१. रूप परमेशाचे (ज्ञानमार्ग आणि ईश्वराचे अध्यात्मिक स्वरूप)

पुरूषोत्तम परमेश्वराची प्रत्यक्ष प्रचिती अध्यात्मिक (शिवतत्व), अधिदैविक (विष्णुतत्व) आणि अधिभौतिक (पंचेंद्रियाना अनुभवास येणारे विश्व - ज्याचा या पुरूषोत्तमाशी स्वरूप संबंध आहे)  तिन्ही स्वरूपात येते.

क्षरातीत मी अक्षराहुनी उत्तम मी त्या अर्थी, पुरुषोत्तम मी वेदी लोकी ऐसी माझी ख्याती (गीता १५. १८) - पुरुषोत्तम परमेश्वराचे समग्र आकलन होण्यासाठी हा श्लोक आणि पंधरावा अध्याय महत्त्वाचा आहे.

निर्गुण, निराकार, उपाधीरहित, अविकारी, साक्षी, कूटस्थ असे परमेश्वराचे अध्यात्मिक शिवस्वरूप आहे. रमण महर्षी यालाच 'द सेल्फ' म्हणतात. या अक्षर स्वरूपाची प्रत्यक्ष अनुभूती तुरियातीत अवस्थेत येते, ती निरंतर तशीच राहाते. ही अनुभूती आलेला ज्ञानी पूर्णपणे नि:संग, व्यक्तिगत ईच्छा, वासनांच्या आणि स्थल, काल, देश, वर्ण, आश्रम  इ. च्या पलीकडच्या सहज स्थितीत स्वभावतः राहातो. या स्थितीत कुठलीच अधिदैविक साधना, उपासना करण्याची गरज उरत नाही/ तसा प्रश्नच उदभवत नाही.  अधिभौतिक जगत ही सगळी माया आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर दमन करणे आणि त्यातून विकृती निर्माण होणे हा प्रश्नच उरत नाही. अत्यंत माफक गरजा असणारे हे ज्ञानी देहधारणेपुरतेच अन्न ग्रहण करून, एखादे कौपीन सारखे वस्त्र धारण करून 'अजगर' वृत्तीने एकाच ठिकाणी स्वस्थ राहतात. हे कसलाही प्रचार, प्रसार, उदघोष, नारेबाजी वगैरे करत नाहीत. अभिनिवेश तर नाममात्रही नसतो. असते फक्त एक शांत, प्रसन्न, कृपापूर्ण सहज अस्तित्व!

सामाजिक दृष्टीने अशा पूर्ण सन्न्यस्त ज्ञानी मुनीना  सामाजिक कर्तव्य असे काही नसतेच असे म्हणावे तर वावगे ठरू नये. यांचा समाजाला भारही नसतो. हे 'युसलेस', निरर्थकवादी, शून्यवादी मात्र मुळीच नसतात. अशा नैष्कर्म्य सिद्धी साधलेल्या अवस्थेतही यांचे जीवितकार्य थांबत नाही. उलट ते अत्यंत प्रभावीपणे सहज पार पडते. या अनुषंगाने रमण महर्षी यांचे चरित्र आणि त्यांच्याविषयीचे साहित्य, विकी वगैरे जालावर  वाचल्यास हे स्पष्ट होईल.

मनाची सारी शक्ती एकवटून खरा 'मी कोण' हा शोध घ्यायचा,  'सेल्फ इनक्वायरी' साधायची तर चित्त चतुष्ट्य अनुकूल असायला हवे. या ज्ञानमार्गाला एक वेगळाच प्राग्जन्मीच्या साधनेचा अधिकार लागतो, सहज वैराग्य लागते. हे सारे घेऊन जन्माला येणारा लाखो करोडोमध्ये एखादाच. भन्नाट, अफाट, अचाट, लोकविलक्षण अशा कुठल्याच गोष्टीचा सोस ज्ञानमार्गी साधकाना घातकच. चवचाल मनाचे माकडचाळे पूर्णपणे थांबतात, बुद्धिची धाव तोकडी पडते, तर्क पांगळा ठरतो तेव्हा कुठे या मार्गावरची वाटचाल सुरू होते.  ज्ञानियाची सहजस्थिती आणि पाखंन्ड्याचा खुशालचेंडूपणा यात तर टोकाचा फरक आहे.  

काही उपयुक्त दुवे देतो :

रमण महर्षी    

आत्मविचारणा, स्वेष्णा

(क्रमशः)

[योगप्रभू यानी उपस्थित केलेले काही प्रश्न ही या लेखमालेमागची प्रेरणा आहे. त्याना मन:पूर्वक धन्यवाद]

- हरिभक्त