प्रेमाचा गुलकंद -३

आमची छोटी लायब्ररी एक प्रकारे चर्चेचे ठिकाण झाले होते. खरं तर श्रद्धाला माझी मतं कधीच पटत नसे, त्यामुळे आमची चर्चा नेहमीच भांडणाच्या सुरात चालायचे. मग विषय सापेक्षतेचा सिद्धांत असो की राजकारण.

असेच दिवस भराभर निघून गेले. माझं एमएस्सी झालं आणि त्याच कॉलेजला मी शिकवायला लागलो. माझं लेक्चर झालं की श्रद्धाचे प्रश्न तयारच असायचे. नेटची तयारी करण्यासाठी मी लायब्ररीतच बसत असे, त्यामुळे श्रद्धाची आणि माझी रोजच भेट होत असे. पण तिचं एमएस्सी झालं अन ती एक दिवस मला भेटायला आली.

"सर, उद्यापासून मी नाही येऊ नाही शकणार"

"हम्म.... अभ्यास मात्र सोडू नकोस, तू नेट सहज होऊ शकशील"

"नाही सर. घरी राहून अभ्यास करणे शक्य नाही"

"पण.. "

"सर, एक विचारू ? "

"हा विचार ना.. "

"तुम्हाला माझी आठवण येईल. "

"व्वा, का नाही येणार ? खरं सांगायचं तर तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस. "

"खरंच? "

"हो. का विश्वास नाही बसत ? तुझं भांडणं मी मिस करेन "

"एक सांगू ? "

"हा"

"मी मुद्दामच तुमच्याशी भांडत होती"

"म्हणजे? "

"म्हणजे एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे पैलू माहिती होण्यासाठी, मी मुद्दामच तुमच्या विरुद्ध बाजूने बोलायची. त्यातून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या मी जन्मभर विसरू शकणार नाही. अर्थात जीवनात पुढेही तुमच्याशी असे भांडणं करायला निश्चितच आवडेल... "

ती माझी अन श्रद्धाची शेवटची भेट. त्यानंतर ती स्वतःहून कधी भेटायला आली नाही, ना मी कधी तिच्याशी संपर्क ठेवू शकलो नाही. शेवटी मला माझं करिअर बनवण्यावर जास्त लक्ष देणे आवश्यक होते. बाकी विद्यार्थी होतेच, त्यांच्याशी चर्चा करण्यात वेळ जात होताच. श्रद्धाच्या मैत्रिणी आता माझ्यासोबत अभ्यासाला बसायच्या. अन नेटच्या तयारीत मी गेट पास झालो, आणि मग गडबडच झाली. एमटेक का पीएचडी, हे कॉलेज की ते, ऍडमिशन फॉर्म, कागदपत्र, मुलाखती, सगळ्यांमध्ये २-३ महिने निघून गेले. अन मला इंदौरला ऍडमिशन मिळाली. पण "मायग्रेशन सर्टिफिकेट" तेव्हडं घ्यायचं राहिलं, त्यासाठीच आताची ही चक्कर. 

आतापर्यंत माझा फुटबॉल करून मला टोलवण्याचा खेळ अचानक थांबला होता. बस एकदम जसं विमान चालावं तशी स्मुथली चालत होती. मला लक्षात आलं की आता आपण महाराष्ट्रात आलो आहे. बहुदा मुक्ताईनगर आलं असावं, असा विचार केला अन चांगली ताणून दिली.

अमरावतीत पोहचलो तेव्हा दिलीप मला घ्यायला आला होताच. थोडंसं फ्रेश होऊन मी विद्यापीठाचं काम आटोपलं, अन मंगल कार्यालयात पोहचलो.

"हे विजय सर... " दिलिपने एका गृहस्थाशी ओळख करून दिली. त्यांना खास कोल्हापुरी फेटा बांधला होता, त्यावरून ते श्रद्धाचे वडील असावेत, असा मी अंदाज बांधला.

"अरे व्वा ! तुम्ही आलात सर, मला खूप आनंद झाला. गेले २-३ वर्ष तुमच्याबद्दल श्रद्धाकडून ऐकलं होतं, आज भेट झाली".

"या सर, श्रद्धा नेहमी तुमच्याबद्दल सांगायची. तुम्ही एमटेक करत आहात हे ऐकून मला खूपच आनंद झाला. " श्रद्धाच्या आईने आम्हाला आत नेलं. त्यांचं श्रद्धा माझ्याबद्दल काय काय सांगायची, हे ऐकवणं सुरूच होतं. एखाद्या ज्युनिअरच्या घरी मी इतका माहिती असेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.

थोड्याच वेळात बाकी ज्युनिअर्स आले, मग त्यांचेशी गप्पा करण्यात मी मश्गुल झालो. लग्न लागलं अन मग सुलग्न. सुलग्नाच्या वेळी श्रद्धाने "सर तुम्ही इथे या" असं म्हणत मला तिच्याशेजारी उभं करत फोटो काढायला लावला. तिला मी बरेचदा बघितलं होतं, पण ते कॉलेजमध्ये. ती मेकअप न करताच सुंदर दिसायची, आणि आता तर चक्क लग्नात, ती अगदी ऐश्वर्यापेक्षाही सुंदर दिसत होती. थोड्यावेळात आम्ही खाली उतरलो अन सरळ बफेकडे वाट केली.

