो. सृजनशील अधून मधून फोन वरून रिपोर्ट देत होता. तसं उत्साह वर्धक काहीही नव्हतं. त्याचाही इंटरेस्ट गेला होता. मी त्याला डिसकंटिन्यू करण्याचं ठरवल् . मला आता वासंतीचं काय चालू आहे किंवा सत्येन काय करतोय याची खबर नको होती. माझ्या दृष्टीने कथा संपली होती. सत्येनची तब्बेत मात्र चांगलीच हडकली होती. तो बारीक झाला होता.

तो सोळा डिसेंबरचा रविवार होता. मी आरामात झोपून उठलो. हातात चहाचा कप घेऊन सुप्रियाशी मी गप्पा मारी त होतो. पेपर येऊन पडला होता. मी अंघोळीला जाण्यासाठी बाथरुम मध्ये शिरलो. तेवढ्यात सुपियाने मला मोठ्याने हाक मारली. म्हणालि, " अहो, हे बघा काय. " मी वळलो. विचारलं , " काय आहे ? " मला जरा भीती वाटली. तिला तीन महिने झाले होते. हिला काही झालं की काय ? माझ्या समोर पेपर धरीत ति म्हणाली , " तुमचा तो सत्येन, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. , घ्या . वाचा. " मी पेपरावरून नजर फिरवली. पहिल्याच पानावर बातमी होती . ........ "प्रेयसीचा खून करणारा , विवाहित प्रियकर अटकेत." पोलिस तपास चालू आहे. माहिती अगदी तपशीलवार दिली होती. त्यात म्हंटलं होतं. ... ‌सत्येन देसाई यांच्याकडे जबरदस्तीने राहायला आलेल्या त्यांच्या प्रेयसीचा , वासंती देवरुखकरचा , त्यांनी गळा दाबून खून केला आहे. वासंतीला त्यांच्या पासून दिवस गेले होते व त्तिचे ऑपरेशनही झाल्याचे म्हंटले होते. डॉक्टर कर्व्यांचाही त्यात उल्लेख होता. आमच्या कंपनीचाही त्यात उल्लेख होता. सृजनशीलचा फोन आला नाही. तो हुषार होता. आता तो माझ्याशी संबंध ठेवणार नाही. मग लक्षात आलं की बरं झालं की त्याचे रिपोर्ट मी घरी आणले ते. पण वासंतीने सत्येनला लिहिलेली चिठ्ठी मात्र माझ्या टेबलाच्या खणात होती. ती मी नष्ट केली नव्हती किंवा घरीही आणली नव्हती. उद्या जर पोलिस कंपनीत चौकशी साठी आले आणि माझ्या खणात त्यांना ति चिठ्ठी सापडली तर ते मला या प्रकरणात गोवू शकतील. माझ्याजवळ ती चिठ्ठी कशी आली याच्ं स्पष्टिकरण नव्हतं असं नाही. पण ते पटायला हवं . मी ती चिठ्ठी लगेच ऑफिसमधून आणण्याचं ठरवलं. मी कशी बशी अंघोळ उरकली. सुप्रियाने मला जाताना मला विचारलं , पण मी तिला काहिबाही सांगून वेळ मारून नेली.

मी घाईगर्दीने ऑफिसच्या गेटजवळ आलो. खालीच सिक्युरिटी वाला भैया मला पाहून म्हणाला " अरे साव , आप भी ? " माझ्या मनात आलं , म्हणजे दुसरंकोणी आलं होतं की काय ? तोच पुढे म्हणाला, " आधा घंटा पहले ही प्रीतम साब, बडा साब (म्हणजे आय. टी. ) और पुलीस ऊपर गयी है. " माझी पंचाईत झाली. गेलो तर पोलिस भेटणार, नाही गेलो तर वॉचमन मी येऊन गेल्याचं सांगणार. मी तसाच पुढे निघालो. वॉचमन म्हणाला , "साब , सिर्फ कोनेका लिफ्ट चालू है बाई सब बंद रखा है. तळ मजल्यावर सगळीकडे अंधार होता. मी लिफ्ट जवळ जाऊन बटन दाबलं. ती खाली यायला लागली. आतून पोलीस , प्रीतम आणि आय. टी . भेटला तर ? मला या विचाराने किंचितसा घाम येऊ लागला. मी पटकन जिथे अंधार होता तिथे जाऊन उभा राहिलो. लिफ्ट खाली येऊन थांवली. माझा अंदाज खरा ठरला. माझी छाती धडधडत होती. सत्येन सुद्धा एवढा घाबरला नसावा. हा विचार काहीतरीच होता. लिफ्टमधून ते तिघेही खरच बाहेर पडले. आय. टी. चा आवाज येत होता. " अरे जयराज साब मैने आपको कहा ना हमारे ऑफिस स्टाफका इस मॅटरसे कोई संबंध नही है. ...... " त्याच्यावर तो जयराज का कोण होता तो काही वोलत होता ..... पण ते ऐकायला मी थांवलो नाही. पटकन लिफ्ट मध्ये शिरलो. आणि पाचव्या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसमध्ये शिरलो. माझ्या केबीन मधल्या टेबलाच्या खणातले कागद वर खाली करून पाहिले. पण चिठ्ठी काही मिळाली नाही. ती नक्कीच त्यांना मिळाली असली पाहिजे. माझ्या छातीत परत धडधडू लागलं. मी पटकन ऑफिसमधून लिफ्टने खाली आलो. वॉचमन म्हणाला, " साब उन्होने आपके बारेमे मेरेको पूछ नही , इसलिये मैने बताया नही. आपका काम हो गया क्या ? " मी हो म्हंटले. " मेरा मोबाईल भूल से रह गया था , वो लेने के लिये मैआया था. " त्यावर तो म्हणाला, " अरे आप एक फोन कर देते तो हम लेके कल आपको दे देते. इसके वास्ते आप इतने दुरसे आये. " मग तो ऑफिस बंद करण्यास निघून गेला.

