२. रूप परमेशाचे (मी आणि अस्तित्व - एक स्वगत)

या भागात  मी (एक प्रातिनिधीक सर्वसामान्य माणूस) आणि अस्तित्व असे एक स्वगत लिहीतो आहे.

माझा जन्म झाला. एका आत्म्याने देह धारण केला. या विशुद्ध आत्मस्वरूपाला 'मी' जन्मलो, मी बाह्य जगतापेक्षा पृथक आहे ही जाणिव देखिल नसते. तिथे कुठलीच येरझार नसते. जन्म मृत्यूचा संभव नसतो. हे आत्मस्वरूप अजन्मा असते, आणि त्यामुळेच अमरही असते. बाह्यमनाला स्पष्टपणे तशी जाणिव नसली, तरी माझा हा अनादी अनंत हिस्सा निरंतर तसाच राहणारा असतो. याला कुठलीच उपाधी लावता येत नसली तरी हा मृतवत, शून्यवत मात्र नसतो. त्याची अनुभूती  जेव्हा येते, तेव्हा ती चैतन्यमय, सच्चिदानंदस्वरूप अशीच येते. सगळीकडे नित्य दिसणारे मृत्युचे थैमान, त्रिविध ताप, व्याधी, अत्याचार हे सगळे असूनही मी नैराश्याने खचून जात नाही. ही काळोखी रात्र संपेल, उष:काल होईल अशी मला खात्री वाटते. काळोख भयचकित करून टाकेल इतका गहिरा, निबीड झाला म्हणून का कुणी आत्मघात करतो? थोडासा धीर धराल, तर संधिप्रकाशाची चाहूल लागेल. पुन्हा पक्ष्यांचे कूजन सुरू होईल, पावित्र्याची आणि मांगल्याची पहाट उजाडेल हा माझा आशावाद निव्वळ बौद्धिक स्वरूपाचा नसतो. याचे एक कारण असे की कुठेतरी खोलवर माझी नाळ या शाश्वताशी जोडलेलीच राहाते.  

मी जन्मलो, माझे असे पृथक अस्तित्व आहे ही 'खबर' देहालाही नसते. ही खबर ज्याला मिळते तो प्रान्त मन आणि बुद्धीचा. हा प्रान्त  अस्तित्वात आहे. अत्यंत प्रभावशाली आहे . असे असताना  बाष्कळ कल्पनाविलास करत मी व्यावहारिक पातळीवरचे द्वैत नाकारू शकणार नाही.  ते पाखंड ठरेल. तसे न करण्याइतका मी स्वत:शी प्रामाणिक आहे. मी निव्वळ देह असतो तर पशुवत, निसर्ग प्रेरणेने आहार, निद्रा, भय आणि मैथुनासक्त होऊन जगलो असतो. निव्वळ शुद्ध बुद्ध आत्मा असतो तरी कुठलाही धर्मतत्वाचा, नीतीचा आणि अध्यात्मिक प्रगतीचा  प्रश्नच उद्भवला नसता. आज मी जसा आहे तिथे मला माझ्या आत्मस्वरूपाची अस्पष्ट का होईना जाणिव आहे. देह आहे, पंचेंद्रिये आहेत. अत्यंत गुंतागुंतीचा, कित्येक अंतर्विरोध असणारा आणि कधी प्रवृत्तीकडे वळणारा, तर कधी निवृत्तीची हुक्की येणारा, कधी वैराग्याची गोडी वाटणारा तर कधी भोगलालसेला बळी पडणारा अत्यंत जटिल असा मनबुद्धीचा प्रान्त आहे. जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. माझ्यातला आत्मस्वरूप, अविकारी, अविचल भाग माझे अध्यात्मिक वास्तव आहे. जड तत्त्वाने बनलेला अधिभौतिक देह पंचेंद्रियांच्या माध्यमातून परमेश्वराच्या अधिभौतिक विश्वरूपाचा आपल्या परिने, काही मर्यादेत अनुभव घ्यायला सक्षम आहे. मनबुद्धीचा प्रान्त तथाकथित अध्यात्मिक म्हणवणारे पाखंडी सांगतात तसा टाकाउ मुळीच नाही. तो अधिदैविकाशी जोडला गेलेला आहे.

या शिवाय इथे मी एकटाच नाही. माझे कुटुंब, जिथे मी वावरतो तो समाज, माझे राष्ट्र या सगळ्यांचे अर्थपूर्ण अस्तित्व मी नाकारू शकत नाही/ नाकारू ईच्छित नाही. त्यामुळे मला पडणार्या प्रश्नात, गुंतागुंतीत भर पडण्याची शक्यता आहेच. त्या जोडीनेच या समस्या सोडवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते मी एकट्याने आणि 'आत्ता आणि इथे' जमतील तितकेच करावे हे गृहीतकही आपोआप मोडीत निघते. सदहेतूने प्रेरीत झालेल्या माझ्यासारख्या कित्येक सामान्यजनानी योग्य दिशेने नियोजनपूर्वक, शिस्तबद्ध असे सांघिक कार्य केले तर अशक्य ते शक्य करता येते हे असंन्ख्य वेळा सिद्ध झालेले आहे. साधे माझ्या विजारीचे बटन तुटले आणि ते मी बदलले तरी मी एकट्याने समोर असलेला प्रश्न सोडवला असे म्हणता येत नाही. विजारीचे कापड मी बनवलेले नाही, विजार मी शिवलेली नाही. दोरा, बटन, विजार हे सारे माझ्यापर्यंत पोचले त्या मागे नियोजनबद्ध अशी एक सुव्यवस्थित प्रणाली कार्यरत आहे. मला मिळणार्या प्रत्येक सुखामागे, सुविधेमागे कित्येक ज्ञात, अज्ञात सामान्य माणसांचे प्रामाणिकपणे केलेले काबाडकष्ट आहेत.  या पुढे मला जो काही अध्यात्मविचार मांडायचा आहे त्याची ही पार्श्वभूमी आहे. 'अस्तित्व' तत्त्वदृष्ट्या एकच असले, तरी माझ्या जीवभावाच्या दृष्टीने हा जो मी आणि (बाह्य) अस्तित्व असा जो संबंध आहे, तो कुठल्याही सुबुद्ध माणसाला कसा नाकारता येईल?

(क्रमशः - पुढील भागात या पार्श्वभूमीवर ज्ञानमार्गाचा विचार करू या)

- हरिभक्त