दुसऱ्या वर्गाचा लोकलचा प्रवास सुखाने कसा कराल?

आपल्यापैकी बहुतेक जण मुंबईतील लोकल प्रवासाचा केव्हा ना केव्हा अनुभव घेतातच. जे हा अनुभव नियमित घेत नाहीत त्यांच्या साठी हा लेख म्हणजे मनोरंजन किंवा नियमित प्रवासासाठीचे प्रशिक्षण ठरू शकेल असे वाटते. लेखकाच्या किमान पस्तिस ते चाळीस वर्षाच्या अनुभवाचे हे सार आहे. कदाचित हा लेख वाचल्यावर आपल्याला यात काही विशेष असे वाटणार नाही , परंतु रोजच्या रोज जाऊन आपल्या संवेदना बोथट झाल्या असण्याची शक्यता आहे, त्यांना जरा झळाळी आणण्याचे काम झाले तरी पुष्कळ साध्य झाले असे मला वाटेल. थोडक्यात नियमित प्रवाशांसाठी हा एक प्रकारचा " रिफ्रेशर्स कोर्स " ठरेल. असो इतकी प्रस्तावना पुरे असावी. आपण एखाद्या टर्मिनसला (मराठी शब्द नक्की माहित नाही ) गाडी पकडत असाल तर ह्या लेखात लिहिलेल्या आसन पद्धतींचा अनुभव आपण घेऊ शकता. तसेच हा विषय नसंपणारा असल्याने काही नवीन पद्धतीही आपण प्रचारात आणू शकता. समजा तुम्ही ठाण्यासारख्या अथवा बोरिवली किंवा कल्याण सारख्या स्थानकावरून मुंबईकडे जाणारी धीमी गाडी पकडत असाल आणि तुम्हाला बसायला जागा मिळाली असेल तर तुमची बसण्याची पद्धत काय असावी ते पाहा. खालील प्रकार आपण योग्य रितीने वापरू शकता. :- खिडकीजवळिल जागा मिळाली असल्यास कसे बसाल जेणे करून ठाणे मुंबई प्रवास आपणास सुखाचा होईल. ह्याच पद्धती मध्ये जागा मिळाली असल्यासही आपण वापरू शकता. तसेच ह्या पद्धतींचे दिग्दर्शन आठ माणसे बसण्याचा बाकडा (म्हणजे बेंच) असल्यास जास्त चांगल्या रितीने होते.असा अनुभव आहे. तीन माणसे बसण्याच्या बाकड्यावर जास्त अनुभव येत नाही अस वाटतं. असो. आता पद्दती पाहा.

१)पायांचा इंग्रजी "व्ही " अक्षरासारखा आकार करून बसणे. :

या पद्धतीत लाज न बाळगता पाय फाकवून पायात "व्ही "अक्षरासारखा आकार करून बसावे. आपण बारिक असलात तरीही मख्ख चेहेरा करून बसावे. कोणी ही कितीही विनवण्या केल्या तरी स्थितप्र्ज्ञासारखा चेहेरा करून बसणे आवश्यक आहे. भावनेच्या आहारी जाऊ नका आणि सरकू नका. गाडी सुटण्या आधी गर्दी वाढत गेली तरीही याप्रमाणेच बसावे. आपण जाडजूड बंधू असाल तर प्रश्नच मिटेल. कोणी ही तुम्हाला सरकायला सांगणार नाही . जरी सांगितलं तरी खाऊ की गिळू अशा नजरेने बघावे . आपण बारीक असाल आणि आपल्याजवळ ब्रिफकेस असेल किंवा एखादी खांध्यावर लावण्याची धोपटी (हल्ली कॉलेज मध्ये वगैरे नेण्याची पद्धत आहे) असेल तरी ती सामान ठेवण्याच्या जागी न ठेवता मांडीवर आडवी ठेवा. म्हणजे बरेचसे प्रश्न संपतात. आपण व्यापलेल्या जागेचा कोणालाही अंदाज येत नाही व सरकावे लागत नाही. असे बस्ल्याने फारच उत्तेजक परिश्थिती निर्माण झाल्यास , म्हणजे भांडण वगैरे, तर बाजूची हात ठेवण्याची जागा दाखवावी व सरकण्यास आपण असमर्थ असल्याचे दाखवावे. आपण बारिक असल्यास ही कसरत थोडी महागात पडते. अशा वेळी नुसतेच सरकल्यासारखे करावे. जर भांडण वाढलं तर मराठीत न बोलता (समोरचा मराठी भाषीक असला तरी) हिंदीतच बोलावे. म्हणजे प्रभाव पडतो. दुसऱ्या वर्गात चुकूनही इंग्रजी वापरू नये. त्या ऐवजी शिवराळ शब्दांचा वापर कुशलतेने करावा. या पद्धतीत थोडे अनैसर्गिक स्थितीत बसावे लागते. घरी गेल्यावर पावलाचे सांधे व पाठ दुखणे वगैरे चिल्लर दुखण्यांना सामोरे जावे लागते. पण क्षणिक सुखापुढे या दुःखाला काहीच अर्थ नाही.

