विलय -१

कोणीतरी हाताने गदागदा हलवतंय असं वाटून त्याने डोळे उघडायला आणि बस त्या छोट्याशा गावातल्या बसथांब्यावर थांबायला एकच वेळ झाली. दचकून जागा झाल्यामुळे काही क्षण त्याला काहीच समजेना. मग हळूहळू बसची घरघर, खिडकीचे गज वगैरे एकेक गोष्टीची जाणीव होऊन तो भानावर आला. गालावर ओघळलेली लाळ शर्टाच्या बाहीला पुसत त्याने ड्रायव्हरच्या दिशेने पाहिले तेव्हा तो वळून त्याच्याचकडे पाहत असलेला त्याला दिसला. आपलं उतरायचं ठिकाण आलं हे समजून त्याने बाजूलाच ठेवलेली आपली भलीमोठी हॅवरसॅक उचलली आणि उठून तो बसच्या दाराकडे चालू लागला. उतरताना एकदा ड्रायव्हरकडे पाहून तो हसला आणि तोंडातल्या तोंडात आभारप्रदर्शक काहीतरी बोलला. ड्रायव्हरने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि तो पूर्ण खाली उतरून बसचा दरवाजा बंद करेपर्यंत नुसता कोरड्या, भावनाशून्य नजरेने एकटक त्याच्याकडे पाहत राहिला. बस निघून गेल्यावर इतक्यावेळ ऐकू येत असलेली घरघर थांबल्याने त्याला एका क्षणातच तिथल्या शांततेची ठळक जाणीव झाली. नुकतंच उजाडलं असूनही साधा पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येत नव्हता. त्याने अलगद सॅक खाली ठेवली आणि दोन्ही हात डोक्यावर नेऊन जोरात ताणून आळस दिला. मग कडवट पडलेल्या तोंडातली थुंकी गिळत तो इकडे तिकडे पाहू लागला. समोर एक पत्र्याचं मोठं खोकं असावं असं ते बसस्टॅण्ड होतं. त्याच्या शेजारी पुढ्यात दोन पायांप्रमाणे पसरलेले बाकडे घेऊन एक टपरीवजा उपाहारगृह. एक बंद असलेले केस कापायचे दुकान. त्या दुकानांमागे दाट झाडी. कोणत्याही माणसाची चाहूल नाही. तो सावकाश वळला आणि विरुद्ध बाजूला पाहू लागला. सडकेपलीकडं तरारलेली शेतं, त्या पलीकडं काही कौलारू घरं आणि त्या सगळ्याच्या मागे बऱ्याच अंतरावर मध्ये मध्ये हिरवे दिसणारे, निळसर राखाडी डोंगर. हळू हळू अर्धवर्तुळाकार फिरत तो डोंगर निरखू लागला. एक एक शिखर निरखताना अखेर त्याची नजर एका डोंगरावर स्थिरावली. उपड्या द्रोणासारखा दिसणारा तो डोंगर आणि ढगांचा मफलर गुंडाळून बसलेलं, तोंडाचा 'ओ' केल्यासारखं दिसणारं त्याचं शिखर. त्याला एकदम पूर्ण जाग आल्यासारखा एकदम तो ताठ झाला आणि सर्वांगातून उत्तेजनेची लाट दौडत गेल्यासारखं त्याला वाटलं. "राकसा... " तो पुटपुटला. राकसा म्हणजे स्थानिक भाषेत राक्षस. अधूनमधून गुरगुरणाऱ्या आणि कधीमधी धुराच्या लोटांचे निश्वास सोडणाऱ्या त्या ज्वालामुखीला स्थानिक आदिवासीं राक्षस मानत. कधीकधी हा झोपलेला राक्षस थोडा जागा होई आणि धूराबरोबरच आग आणि लाव्हा ओकू लागे. मग पंचक्रोशीतल्या आदिवासी गावांना आपापला बारदाना घेऊन काही दिवस परागंदा व्हावं लागे. या राक्षसावर चढाई करायलाच तो आला होता. एकटा. वर्षभर ऑफिसमध्ये कॉंप्युटरसमोर बसून वैतागला की तो असं काहीतरी साहस करायला बाहेर पडे. आधी एक-दोन मित्रांना बरोबर घ्यायचा तो प्रयत्न करी पण त्यांचे नखरे, बावळटपणा आणि जीवाला जपून 'साहस' करायची वृत्ती हे त्याला असह्य व्हायचं म्हणून तो या वेळी एकटाच आला होता.
