प्रेमाचा गुलकंद -१

बसनं इंदौर सोडलं आणि माझी झोप उडाली. ३० सीटर बसमध्ये २७ नंबरच्या सीटवर बसलेल्या आणि म. प्र. मधील रस्त्यांवर चालणाऱ्या बसमध्ये माणसाची हालत व्हॉलीबॉलसारखीच होते. मी अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने शिव्या घालत, हा व्हॉलिबॉलचा खेळ कधी संपतो, याची वाट पाहत होतो. शरीराने जरी मी बसमध्ये असलो तरी मनाने कधीचाच अमरावतीला पोहचलो होतो.

खरं तर मला एका आठवड्यात 'मायग्रेशन सर्टिफिकेट' द्यायचे होते, म्हणून मी अमरावतीचा बेत आखला होता, पण त्यासोबतच श्रद्धाचं लग्नही अटेंड करायचं होतं. श्रद्धा माझ्या आवडत्या ज्युनिअरपैकी एक होती. खरं तर ती कोणालाही आवडेल अशीच होती. कॉलेजची ब्युटीक्वीन न आवडणारा एखादा आंधळाच असता.

माझ्या डोळ्यासमोरून ती २ वर्ष सरकत होती. श्रद्धाचा अन माझा पहिला परिचय झाला तो 'परिचय कार्यक्रमात'. खरं तर ती एक प्रकारची रॅगिंगच होती, मेंदूची.

"नाव ?"

"श्रद्धा" ती घाबरत हळू आवाजात म्हणाली.

"चढ्ढा ? " मी उगाचच चिडवलं.

"नाही .. श्रद्धा" ती पुन्हा म्हणाली.

तिच्या आधी जवळजवळ सगळ्याच मुलींना त्रास देऊन झालं होतं, त्यामुळे कदाचित तिने राग मानला नसावा. कारण तसं तिच्या चेहऱ्यावर दिसलं नव्हतं.

"हॉबी काय आहे तुमची ? "

आतापर्यंत ज्याने जी हॉबी सांगितली त्यात मी आणि मनोजने समोरच्याला प्रश्न विचारून पार हैराण केले होते. आणि आताही आम्ही संधी सोडणार नव्हतो.

"स्वयंपाक करणे" ती शांतपणे म्हणाली, तसं तिला राग का आला नव्हता, ते कळलं.

" तू विचार " मनोजने माझ्याकडे चेंडू टोलवला.

आता आम्हाला स्वयंपाकाबाबत तो कसाही असलातरी चापून खाणे आणि मेसवाल्याला दिलेले पैसे वसूल करणे, इतकंच माहिती होतं. आम्ही कधीही भाजी कसली आहे, अन त्यात काय टाकायला हवं होतं याही भानगडीत पडलो नव्हतो. पण माझ्याकडे आलेला चेंडू मुलींकडे सोपवणे म्हणजे घोर अपमान वगैरे वाटला, म्हणून सहज विचारलं,

"काय करता येते स्वयंपाकात? "

"शाकाहारी जवळजवळ सगळेच पदार्थ" हे ऐकून आमच्याच वर्गमैत्रिणी गालातल्या गालातल्या हसत असल्याचे मनोजच्या लक्षात आले अन ते त्यानं मला हळूच खुणावून दाखवलं.

"अच्छा... अशी खुन्नस काढत आहे का ?" मी मनाशीच म्हणालो. श्रद्धाही गालातल्या गालात हसत होती. माझं डोकंच फिरलं, पण कंट्रोल करत मी विचारलं,

"पुरणपोळी करता येते? "

"हो" ती इतकी सहजतेने म्हणाली की माझा आत्मविश्वास डळमळायला लागला. पालक म्हणून आंबटचुका आणणारा मी, कोहळ्याला रंगीत भोपळा म्हणून विकत घेणारा मी आणि असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागले. पण म्हणतात ना की माणूस घाबरला की रागावतो, अन तसंच झालं.

"कोणत्या डाळीचं करतात पुरण? "

"हरबऱ्याच्या" काय मूर्खासारखं विचारत आहे, असा भाव चेहऱ्यावर आणत ती म्हणाली. मी अजूनच इरेला पेटलो. उत्तरातून नवीन प्रश्न तयार करण्यात माझा हातखंडा होता, त्यानुसार मी विचारलं,

"का ? तुरीच्या डाळीचं नाही करता येत ? "

एखाद्याला एखादी गोष्ट करता येणे आणि त्याला असच का करायचं हे माहिती असणे यांत फरक असतो. ती विज्ञानाची विद्यार्थिनी होती गृहविज्ञानाची नाही. त्यामुळे तिची थोडी चलबिचल झाली.

"नाही म्हणजे करता येते पण .. "

"मग का नाही करत?" मी डाव परत हातात आल्याच्या आनंदात विचारलं.

"मला नक्की नाही माहिती पण मी उद्या सांगेन" तिचा आत्मविश्वास कमी पडला असावा.

"अहो तुमची हॉबी आहे ना ? मग कमीतकमी इतकं तरी माहिती पाहिजेच ना ? " मी उगाचच चिडवलं.

"तुम्ही दुसरं काही विचारा सर.. " ती जरा खिन्न होऊन म्हणाली.

"असं. बरं हे सांगा की चण्याच्या डाळीचं पुरण करता येते" मी पुन्हा मूळपदावर आलो.

"सर पुरण सोडून दुसरं काही ... "

"नाही ... उद्या तुम्ही विचारून या, मग बघू ..." असं म्हणत मी माझ्या वर्गमैत्रिणींकडे खुन्नसने बघितलं. त्यांचा चेहरा पडला होता.

********************************************************************

दुसऱ्या दिवशी ती तयारी करून आली असावी, कारण मी "पुरण" म्हणताच तिने सुरुवात केली.

"सर हरबरा आणि चणा डाळ एकच आहे"

"नक्की ?"

"हो सर मी आईला विचारून आलीय... आणि तुरीच्या डाळीचही करतात पण चव थोडी वेगळी असते ...  "ती म्हणाली.

"मग काय शिकल्या तुम्ही यातून ?" मी उगाच फिलॉसॉफी झाडली.

"सर मी शिकली की माणसाला आत्मविश्वास असावा तर तुमच्यासारखा" हे ऐकून मी स्वतःच चकीत झालो तर वर्गमैत्रिणी जळून खाक.

 आदल्या दिवशी विद्यापीठापासून दस्तुरनगर हे ८-१० किमी अंतर सायकलने जाऊन ताईकडून "चणा आणि हरबरा डाळीत काय फरक असतो हे समजून घेतलं होतं", याचं समाधान वाटलं होतं आणि आनंदही.

अश्याच काही प्रसंगांची उजळणी होत होती, पण मध्येच बसणाऱ्या धक्क्यांनी त्या धुंदीतून बाहेर येत होतो आणि पुन्हा त्या आठवणींत हरवून जात होतो.