२) पायांचा इंग्रजी "ए" अक्षरासारख आकार करून बसणे.

ही पद्धत वाजवी पेक्षा जास्त उंच माणसांसाठी चांगली आहे. दोन्ही गुडघे व मांड्या एकमेकांना चिकटून ठेवल्यास व खालील पाय ए अक्षरासारखे ठेवल्यास ही आसनस्थिती घेण सोपे जाते. याने बऱ्याच गोष्टी साध्य होतात. याचा फायदा म्हणजे गर्दी असल्यास कोणीही तुम्हाला सरकायला सांगत नाही. कारण वरवर पाहता तरी सरकायला मोकळी जागा दिसत नाही. तसेच अगदी शेजारी बसणाऱ्या माणसाची फार उत्तम रितिने अडचण करू शकता. त्याला सीट वर जागा दिसत असुनही (जी इतरांना सहज दिसत नाही) तो ती व्यापू शकत नाही. परिणामी त्याला अवघडल्या स्थिती त बसावे लागते व कृत्रिम गर्दीही निर्माण करता येते.शेजारी बसणारा मराठी आहे असे वाटल्यास (खात्री करायला जाऊ नका) सर्व अटी तंतोतंत पाळा. कारण आपल्याच माणसाला त्रास देणे हा आपला बाणा आहे. बाचाबाची झालीच तर कोणतीही उत्तरे कृपा करून इंग्रजी अथवा मराठीत देऊ नका, त्याने तुम्हाला कमीपणा येईल. शिवराळ भाषा प्रकरण हात घाई वर आल्यासच अधून मधून पेरा. तसेच आजुबाजूच्या गर्दीतील मराठी माणसांकडे पाहू नका . तुम्हाला पाठिंबा मिळणार नाही याची खात्री बाळगा. याने एक फायदा होतो , तो म्हणजे आपली लढाई आपण कशी लढावी ते प्रशिक्षण आपणास मिळेल. त्यातून गर्दीत एखादा ओळखीचा मराठी असेल तरी तो हळूच हसेल पण पाठिंबा देणार नाही. त्यातून तुम्ही त्याच्या जातीचे अथवा पोटजातीचे अथवा गाववाले असाल तर थोडी फार आशा आहे.(असं लिहायला वाईट वाटत आहे.) बाकी घरी गेल्यावर पाय दुखणे , कंबर दुखणे हे चिल्लर आहे.

३)पायांचा इंग्रजी "डब्ल्यू " करून बसणे.

