३. रूप परमेशाचे (अंतिम - गोषवारा)

(थोडक्यात गोषवारा)

- अस्तित्वाची प्रचिती जीवाला अधिभौतिक, अध्यात्मिक, अधिदैविक पातळीवर येते. वैचारिक मांडणीसाठी हे वर्गीकरण केले आहे. तत्त्वतः अद्वैत, व्यवहारी द्वैत आणि द्वैताद्वैतविलक्षण पुरूषोत्तम स्वरूप गीतेचा अभ्यास करून समजावून घेता येते, तसेच प्रत्यक्ष प्रचितीच्या दिशेने अनेकविध मार्गाने वाटचाल करता येते. भारताच्या अध्यात्मिक ईतिहासात या अनेकविध मार्गाने साधना/ उपासना केलेल्या कित्येक सत्पुरूषांचे असंख्य दाखले आहेत.

- या बाबतीत मी काय करावे असा प्रश्न येतो. एखाद्या अपवादात्मक व्यक्तीला प्राग्जन्मीच्या पुण्याईने अचानक तसा स्पष्ट आदेश मिळतो. जसा रमण महर्षीना सोळाव्या वर्षी मिळाला. इथे गोंधळ उडाला, तर सद्गुरू (दत्त तत्त्व)  मार्गदर्शन करतात, कृपा करतात. पाखंडाचे निराकरण करतात. सत श्रद्धेला बळकटी देतात. त्यात काही गैर नाही.

- अधिभौतिक हे भासमात्र आहे ही प्रत्यक्ष अनुभूती घेणार्या ज्ञानयोग्याला अधिदैविक साधने/ उपासनेची गरज नसते. ही अध्यात्माची पराकाष्ठा आहे. या मार्गाने जाण्याचा अधिकार असणारे विरळेच. ज्ञानमार्गाच्या निव्वळ संकल्पना समजल्या, तर त्या योगे सगळे प्रश्न सुटले असे समजणे ही घोर आत्मवंचना आहे.

- निव्वळ अधिभौतिक खरे असे मानणारी जडवादी, इहवादी, अस्तित्ववादी इ. दर्शने आहेत. यात मी वाटेल ते करीन, कर्ज घेउन सण साजरा करीन, उद्या कुणी पाहिला आहे? (चंगळवाद)  इथपासून सुरूवात होते. या खेरीज अधिदैविक, अध्यात्मिक गोष्टीबद्दल अज्ञेयवादी भूमिका घेत काही नैतिक मूल्यांच्या पायावर समाजाची निकोप धारणा घडवणे. विज्ञानाच्या आधारे प्रगती साधणे आणि प्रयत्न हाच परमेश्वर मानून पुरुषार्थाने निरंतर सुधारणा, प्रगती करत राहणे अशी धारणा  असते. या उदात्त, व्यवहार्य आणि आदरणीय विचारधारा आहेत.     

- परमेश्वराचे विष्णुतत्व अधिभौतिक जगाची काळजी वाहते. हा अधिदैविक प्रान्त अध्यात्मिक आणि अधिभौतिक याना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठी अवतार होतात (उदा. श्रीपाद श्रीवल्लभ, स्वामी समर्थ). अजन्मा जन्माला येतो. चैतन्य देह धारण करते. अवताराना आपले जीवितकार्य काय आहे याची स्पष्ट जाणिव असते, व ते पूर्ण होतेच. हे कार्य करताना स्थळ, काळ आणि परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि त्या ओघाने येणार्या काही मर्यादा पाळत करावे लागते. तशी गरज नसूनही, सिद्धी प्राप्त असूनही हे अवतार मर्यादाभंग करत नाहीत.  चक्क ज्ञानदेव शुद्धिपत्र आणतात. वासुदेवानंद सरस्वती आपल्या प्रत्येक चुकीबद्दल कठोर प्रायश्चित्त घेतात. कारण हे ईश्वराचे परमकारूणिक स्वरूप आहे. 'संभवामी युगे युगे' अशी या स्वरूपानेच ग्वाही दिलेली आहे. मारून मुटकून या अवताराना दोन हात, दोन पाय आहेत म्हणून आपल्यासारखे सर्वसामान्य ठरवणे, आणि त्या रोखाने तत्कालीन वास्तवाकडे डोळेझाक करून यांचे एखादे वाक्य, कृती कुतर्काच्या कचाट्यात पकडून बुद्धिभेद करणारे साहित्यिक प्रलाप काढणे हे धाडस नव्हे. अशाने समाज पुढे जाईल आणि सत्याप्रत पोचेल हे मला पूर्णपणे अमान्य आहे.