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेलो. पोलिसांच्या बाबतीत माझा अंदाज चुकला होता. मला वाटलं नाही की पोलीस माझ्या आधीच ऑफिसमध्ये सर्च घ्यायला अले असतील. तसच आत्ताही झालं. मी इकडची तिकडची कामं पाहतोय न पाहतोय तोच माझ्या केबीन वर थाप पडली. मी शक्यतोवर आवाजत मार्दव आणून म्हंटले, " येस, प्ली ज कम इन. " अस्ं म्हंटल्यावर एक मध्यम वयाचे , पन्नाशीला आलेले , पोलिसी बांध्याचे गृहस्थ आत शिरले. त्यांना मी वसायची खूण केली. बरोबर एक हवालदारही होता. त्याला त्यांनी बाहेर थांबण्याची खूण केली . मला जरा भीती वाटली. तो गेल्यावर ते म्हणाले, " तुम्ही मि. गायकवाड , नाही का ? ,(मी हो म्हंटले) मी इन्स्पे. जयराज. "तुम्ही पेपर वाचलाच असेल. मला जरा वासंती आणि सत्येन यांचे संबंध कसे होते आणि त्यांची तुम्हाला असलेली माहिती , सांगाल तर बरं होईल. तशी सत्येननं कबुली दिलेली आहेच. पण काय आहे की लूज एंड नीट गुंफावे लागतातच नाही का ? " मग मी त्यांना मला सोईची असलेली सर्व माहिती दिली. त्यावर ते म्हणाले, " मि. गायकवाड, ते सगळं ठीक आहे. पण तुमचा जर काही संबंध नाही तर तुमच्या खणात ही वासंतीनं सत्येनला लिहिलेली चिठ्ठी काय करीत होती ? कालच आम्ही ती तुमच्या खणातून ताब्यात घेतली आहे. पंचनामा पाहायचाय ? " मी मानेनेच नाही म्हंटलं. मग ते म्हणाले," मि. गायकवाड , हे नक्की काय आहे ? तुमच्या मार्फ़त वासंती सत्येनला चिठ्ठ्या पाठवीत होती असं दिसतय. " ते माझ्या चेहऱ्याचं निरिक्षण करीत होते. माझा श्वास थांबला. छाती धडधडू लागली. मी श्वासावर कंट्रोल आणित म्हंटलं. "ही चिठ्ठी मला कोका आणि कं. च्या फाईल मध्ये बुकमार्क म्हणून सापडली. ती फाईल मला सत्येनने आणून दिली . माझा याच्याशी काहीही संबंध नाही. तो एक केवळ योगायोग होता. तुम्हाला पाहिजे असेल तर फाईल दाखवतो. " ..... त्यावर ते म्हणाले "नको कालच आम्ही ती पाहिली आहे. मि. गायकवाड , अप्रत्यक्षपणे का होईना तुम्हीसत्येनला मदत करीत होतात, असं मी का म्हणू नये ? " मला हा प्रश्न अनपेक्षित होता. मी म्हंटलं , " पण माझ्या खणात अशा अनेक चिठ्ठ्या सापडायला हव्यात., नाही का ? " ते म्हणाले, " हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी तुम्हाला प्रकरणात लिंक करू शकतो. आणि हो अशा अनेक चिठ्ठ्या तुम्ही आधीच नष्ट केल्या असतीलही , नाही का ? " आता आश्चर्य चकित होण्याची माझी पाळी होती. मी काही बोलणार तेवढ्यात , माझी केवीन उघडून आय. टी. आत आला.

