देशी संगणक दीड हजारात!

आज बऱ्याच दिवसांनी फिजऑर्गवर चक्कर मारली आणि अतिशय आनंदाची बातमी वाचायला मिळाली. भारतीय वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिकांनी आता दीड हजारात मिळू शकेल असा अंकस्थ संगणक विकसित केला आहे.

हो. दीड हजार म्हणजे दीड हजार रुपये!

भारतीय तंत्रविज्ञान संस्था (आयायटी) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयायएस) ह्यांच्या सहकार्यातून आणि सहयोगातून झालेले हे फलित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि तांत्रिक कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे.

सौरऊजेवर चालणारा हा लायनक्स आधारित संगणक पुढच्या वर्षापर्यंत बाहेर येणार असून सुरवातीला विद्यापीठांतील विद्यार्थी हा संगणक वापरतील असे वाटते. ह्या संगणकांवर इतर गोष्टींबरोबरच जालन्याहाळक, माध्यम पाठक (मीडियाप्लेयर), द्रुक्श्राव्य संमेलक (व्हीडिओ कॉंफरन्सिंग टूल) ह्यांचा समावेश असेल. सर्व २२००० सरकारी महाविद्यालयांमध्ये विस्तृत पट्ट आंतरजाल आस्थापित करणार असल्याने विद्यार्थ्यांना हे संगणक वापरणे सुलभ होईल.

सध्या ह्या संगणकाची किंमत दीड हजार रुपये असली तरी पुढे सरकारी अर्थसाहाय्याने ही किंमत सुमारे ५०० रु. पर्यंत खाली येईल असे वाटते. जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी सरकारची उत्पादकांशी बोलणी चालू आहेत.

भारतातील साक्षरतेचे प्रमाण (६३%) इतर विकसनशील देशांहून (उदा. चीन ९४%) फार कमी आहे. शिक्षणक्षेत्रात आणि शिक्षकांत गुंतवणूक कमी असल्याने भारतीय शिक्षणव्यवस्था अडचणीत आहे, आणि सरकारकडून सुधारणेचे प्रयत्न चालू आहेत.

ही सर्व माहिती मानवी संसाधन विकास मंत्री कपिल सिबल ह्यांनी वार्ताहरांना दिली.

अर्थात मला हे सगळी माहिती फिजऑर्गच्या ह्या पानावर मिळाली. चित्रे आणि ध्वनिचित्रेही मी तेथून त्यांच्या सौजन्याने ओढून येथे संदर्भित केलेली आहेत.