पुन्हा ...!

मी नांगरले हृदयांत पुन्हा

पाऊसखुणा डोळ्यांत पुन्हा..!
      बघ देवांचे होईल भले
     ते बडव्यांच्या कळपांत पुन्हा..!
तु विसर किनारे जगण्याचे
ह्या लाटांच्या खेळांत पुन्हा..!
     रे माय तुझी गेली मरूनी
     तु कशांस देवघरांत पुन्हा..?
पोचेन कसा मी मुक्कामी?
मी वाटांच्या प्रेमांत पुन्हा..!
     होतात वार ह्या शब्दांनी
     अन सांत्वनही शब्दांत पुन्हा..!
--------------------------
ह्या श्वासांचा भलता तोरा
ये कायमची प्राणांत पुन्हा..!
     मी शोधियला जळण्यासाठी
     अंगार तुझ्या ओठांत पुन्हा..!
सांभाळ तुझे काळीज 'मिलन'
'ती' हसते बघ गालांत पुन्हा..!
     मी जळेन चंदनगंधाने
     तु दरवळ ह्या देहांत पुन्हा..!