ही आसन स्थिती अनैसर्गिक असली तरी बरी आहे. मात्र यात पायांवर मोठी बॅग अथवा ब्रिफकेस असणे आवशयक आहे. येथेही एक काळजी घेणे आवश्यक आहे ती म्हणजे, आपल्याला बॅग सामान ठेवण्याच्या जागेवर ठेवायला सांगतील , जी आधीच भरगच्च भरलेली असते. ती तेथे ठेवण्याचे तर राहू द्याच , पण नुसते डोळे मोठे करून सांगणाऱ्या कडे पाहा व स्वस्थ बसा. त्यातून वाद झालाच तर हिंदी भाषेतच (मुंबईचे हिंदी) खरपूस समाचार घ्या, व आपली बॅग वर ठेवल्याने कशी हरवली हे सांगा. तसेच आपल्या बॅगेत सरकारी महत्त्वाचे कागद असल्याचे सांगा . जरी तुमच्या बॅगेत वर्तमान पत्र व लंच बॉक्स असला तरी, हेच स्पष्टिकरण योग्य ठरते. आजूबाजूला पाठिंब्यासाठी पाहू नका (कारण आसन पद्धत दोन मध्ये आहे). आपले बोलणे चालूच ठेवा. बोलणाऱ्याला आपण कोठून बोललो अशी लाज वाटली पाहिजे. शिवराळ भाषा वापरू नका. प्रकरण हातघाईवर येईल, जागा जाईल व सुखाच्या प्रवासाला मुकाल.

४)ही आसन स्थिती मधल्या सीटवर बसण्यासाठी उत्तम आहे.पायांमध्ये इंग्रजी "आय" अथवा "टी " (काही लोक त्याला टी का म्हणतात माहित नाही. ) करून बसणे

जर आपल्याला एव्हढीच जागा मिळत असेल की दोन पायात फारच थोडे अंतर ठेवता येत असेल किंवा ते चिकटवून ठेवावे लागत असतील तर पाय व मांड्या एकमेकांना चिकटवून बसावे. परंतु आपण दोन्ही पावले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला विशिष्ट कोनात (४५ अंशाचा कोन करून , अंदाजे) ठेवावीत म्हणजे शेजारच्या माणसाला त्याच्या पावलावर दाब जाणवेल व तो जरासुद्धा पाय हालवू शकणार नाही. अशी स्थिती आपण उतरेपर्यंत सोडू नये. यासाठी मुंबई पर्यंत जाण्याची गरज नाही. साधारण माटुंग्या पर्यंत ही मजा चाखता येते. पश्चिम व हार्बर साठी योग्य स्थानके ठरवावीत. ही स्थिती शेवटपर्यंत न सोडल्यास आपल्याला दुसऱ्याचे दुःख ते आपले सूख आहे हे जाणवते. अशा रितिने आपले सूख काल्पनीक असले तरी चालेल. यात काल्पनीक सूख म्हणजे, " कसा साल्याला पायपण हालवता येत नाही " असे वाटणे. यात दोन्ही पावलात कोन जमत नसल्यास एकच पाऊल विशिष्ट कोनात ठेवावे. अर्थातच हेतू वरीलप्रमाणेच आहे. येथे बसताना दुसऱ्याला नीट बसून न देणे हा हेतू साद्ध्य झाला पाहिजे. भांडणा करिता नियम व अटी पूर्वी लिहिल्याप्रमाणे आहेत. यात आणखीन एक उपस्थिती घेता येते. ही स्थिती अवघड असली तरी बरीचशी कृतिशील आहे. गर्दीत आपल्या ओळखीचा दुसरा माणूस असल्यास त्याला मांडीवर बसण्यास सांगावे. त्याला वर्तमान पत्र असल्यास पसरून वाचण्यास सांगावे. नसल्यास हरकत नाही. थोडे फार अश्लील हासणे व बोलणे मात्र जरुर आहे. आपल्या कंपार्टमेंटमध्ये स्त्री अथवा एखादी मुलगी असल्यास जास्त चांगले. कोणीही हरकत घेतल्यास पूर्ण दुर्लक्ष करावे. अचकट विचकट बडबड करीत राहावे. तसेच जमल्यास चावट गाणी म्हणावीत अथवा मोबाईल वर वाजवावीत अथवा मांसाहारी विनोद करावेत. म्हणजे इतर वयोवृद्ध माणसेही डोळे मारीत हासतील.

(क्र म शः )