एका वेड्याची गोष्ट

वेड्याचा जन्म झाला तेव्हा मास्तर आजोबा जाऊन एक वर्ष पण झालेलं नव्हत. मुलगा झाला म्हणून वेड्याच्या वडिलांनी मंडळाच्या गणपतीला चांदीच्या दुर्गा अर्पण केल्या. पण वेड्याच नशीब तर बघा ना ..
वेड्याच घर फार मोठं नव्हत, लहान आकाराच्या २ खोल्या, एक खाली आणि एक माडीवर.
वेडा दीड महिन्यांचा असेल तेव्हा मास्तर आजोबांच वर्षश्राद्ध आलं. यज्ञ केल्यामुळे घरात प्रचंड धूर कोंडला गेला.  त्यामुळे वेड्याच्या फुफ्फुसावर याचा विपरीत परिणाम झाला. वेड्याला ताबडतोब दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी २४ तासांची मुदत दिली आणि नातेवाईकांना कळवायला सांगितले.
काचेच्या पेटीमध्ये ठेवलेल्या वेड्याला बघून कोणालाही अश्रू आवरता येत नव्हते. पण देवानं त्याची करामत दाखवली आणि वेड्याचा जीव वाचला.
आजही वेड्याची आई ही घटना सांगताना फार हळवी होते. देवाचे आणि डॉक्टरांचे उपकार ती कशी विसरेल?.....
..... 
वेडा  ६ वर्षांचा होता तेव्हा वेड्याचे बाबा वारले. बाबांना अंगणात आणून ठेवलं होत. त्याची आई त्या शवावर डोकं आपटून आपटून रडत होती.
पण त्या छोट्या वेड्या पामर जिवाला काय कळतंय?
"ताई ताई, चल ना लवकर, जंगल बुक चालू होईल. ११ वाजले." अस म्हणत वेडा इकडे तिकडे लोकांच्या गर्दीतून वाट काढत बोंबलत फिरत होता.
गर्दीतल्याच एका व्यक्तीनं वेड्याला बाजूला घेतला आणि त्याला म्हणाली, "वेड्या तुला माहीत आहे का की तुझी आई का रडतिये ? तुझे बाबा असे का झोपलेत अंगणात ? ...... अरे वेड्या, तुझे बाबा तुला परत नाही भेटणार यापुढे.. "
... हे ऐकून मात्र वेडा कोड्यात पडला. त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? पळत जाऊन त्यानं बाबांच्या देहाला मिठी मारली आणि त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब पडले. त्याच्या काकांनी त्याला जवळ घेतला आणि त्याला कुरवाळत असतानाच ते ओक्सा बोक्शी रडू लागले..
.....
वेड्याच्या मामानं वेड्याच्या आईला खूप मदत केली. पेन्शन मान्य करायला त्याच्या आईला किती कष्ट करावे लागले कोण जाणे ?
वेड्याच घर भाड्याच;..  घरमालकांना सुद्धा त्रास द्यायला हिच चांगली संधी मिळाली. बऱ्याच वेळा वेड्याकडून अनेक कष्टाची काम करून घेण्यात आली.
जगाशी अपरिचित असलेल्या वेड्याला काय कळतंय हो? आई नको म्हणत असताना सुद्धा वेडा तसली हमालीची कामे - नव्हे मालकांच्या मदतीला जायचा. आपण मदत करून पण हे लोक आपल्याशी असे का वागतात ह्याच वेड्याला नवल वाटायचं.
 .....
वेडा शाखेत जाऊ लागला. तिथे त्याला अनेक चांगले मित्र मिळाले. आधीही त्याला मित्र होतेच की त्याला, ते मंडई मधले , वाया गेलेले.
पण ह्या नव्या मित्रांच्यात फालतूपण खपवून घेतला जात नव्हता. वेड्याला हळू हळू आपली जागा कळायला लागली होती.

जसा जसा वेडा मोठा होऊ लागला, त्याला बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण झाली. घरमालकांच्याच एका मोठ्या मुलानं त्याला बुद्धिबळ शिकविले. तो मुलगा नेहमी म्हणायचा, "अरे वेड्या, तू मस्त खेळतोस, बुद्धिबळाचा अभ्यास चालू ठेव, खूप पुढे जाशील.. "
पण ह्या वेड्याला होत क्रिकेट च वेड. तो त्याला म्हणायचा .. "अरे , मला तर तेंडल्या व्हायाच आहे ..  क्रिकेट  रे .. क्रिकेट "
तिथेच बुद्धिच्या बळाची वाढ खुंटली ...

