सत्येन देसाई ..... (भाग ७ वा )

प्रतिभाच्या रिपोर्ट प्रमाणे सत्येन पूर्वीसारखा स्वतःहून काम करीत नाही, असं समजलं. तसच तो बऱ्याच वेळा विचारात गढून बसतो. दोन दिवसांनंतर वासंती आली. मला आश्चर्य वाटलं. मी तिला पंधरा दिवस ती येणार नसल्याचं म्हंटलं. पण ती मानेनेच नकार देत निघून गेली. मी बाकीच्या स्टाफला कामाकरिता पिळून घेत होतो. कोणीही तक्रार करीत नव्हते. दोन चार दिवस असेच गेले. सत्येन आता नियमित येत होता. मी त्याच्याकडे मुद्दामच दुर्लक्ष करीत होतो. प्रतिभा मार्फत त्याला काम देत होतो आणि तोही तिच्या मार्फत ते माझ्याकडे पाठवू लागला. मग एक दिवस तो माझ्याकडे आला , म्हणाला, " सर, ही कोका ऍंड कंपनीची कॉंफिडेन्शियल फाईल आहे. कोर्ट मॅटर आहे फाईल तुमच्या सेफमध्येच ठेवा. तारीख असली की मागून घेईन." मी जागरुक झालो.फाईल घरी नेऊन वाचण्याचं ठरवलं. पण जमत नव्हतं. ती सेफ मध्येच पडून होती. एक दिवस मी ती बाहेर काढली. वाचतांना लक्षात आलं की त्या कंपनीकडे काही लाख बाकी होते. पण तिचा मालक परगंदा झालेला होता. नुकताच त्याला पोलिसांनी पकडला होता.

आम्ही आमचे क्लेम कोर्टाकडे सादर केले होते. दर तारखेला जावं लागायचं. फाईलची पहिली दहा पंधरा पानं वाचली. मग बुकमार्क केलेली पानं वाचावीत अस्ं वाटलं. मी सुरुवात केली. एका ठिकाणच्या दोन पानांमध्ये एक कागद खुणेसाठी घडी घालून ठेवलेला आढळला. मी ती दोन्ही पानं वाचली. पण त्यात मार्क करण्यासारखं मला काही वाटलं नाही. म्हणून मी सहज कागद उघडून पाहिला. तर ती वासंतीने सत्येनला लिहिलेली चिठ्ठी निघाली. मी ती दोन तीन वेळा वाचली. त्यावर दोन दिवसापूर्वीची तारीखही होती. त्यात लिहिलं होतं, " सत्येन कधी भेटणार आहेस ? मी तुझी नेहेमीच्या जागी वाट पाहणार आहे. तू मला का टाळतोस?. लवकर भेट, लवकर भेट, लवकर भेट..... कुठे भेटशील ते कळव. आजी फार संतापलेली आहे. घरी येऊ नकोस.धिस इज अर्जंट. " यावरून दिसत होतं की ती अगदी डेस्परेट झाली होती. माझा इंटरेस्ट वाढला . खरं तर मी हा विचार केलाच नाही त्याच्या जागी मी असतो तर काय केलं असतं. मी तिचा फायदा घेतलाच असता की नाही ? जरी ती माझ्यात गुंतली असती , तरी मी पण सत्येन प्रमाणे तिच्याशी लग्न करू शकलो नसतो. सत्येनला तर मुलगा आणि सून आलेली होती आणि जावई येणार होता.

आयुष्याच्या अशा वळणावर तो या भलत्याच मोहाला बळी पडला होता. कदाचित त्यामुळेच तो डिस्टर्ब झाला होता. वासंतीचा स्वभाव नक्की काय होता याचा मलाही अंदाज येत नव्हता. असं असून ही मी तिचा विचार का करीत होतो. ? तिला आणि सत्येनला मी सोडून द्यायला हवं होतं . पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात वासंती पक्की बसली होती. तिला कोण काढणार? माझी अवस्था एखाद्या शिकाऱ्या सारखी झाली होती. सावज समोर दिसत होतं. हे सगळे विचार माझ्या सैतानी मनाने लगेचच धुडकावून लावले. कारण पुढचा मनस्ताप मला भोगायचा होता.

मी या प्रकरणात एवढा वाहवत गेलो की , प्रतिभाच्या नजर ठेवण्यालाही मर्यादा होत्या हे माझ्या लक्षात आलं.ती ते दोघे ऑफिसच्या बाहेर काय करतात हे सांगू शकत नव्हती. मी एक डिटेक्टीव्ह हायर करण्याचं ठरवलं . मी वेळी च हात झटकून बाजूला व्हायला हवं होतं. पण तसं केलं नाही. मी एका डिटेक्टिव्ह कंपनी ला फोन केला. त्याच नाव "सृजनशील".

हे काय नाव ? असं विचारल्यावर तो म्हणाला , की त्याचं खरं नाव समीर रघुनाथ बिडवे. या धंद्यात खरं नाव वापरून चालत नसल्याने त्याने "सृजनशील" हे नाव घेतलं होतं.