"काय करतो नवरा मुलगा?" मी सहज विचारलं

"आय टी वाला आहे सर तो... " दिलिपनं माहिती पुरवली.

"हं म्हणजे दन्न कमावणारा... " दुसरा बोलला.

उगाच इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. जेवण संपलं अन आम्ही निघायच्या तयारीत होतो, पण दिलिपने थांबवून घेतलं. जवळजवळ सगळे मित्र-मैत्रिणी चित्रपटासाठी गेले. मला जागरणामुळे झोप यायला लागली होती.

"मला ताईकडे सोडून देशील का ? " मी दिलिपला विचारलं

"सर, जेवण व्यवस्थित झालं नं" मागून येत श्रद्धानं विचारलं.

"हो हो, अगदी छान" मी म्हटलं. खरं तर ती काय बोलतेय याकडे माझं फारसं लक्षच नव्हतं. दोन वर्षात मी श्रद्धाला कित्येकदा बघितलं असेल, मनोजने तिच्यावरून चिडवलंही होतं, पण मला तिच्याबद्दल आकर्षण असं वाटलं नव्हतं. पण याक्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की ....

"सर, हे तुमच्यासाठी... " तीने गुलाबांचा एक सुंदरसा बुके मला दिला.

"हे ... ? "

"तुमच्या गेटसाठी आणि एमटेकच्या ऍडमिशनसाठी"

"थँक्यू ... " इतक्यात तिला कोणीतरी बोलावलं.

"का रे, ही इतकी सुंदर, अन हिला नवरा काळाडोमडा मिळावा, काय दुर्दैव आहे. " मी दिलिपशी इतक्या वेळ दाबून ठेवलेलं माझं मत सांगितलं.

"सर मी पण काळाच आहे नं ? " शेवटी तो श्रद्धाचा जवळचा मित्र होता, त्याला वाईट वाटले असावे.

"अरे पण तू स्मार्ट आहेस, तो कसा एकदम भदाडा वाटत आहे, अगदी लंगूर के गले मे अंगूर म्हणतात तसं झालं, वाईट वाटते यार"

"आता वाईट वाटून काय उपयोग ?"

"म्हणजे? "

"जेव्हा ती तुमच्या जवळ होती, तेव्हा तुम्हाला तो आईन्स्टाईन जास्त प्रेमाचा वाटला... तेव्हाच मनात आणलं असतं तर नवरदेवाच्या खुर्चीत तुम्ही असते"

"अरे पण मी विचार करून काय उपयोग होता, तिला पसंत पडायला नको होतो का मी ?"

"हो ! ती काय लाऊडस्पीकर घेऊन सांगणार होती तुम्हाला.... "

"म्हणजे श्रद्धा ... "

"हो, पण तुम्हाला ती समोर असतानाही फोटॉन अन बोसॉन जवळचे वाटत होते.... दुर्दैव तिचं"

"अरे पण तू हे आधी नाही सांगायचं... "

"किती वेळा सर ? किती वेळा ? "

"म्हणजे ? "

"म्हणजे काय म्हणजे ? तुमची सीनिअर, वर्षा मॅडम, मग तुमचीच बॅचमेट अनुजा मॅडम, मग श्रद्धा .... आणि नंतर .... जाऊ द्या... तिकडे त्या पोरी एकमेकींशी तुमच्यावरून भांडत होत्या, अन तुम्ही श्रॉडिंजर अन आईन्स्टाईनचं भांडण सोडवायचा प्रयत्न करत होते...."

"पण .... "

"आता काही उपयोग नाही... सगळ्यांचे लग्न झाले .... ही शेवटची... "

हे ऐकून माझं डोकं भणभणायला लागलं.

"चला आता ... एम टेकमध्ये तरी सुधरा.... " दिलीप चिडून बोलला.

ताईकडे आलो. तिने काही म्हणायच्या आतच मी म्हणालो, " जागरणानं माझं डोकं दुखतंय, मी झोपतो, मला उठवू नको. "

किती वेळ झाला होता कुणास ठाऊक, मला कोणीतरी गदागदा हालवून जागं करत होतं,

"सायली...  कशाला मला उठवत आहे? झोपू दे मला .. "

"मामा, अरे सकाळचे ९ वाजले, किती झोपणार ? "

"९ ? बापरे, म्हणजे मी रात्री जेवलोसुद्धा नाही"

"नाही नं, उठ, आईनी चहा केला आहे, ब्रश कर पटकन.. मग तुला एक गंमत दाखवते, मी केलेली. "

"कसली गंमत ? "

ती माझ्यासमोर एक काचेची बाटली घेऊन आली.

"हे बघ, तू काल गुलाब आणले होते ना, मी त्याचा गुलकंद बनायला ठेवला आहे ... "

मी हताशपणे त्या प्रेमाच्या गुलकंदाकडे पाहत होतो.