खगोलविश्व म्हणजे वेड्याच्या आवडीचा विषय. आकाशातल्या ग्रह - ताऱ्यांविषयी वेड्याला फार कुतूहल वाटायचे. त्याला त्यात आवड निर्माण झाली. त्यानं त्या विषयाच वाचन चालू केलं. .... आपल्या ब्रह्मांडाची उत्पत्ती, ताऱ्यांची जन्मगाथा, कृष्णविवर हे वेड्याचे सगळ्यात आवडते विषय.
त्यानं एका सन्स्थेच सदस्यत्वं घेतलं. तिथे  त्याच "ब्रह्मांडाची उत्पत्ती" ह्या विषयावरच व्याख्यान लोकांना फार आवडलं. फार लोक होते तरी कुठे? ३० - ३५ असतील. पण सगळे खगोलशास्त्राचे अभ्यासक होते.
वेड्याला जीवनात खूप गोष्टी साकार करायच्या होत्या. चांगल्या पगाराची नोकरी, मग घर, गाडी  अशा अनेक जबाबदर्यांची रांग लागली होती.
खगोलशास्त्र काही आपल्याला तारू शकणार नाही ह्याची वेड्याला जाणीव झाली.
बी. इ. मेक करायचा त्याचा विचार होता. पण फी साठी आपल्याकडे पैसे नाहीत ह्याची जाणीव पण त्याला होती.
.......
अखेर वेड्यानं संगणक शास्त्रात उडी मारली. बऱ्यापैकी मार्क  मिळवून तो BCS झाला .
आईनं त्याला बजावलं होत - "हे बघ वेड्या, मला  एका वर्षाची फी भरता येईल, दुसऱ्या वर्षाची फी तुझी तुलाच बघावी लागेल. "
वेड्याला ही परिस्थिती माहीत होती. त्यानं तर नोकरी करत शिक्षण करायचं ठरवलं होत.
पण सुदैवानं वेड्याला sponsorship मिळाली आणि त्याची एक महत्त्वाची चिंता मिटली. एका सद्गृहस्थाने त्याच्या एका वर्षाचा शिक्षणाचा खर्च उचलला.
एव्हाना वेड्यानं त्याची ध्येयं निश्चित केली होती. कोणत्या वेळी आपल्याला काय मिळवायचे आहे हे वेड्यानं नक्की केलं होत.
इकडे वेड्याची शाखा जोरात चालू होती. त्याला आता शाखेवर शिक्षक होवून ५-६ वर्ष उलटली होती.  अनेक लहान मुलांना त्यानं चांगलाच लळा लावला होता. वेड्यालाही त्या निरागस मुलांबरोबर खेळण्यात एक वेगळीच मजा यायची.
या बरोबरच वेड्यानं खगोलशास्त्रामध्ये अनेक व्याख्याने दिली. खूप वाचन पण केलं. बुद्धिबळात अनेक बक्षिसे मिळविली.
.....
पण आता वेड्याला एक वेगळीच चिंता होती. तो MCS च्या शेवटच्या वर्षाला होता. त्याला चांगली नोकरी मिळवायची होती. अभ्यासात त्यानं भरपूर जोर मारले. चांगले मार्क मिळवत तो पास होत गेला. २-३ कंपन्यांच्या  च्या परीक्षेत नापास झाल्यावर एका चांगल्या  आय टी कंपनी मध्ये त्याला नोकरी मिळाली.
सुरुवातीचे ३ महिने तर एकदम मस्त होते. फार काम नव्हत. सकाळी वेळेत ९ ला जाऊन संध्याकाळी ६ ला निघता येत होत.
त्यामुळे ६ ३० ची शाखा आणि प्रार्थना जमत होती. अधुनमधुन मित्राबरोबर बुद्धिबळाचा आस्वाद पण घेता येत होता.
आणि एक दिवस ...
......
वेड्याच प्रोजेक्ट बदलला. कोंपनी मध्ये येण्याची वेळ नक्की होती पण घरी निघायला वेड्याला ८ ३० वाजू लागले. त्याची शाखा बंद झाली.
१० - १० तास काम करून नंतर बुद्धिबळ खेळायला वेड्याला अशक्य होऊ लागले. आणि ह्याचीच वेड्याला चिंता वाटू लागली.
सगळं संपल्यासारखं वाटू लागलं. शनिवार - रविवार ची सुट्टी पण झोपा काढण्यात जायला लागली. जीवन अगदी निरस झालं.
आय टी च्या नावानं ठण ठण करणारे अनेक लोक वेड्याला ऐकवू लागले.
पण ध्येय साकार करण्यासाठी पैसे तर लागणार होते. ह्या आय टी च्या नोकरीला झुगारून चालणार नव्हत...
.....
पण वेड्याला आता ह्या आयुष्याची सवय झाली. त्यानं त्याच्यातच मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. बुद्धिबळाचा सेट कामाच्या जागेवर नेऊन ठेवला. वेळ असेल तेव्हा तो खेळण्याची संधी गमावत नाही. खगोलशास्त्राची पुस्तके गेली पण आता internet वरती खगोलशास्त्रातील विषयी वाटेल त्या विषयावरच लेखन त्याला एका क्लिक वर मिळू लागलं.
दैनंदिन शाखा शक्या नव्हती, म्हणून वेड्यानं साप्ताहिक शाखा चालू केली. दर शनिवारी वेडा नियमित शाखेत जातो.
.....
वेड्याच पुढचं ध्येय आहे ते घर घ्यायचं. लोक त्याला विचारतात .. "काय रे ? कुठे बघत आहेस की नाही ? कोणत्या एरीयामध्ये हवाय फ्लॅट ?"
पण वेड्याकडे उत्तर तयार असत.. "अजून बघायला सुरुवात नाही केली. पण घेतला तर मी इथेच, ह्याच गल्लीत फ्लॅट घेणार.. मिरवायचं तर इथेच. अजून कुठे ?  "

.
.
कदाचित त्याच्या या विचित्र स्वभावामुळेच त्याला वेडा म्हणत असतील ....