त्याला मी घरी बसूनच सत्येन आणि वासंती बद्दल माहिती दिली. त्याचे घरचे पत्ते, आजपर्यंतची त्यांची वागणूक , आणि मला अपेक्षित असलेली माहिती. तो मला दर दिवसा आड फोन वरून पूर्ण माहिती देणार होता. तसेच त्याचे आठवड्याचे रिपोर्ट ही तो लेखी पाठवणार होता. मला जरा बरं वाटलं. ती तारीख होती , २७ जुन. तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत कोणत्याच प्रसंगाला मी तारखेचं महत्त्व ठेवलं नाही. आता आम्हाला कशाला तारखा सांगता ? पण पुढे असं काही घडलं की मला तारखा लक्षात ठेवाव्या लागल्या. काळ जोपर्यंत आपल्या बाजूने असतो तोपर्यंत त्याचं महत्त्व वाटत नाही. एकदा का तो फिरला की आपल्याला तो जाणवू लागतो. मग काही वेळेला सेकंद आणि मिनिटं पण जाणवतात. असो. सृजनशील ला मी दोन हजार रुपये आगाऊ दिले. सगळं काही डिटेक्टिव्ह कादंबरी सारखं घडू लागलं.

२७ जूनचा रविवार मी थंडपणाने घालवला. २८ म्हणजे , सोमवारी मी ऑफिसला गेलो. वासंती आली तरी ती बेताचं काम करायची आणि निघून जायची. दोन दिवस असेच गेले. मी सृजनशीलला दिलेल्या दोन हजार रुपयांना मुळं फुटू लागली. आय. टी. प्रीतम आणि मी ३० जूनला एका मीटिंग मध्ये होतो. एक दोन डायरेक्टर्स ही होते. अचानक चर्चेत माझ्या मोबाईल मुळे व्यत्यय आला. आय. टी. ला ते आवडलं नाही. त्याने प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. तो फोन सृजनशीलचा होता. मी एक्सक्यूज म्हणून , माझ्या केबीन मध्ये आलो. तो बोलत होता. "बिनायक सर, मी त्याला मध्येच तोडत म्हंटलं, " फोन वर माझं नाव घ्यायचं नाही. " तो म्हणाला, " सॉरी सर, पण ते दोघे काल संध्याकाळी ७.१५ ला चौपाटीवर बसले होते. माझा माणूस म्हणाला वासंती वाईल्ड झाली होती. तुम्हाला त्यांचे डायलॉग सांगतो.

ती म्हणाली, " हलकटा , फसवलस मला तू. दिवस गेले आणि आता ऍबॉर्ट करायला सांगतोस ? मजा करताना नाही विचार केलास , आपल्याला जावई येणार आहे, घरात सून आहे. मग ती रडत म्हणाली, " सत्येन अरे माझ्या आयुष्यातला तू पहिला पुरुष आहेस रे. मी तुला सर्वस्व दिलं. आणि तुला त्याची किंमत नाही ? तो दबक्या आवाजात म्हणाला, " वासंती , अगं , अजूनही मी प्रेम करतो तुझ्यावर. पण आजुबाजूची परिस्थिती लक्षात घे. मूल आपल्याला परवडेल का ? तुझी आजी काय म्हणेल ? मैत्रिणी काय म्हणतील ? "

मग ती त्वेषाने म्हणाली, " प्रेम करतोस ना माझ्यावर, मग समाजाला का घाबरतोस ? तुला काय वाटलं रे ? तु मजा करशील आणि मी तुला असाच सोडीन ? " तरीही तो म्हणाला, " लग्न तर करू शकत नाही ना ? तुला सगळं माहित असून ही तू फसलीस. आंधळी झाली होतिस तू. मी तुला फसवलं नाही. ". त्यावर ती म्हणाली, " नसेल. पण छातीठोकपणाने म्हण की हे मूल माझं आहे आणि वाढव की त्याला. डरपोक कुठला. काही नाही रे, तुम्ही विवाहित पुरुष असेच असता. तुम्हाला फक्त एक रिलॅक्सेशन पाहिजे असतं. आणि म्हणून तुम्ही बायकांचा वापर करता. तुमची सगळी वफादारी लग्नाच्या बायको बरोबर असते. तिला विटलेल्या तुम्हाला एकदम तिच्या प्रेमाचा पुळका येतो काय? मीच मूर्ख , म्हणून तुझ्या वर भाळले. " असं म्हंटल्यावर सत्येनने तिला एक कानफटात मारली आणि म्हणाला, " परिस्थितिचं गांभिर्य लक्षात घे वासंती. भानावर ये. " ......ती तरातरा निघाली आणि टॅक्सी पकडून घरी गेली सर. सत्येन तिला हाका मारित होता. मग घरी गेला.

"

माझा माणूस त्यांच्या घरावर लक्ष ठेवून आहे. , हाऊ डू यू लाइक इट सर ? " मी मध्येच म्हणालो, "लाइक इट म्हणायला तो काय पदार्थ आहे ? " तो म्हणाला,"तसं नाही सर, पण माझं काम कसं वाटलं तुम्हाला ? " मी काम ठिक आहे म्हणालो. मग त्याला दुपारी एक ते दोन च्या दरम्यान किंवा रात्री आठ नंतर फोन करायला सांगितलं. मी मिटिंग सोडून आल्याचं सांगितल्यावर तो सॉरी म्हणाला. मग मी पुन्हा कॉंफरन्स हॉलमध्ये गेलो. आय. टि. थोडा नाराज झाला. पण मी त्याला मिसेसचा फोन असल्याचं सांगितलं.

(क्रमशः)