खुर्ची वर बसत तो म्हणाला, " अरे जयराज साब , आपको मैने बोला ना हमारे स्टाफ का इसमे कोई संबंध नही है. इनके खिलाफ और कोई एविडन्स मिला ? मेरा मतलब है कोई ठोस सबूत ? " ते म्हणाले, " मैने आपको एक पॉसिबिलिटी का सुझाव दिया. , मग माझ्या कडे वळून म्हणाले, " मि. गायकवाड , तुमचा याच्याशी संबंध नसेलही. पण शक्यतेच काय ? " मग आय. टी. थोडा भडकून म्हणाला, " अरे क्या बात करताहै जयराज साब ? हम लोगोने तो वासंतीको पैसा देकर मदद ही की है. " मी पण मग म्हणालो, " तेच तर. ". मग ते ठिक आहे म्हणाले पण मी साक्षिदार म्हणून या केसमध्ये लागेन , तेव्हा मी विचारल्या शिवाय सध्या तरी कुठे जाउ नये..

पुढे रितसर केस चालली. मला इन्स्पे. जयराजनि कधीही बोलावलं नाही. एकदा मात्र ते मध्ये आले आणि माझं स्टेटमेंट घेऊन गेले. असच वर्ष गेलं. सुप्रियाला मुलगा झाला. ती माहेरी होती. म्हणजे सोलापूरला. माझ्या मागे तिने दुसरी नोकरी शोधण्याचा लकडा लावला होता. पण आता ही नोकरी सोडायची म्हणजे निष्कारण संशयाला खत पाणी घातल्यासारखं झाअलं असतं. मी प्रयत्नात होतोच. मला चार पाच वेळा तरी कोर्टात जावं लागलं. सत्येन ला तारखेला आणित असत. तो आता पुरता वाकला होता. त्याचे डोळे अगदी खोल गेलेले होते. पोलिसांनी आपला खाक्या दाखवला होता असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. पण मला वासंतीच्या खुनच्या रात्री नक्की काय झालं होतं ते कळलं नाही. मग यथावकाश माझी साक्ष झाली. सत्येनच्या जबानी वरून कळलं(जी पोलिसांच्या फाईल मध्ये होती )की ज्या रात्री खून झाला त्या रात्री वासंतीचं आणि सत्येन च झोपण्यावरून भांडण झालं. तिची इच्छा होती की त्याने स्वतंत्र खोलीत त्यांचा संसार मांडावा. सत्येन ला ते सहन झालं नाही आणि त्याने तिचा गळा दाबला. सत्येन च्या सुटकेसाठी आय. टी. धडपडत होता. त्याने वासंतीने त्याला मारायला उत्तेजित केलं असं सिद्ध करून दाखवलं.ते कोर्टालाही पटलं असावं. आय. टी. च्या धडपडी मुळे सत्येनला जन्म ठेप झाली. मला दुसती नोकरीही मिळाली. तिही सोलापुरला. माझे आणि सुप्रियाचे आई वडीलही तिथेच होते. मी नवीन ठिकाणी जाण्या आधी आय. टी. ला भेटलो. पण त्याला मी सोडणार हे पटेचना. तो म्हणाला, " यार विनायक , तुम छोडना चाहते हो ? उधर प्रितम भी ऐसा ही कुछ सोच राहा है. " मी प्रीतमला मुद्दामच भेटलो नाही. आय. टी. ने मला जास्त पगार शिवाय जनरल मॅनेजरचं पद देण्याच आश्वासन दिलं. पण माझा आता इंटरेस्ट संपला होता. तरीही मी सहा महिने काढले. आय. टी. च्या धडपडी मुळे केसचा निकाल लवकर लागला. जावयाने भलतेच रंग उधळले, पण सासऱ्याने मात्र त्याला वाचवण्यात जरादेखील कसूर केली नाही.

मी सोलापूरला निघून गेलो. आता मात्र वासंती आणि सत्येन यांना मी माझ्या मनातून कायमचे हद्द पार केले. गेलं वर्ष दीड वर्षाचं टेन्शन नाहिसं झालं. मला हळू हळू हलकं वाटू लागलं. स्वच्छ ऊन पडलं होतं. मी गाडी सुटल्यावर मुंबई नामक महानगरीला कायमचा " टाटा " केला.   (सं पू र्ण )