तो एकटक तिकडे पाहत असताना मागून एकदम फर्रकन आवाज झाला आणि त्याची तंद्री भंगली. त्याने वळून आवाजाच्या दिशेने पाहिलं. इतकावेळ रिकाम्या, भकास असलेल्या त्या टपरीत कुठुनतरी एक माणूस अवतीर्ण झाला होता आणि गिऱ्हाईक आलं हे पाहून त्याने स्टोव्ह पेटवला होता. ते पाहून त्याला एकदम थंडीची आणि भुकेची जाणीव झाली. टपरीसमोरच्या बाकावर तो बसला आणि त्या माणसाचं निरीक्षण करू लागला. डोक्याला मळकट मुंडासं गुंडाळलेलं, काळाकभिन्न आणि उघडा असा तो माणूस आता स्टोव्हवर मोठी कढई ठेऊन त्यात काहीतरी परतत होता. थोडावेळ त्याच्याकडे पाहून त्याने मग सॅकच्या बाहेरच्या कप्प्यातून नकाशा काढला. काही वेळ नकाशा पाहिल्यावर त्या ठिकाणाहून राकसाच्या पायापर्यंत जायला त्याला तीसेक किलोमीटर अंतर कापावं लागणार आहे या निष्कर्षापर्यंत तो आला. नकाशा घडी घालून ठेवत असतानाच त्या माणसाने त्याच्या पुढ्यात ताटलीत कसल्यातरी तेलकट, वाफाळत्या नूडल्स आणून ठेवल्या. न सांगताच आणि त्याला काय हवं हे न विचारताच त्याने ते आणून दिलं हे पाहून त्याला थोडी गंमत वाटली. स्वतःशीच हसत तो नूडल्सवर तुटून पडला. गरमागरम नूडल्स खाऊन आणि त्यानंतर वाफाळता दुधाळ चहा पिऊन तो चांगलाच हुशारला. घड्याळाचे काटे आठ वाजल्याचे दाखवित होते. ताशी तीन-साडेतीन किलोमीटर अंतर धरले तरी तीस किलोमीटर जायला त्याला दहातास तरी लागणार होते. एखादं वाहन मिळालं तर बरं होईल असा विचार करून त्याने पुन्हा चौफेर पाहिलं, पण त्या हॉटेलमालकाशिवाय त्याला दुसरं कोणीही दिसलं नाही. त्या माणसाला पैसे देताना त्याने खाणाखुणा करून आणि 'राकसा.. राकसा, केंदेरान" असं तोडक्या मोडक्या भाषेत विचारलं. त्या माणसाने पैसे घेऊन खणात टाकले आणि दोन्ही हाताचे पंजे त्याच्यासमोर धरून विषय संपवल्यासारखे नकारार्थी जोरजोरात हलवले. त्याने खांदे उडवले आणि सॅक घेऊन चालू लागला. डावीकडे डोंगराच्या थोडंसं वर आलेल्या सूर्याकडे पाहत तो आग्नेय दिशा धरून राकसाकडे निघाला. पूर्वेकडून मंद आणि थंड वाऱ्याच्या झुळकी येत होत्या पण थोड्याच वेळात ऊन रणरणू लागेल असं त्याला वाटलं आणि खाली मान घालून तो झपाझप चालू लागला. पन्नासएक पावलं चालल्यावर त्याने मान वर केली आणि पुन्हा एकदा राकसाकडे पाहिले, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे ते शिखर न दिसता त्याला नुसताच एक पांढरा ढग दिसला. थोडावेळ निरखून पाहिल्यावर तो ढग पसरत चाललाय आणि त्याच्याकडेच येतोय असं त्याला वाटलं. तो थबकला आणि निरखून पाहू लागला. दोन मिनीटातच त्याला कळालं की तो ढग नसून पांढरा पिसारा घेऊन हवेत उडणाऱ्या सावरीच्या बियांचा एक लोटच्या लोट उडत येत आहे. हा हा म्हणता त्या बियांनी आकाश व्यापलं. हजारो झाडांच्या लाखो शेंगा फुटून बिया उडाव्यात तशा लक्षावधी 'म्हाताऱ्या' सगळीकडे दिसू लागल्या. भर उन्हात बर्फ पडावं तसं सगळीकडे पांढरंशुभ्र दिसू लागलं. त्याला फार गंमत वाटली आणि तो चमत्कार नजरेत साठवण्यासाठी तो चौफेर पाहू लागला. मागे लक्ष गेल्यावर त्याला दिसलं की तो हॉटेलमालक आता हॉटेलच्या बाहेर येऊन उभा होता आणि दोन्ही हात हवेत उंचावून काही तरी ओरडत होता. वाऱ्याची दिशा उलटी असल्याने त्याला काही ऐकू येत नव्हते पण त्या माणसाच्या गळ्याच्या ताणलेल्या शिरा त्याला स्पष्ट दिसत होत्या. तो त्या माणसाकडे बघतोय हे त्या माणसाला कळायला थोडा वेळ लागला, पण तो पाहतोय हे लक्षात आल्याबरोबर त्या माणसाने हात खाली घेतले आणि स्तब्ध होऊन एकटक त्याच्याकडे पाहू लागला. अर्धा मिनीटभर ते एकमेकांकडे एकटक पाहत राहिले. मग अचानक तो माणूस वळाला. पळत जाऊन त्याने टपरीचं झापड खाली ओढलं, घाईघाईने कुलुप लावलं आणि परत त्याच्याकडे पाहत पाहत तो झपझप चालत टपरीच्या मागच्या झाडीत अदृष्य झाला.
त्याला थोडं विचित्र वाटलं पण हे आदिवासी फार अंधश्रद्धाळू आणि विचित्र असतात हे त्याला ऐकून माहिती होतं. तो पुन्हा वळाला आणि चालू लागला. जवळून जाणाऱ्या एकदोन चुकार बिया त्याने पकडल्या आणि त्या मऊ पिसाऱ्याला हाताने स्पर्श करू लागला. तसं करताना त्याच्या लक्षात आलं की त्या पिसाऱ्याच्या मध्ये नेहमी असते अशी काळी बी नसून नुसतीच धाग्यांची गाठ मारल्यासारखं आहे. बरंच निरखून पाहिल्यावरही ती गाठ आहे की पांढरी बी आहे हे त्याला ठरवता आलं नाही. शेवटी नाद सोडून त्याने त्या बिया फुंकरीने उडवल्या आणि चालण्याचा वेग वाढवला.
समोर राकसाचं शिखर आता परत ढगातून वर आलेलं दिसत होतं आणि आजूबाजूला शेतं आणि झाडं अंगात आल्यासारखी वाऱ्यावर डोलत होती.

(क्रमशः)