- ईश्वराचा सगुण साक्षात्कार होऊ शकतो. योगी अरविंदाना अलीपूर च्या कारगृहात झालेले कृष्ण दर्शन, स्वामी स्वरूपानंद, गुरुदेव रानडे, आर्वीकर महाराज अशा असंख्य भक्ताना झालेला साक्षात्कार हा भ्रम होता असे ठरवणे तर्कदुष्ट ठरेल असे मला वाटते. एखादी गोष्ट मी स्वतः अनुभवली नाही म्हणून तिला भ्रम ठरवावे का हा विवेक मात्र जो तो वेगळ्या प्रकारे करेल. माझा काही आग्रह नाही. असा साक्षात्कार झालेली व्यक्ती विभूतीमत्वाला पोचते. यांच्या आयुष्यात आलेले स्थित्यंतर, यांची अटळ जीवननिष्ठा आणि सर्वस्व पणाला लावून त्यानी पार पाडलेले जीवितकार्य - साक्षात्कार हा भ्रम नाही हे सहज लक्षात येण्याइतके सारे सोपे आणि सुस्पष्ट असते.

- एकांगी सांख्य/ ज्ञाननिष्ठेइतकीच एकांगी भक्ती सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. रमण महर्षी आणि आदय शंकराचार्य यांच्याइतकेच मीराबाई, चैतन्य महाप्रभू आणि जगदगुरू तुकोबाराय विरळे असतात. सर्वस्व पणाला लाऊन भक्ती साधणे, स्वात्मदान करणे हे तर हटयोगापेक्षाही अवघड आहे. अशी अमला भक्ती साधली तर फक्त अधिदैविक हेच वास्तव होते. अमूर्त अध्यात्मिक संकल्पना चिवडण्याची गरज उरत नाही. अधिभौतिक विकारवासना निरर्थक ठरतात. रमण महर्षी भक्ती ही ज्ञानमाता आहे असे या अर्थाने म्हणतात.

- सर्वसामान्यानी कर्मनिष्ठा बाळगावी. जीवन ही कला आहे. कर्माचा आनंद लुटावा. ते न साधल्यास कर्तव्यकठोर असावे. चालढकल, भ्रष्ट शॉर्टकट याना थारा देऊ नये.  ज्ञान, कर्म आणि नित्यनेमाने केलेली उपासना असा त्रिकांडात्मक मार्ग स्वीकारावा. इथे ज्ञान हे साक्षेपाने, श्रद्धेने केलेले वाचन, चिंतन, मनन या अर्थाने आहे. निव्वळ माहिती उपयुक्त नसते. विवेक जागा असेल तर तिचा उपयोग मर्म जाणण्यासाठी करता येतो. पाखंड ओळखता येते, त्याला बळी पडू नये असा साक्षेप अंगी बाणवता येतो. नीती म्हणजेच माणूस हे लक्षात येते. उदा. जगभरची इंधनाची समस्या मी सोडवू शकत नाही, मात्र इंधनाचा काटकसरीने, जबाबदारीने वापर करावा इतके निश्चितच करू शकतो. "उपासनेला दृढ चालवावे". साधी सोपी उपासना देखील नित्यनेमाने, श्रद्धेने केली तर सत्त्वाचा उत्कर्ष होतो. हळूहळू अध्यात्मिक प्रगती होते. प्रपंच, व्यवहार सगळे व्यवस्थित संभाळत हे आनंदाने आणि सहज करता येते. आपण कोण होतो आणि काय झालो हे प्रत्यक्ष अनुभवता येते, आणि हा फरक फारसा त्रास न घेता, सहजसुंदरपणे घडून येतो. तेव्हा चिंतन, मनन, उपासना इ.  सगळे व्यर्थ आहे असे कुणी कितीही सांगितले तर मुळीच पटत नाही.  असो.

(माझे लिखाण/ प्रतिसाद  काहीना व्यथित करणारे ठरत आहे, व त्यानी तशी तक्रार प्रशासकांकडे केली असे व्य. नि. ने कळवले आहे. हे लक्षात घेता थोडक्यात गोषवारा लिहीण्याचा हा प्रयत्न. ही लेखमाला इथेच थांबवतो आहे. ती मनोगतावर ठेवावी अथवा नाही हे सर्वस्वी प्रशासकांच्या स्वाधीन आहे. ते योग्य तो निर्णय घेतीलच. मला तो मान्य असेलच. आपली रजा घेतो. लोभ असावा. )

- हरिभक्त