प्रेमाचा गुलकंद -२

आमचं इंट्रो (इंट्रोडक्शन) चांगलं चालू होतं. मी आणि मनोजच फक्त प्रश्न विचारत असल्यामुळे आम्ही दोघं सगळ्या ज्युनिअर्सच्या ओळखीचे झाले होतो. पण आमची कीर्ती इतकी पसरली असेल असं वाटलं नव्हतं. रोज कॉलेज ४:३० ला सुटायचं आणि आम्ही अर्धा तास ज्युनिअर्सला तासायचो. साधारण १५-२० झाले होते. आता आम्हालाही अभ्यासाला लागणे भाग होते, शेवटी थोडक्यात मजा असते. नेमकं ज्या दिवशी आम्ही हे रॅगिंग संपवणार होतो, त्याच दिवशी श्रद्धाचा भाऊ आला अन ती वर्गात न दिसल्याने सरळ आमच्या एच. ओ. डी. कडे गेला. एचओडी काही सांगणार त्याआधीच तो भडकला, अन झालं.

त्याच्या अपेक्षेनुसार एचओडी गयावया करतील असे वाटले पण झाले उलटेच. एचओडिने त्यालाच झापले, अन म्हणाले की पाहिजे असेल तर त्याच्या बहिणीची ऍडमिशन कॅन्सल कर. तो घरी जाऊन श्रद्धाला बोलला असावा. दुसऱ्या दिवशी एचओडीने आमची बाजू घेऊन सगळ्या ज्युनिअर्सला इतकं खडसावलं की बस्स... सगळे ज्युनिअर्स घाबरले.

त्या दिवशी आम्ही "इंट्रो" नाही म्हणून मी मनोजसोबत निघालोच होतो की श्रद्धा समोर आली. ती म्हणाली,

"सर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं"

"हा, बोला ना" मला वाटलं की नोटस वगैरे मागेल. पण तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. ती काही बोलणार इतक्यात फकडी आला. फकडी म्हणजे एचओडीचा प्युन. जसं वादळ यायच्या आधी फकड्या येतात तसा हा नेहमी एचोडीच्या क्लासच्या आधी यायचा म्हणून त्याचं नाव फकडी ठेवलं होतं.

"सरांनी बोलवलंय"

"मला ? " मी आश्चर्याने विचारलं कारण 'फी बाकी आहे' या एकाच कारणासाठी एचओडी बोलवायचे, पण माझीतर फी भरून झाली होती.

"दोघांनाही"

आम्ही एचओडीकडे गेलो. एचओडीने आम्हाला बसवले. आम्ही सर्द. आदल्या दिवशीचा श्रद्धाच्या भावाचा आणि नंतर त्यांनी ज्युनिअर्सला खडसावल्याचे सांगितले. मग म्हणाले,

"चांगलं तासून घ्या त्यांना, पण बाहेर नको, सेमिनार हॉलमध्येच बसत जा. तुम्ही चांगली मुलं आहात हे मला माहिती आहे, तुम्ही या मुलांना एमएस्सीचा अभ्यास कसा करायचा असतो, ते शिकवू शकता... आणि बेसिक पक्कं करून घ्या त्यांचं" आम्ही ते ऐकून गारच पडलो. एक तर आपली तक्रार गेली, त्यात सरांनी आपली बाजू घ्यावी, मला तर ज्युनिअर्सवर चिडावं की सरांचे आभार मानावे तेच कळत नव्हतं.

आम्ही बाहेर आलो, तर श्रद्धा वाट पाहत होती.

"म्हणजे आमची तक्रार केली तुम्ही, नाही ?" मनोज चिडला.

"सर त्यात माझी काहीच चूक नव्हती. एचओडी सरांनी वर्गात विचारलं तेव्हा सगळ्यांनीच हात वर केले होते, तक्रारीसाठी. "

हे नवीनंच कळलं आम्हाला.

"मग? "

"आधी एचओडीसरांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि मग आम्हाला चांगलंच झापलं. तुम्ही आमचे बेसिक क्लिअर करून घेत आहे, त्याचा आम्हाला त्रास होतोय, हे चालणार नाही असं म्हणाले. आणि सगळ्या ज्युनिअर्सने सगळ्या सीनिअर्सची माफी मागावी, असही म्हणाले, म्हणून ... "

"अच्छा, म्हणजे सर म्हणाले म्हणून तुम्ही .... "

"नाही सर, तसं नाही"

"कशाला आम्ही स्वतःचा वेळ तुमच्यासाठी द्यायचा? म्हणजे आम्ही मेहनत घ्यायची, तुमच्यासाठी अन तुम्ही तक्रार करणार... जा काही इंट्रो-बिंट्रो होणार नाही" मनोजने सुनावलं अन मला जवळजवळ ओढतच घेऊन गेला.

"अबे पण तिचा त्यात काय दोष?"

"तू लेका जसाच्या तसा राहणार"

"म्हणजे? "

"अबे पोरींचे फक्त भेजेच पाहणार का तू ? ती इतकी सुंदर आहे.. "

"ओ भाऊ ... ती लाख सुंदर असेल पण मी काही राजकुमार नाही"

"पण भावी गोल्डमेडॅलिस्टतर आहे नं" मन्यानी मला हरबऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न केला. मला ते लक्षात आलं पण मी काही बोललो नाही. त्याला वादात हरवणं, मलातरी अशक्य होतं. मी चुपचाप हो म्हणालो. त्याच्या अंदाजानुसार श्रद्धा दुसऱ्याच दिवशी मला भेटली. तिने बरेचदा माफी मागितली. ती सरळ मनाची असल्याचं मला तेव्हाच लक्षात आलं. पुढे सामोपचाराने पुन्हा इंट्रो सुरू झालं, मात्र नंतर केवळ फिजिक्सचेच प्रश्न विचारल्या जात होते, त्यामुळे माझाही अभ्यास वाढू लागला. महिन्याभरात "फ्रेशर्स पार्टी" झाली अन मग आम्ही सगळे मित्र झालो.

आमच्या विनंतीला एचओडींनी होकार देत आम्हाला एक विशेष डिपार्टमेंटला लायब्ररी कम स्टडी रुम उपलब्ध करून दिली होती. त्यात मी बसून असताना बरेचदा श्रद्धा तिच्या अभ्यासातल्या अडचणी विचारत असे.

फार सुखाचे दिवस होते ते. मी एक सुस्कारा सोडला.