विलय - ३

घरातून बाहेर पडून हंतू आणि सलुरान झपाझप चालू लागले. कुठे जायचं आहे याची अचूक माहिती असल्यासारखं हंतू इकडेतिकडे न पाहता आणि आपल्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे कोणतीही हुंगाहुंगी न करता एका दिशेने लुटुलुटू धावत होता आणि त्याच्या पट्ट्याच्या ताणाचा अंदाज घेत सलुरान त्याच्या मागे मागे लांब लांब ढांगा टाकत चालला होता. सलुरानच्या हातात एक उंच दंडगोलाकार काठी होती आणि ती टेकवत तो झपाट्याने निघाला होता. एका आंधळ्याच्या मानाने त्याचा वेग खरोखरच विलक्षण होता. रस्त्यातले एकूण एक खड्डे उंचवटे ओळखीचे असल्यासारखा तो ठामपणे आणि निश्चिंतपणे चालत होता. त्या दोघांना गाठण्यासाठी त्याला थोडंसं धावावं लागलं. टॉर्चच्या प्रकाशात बऱ्यापैकी दिसत असूनही त्याला पूर्ण वेगात धावता आलं नाही. हळू हळू धावत तो सलुरानच्या पाठीमागे पोचला तेव्हा चढण बऱ्यापैकी जाणवायला लागली होती. डोंगरउतारावर कोणतीही मोठी झाडे नसली तरी झुडपांची गर्दी बरीच होती आणि त्या गडद झुडपांतून एक पांढरट वाट नागमोडी पुढे चालली होती.

"साधारण किती वेळ लागेल आपल्याला पोचायला? ", त्याने सलुरानला विचारले.

"मध्यरात्रीपुर्वी साधारण अर्धातास आपण तिथे पोचू. "

"आणि बाकीचे लोक? "

"तेही मध्यरात्रीपर्यंत तिथे पोचतील. मध्यरात्रीलाच समारंभ चालू होतो. "

"पण मला तर कोणीच येताना दिसत नाहीय", तो म्हणाला आणि चालता चालता वळून त्याने तो जिकडून आला त्या गावाच्या दिशेने पाहिलं. लांब दाट झाडांच्या काळ्या गर्दीत कुठेतरी आग पेटवल्यासारखा पिवळा ठिपका त्याला दिसला. बाकी सगळा आसमंत काळ्या कभिन्न अंधारात गुडुप झाला होता. त्याने आकाशाकडे पाहिले. चंद्रप्रकाशाअभावी सगळं आकाश काळ्याभोर मखमलीसारखं दिसत होतं आणि त्यावर चमकीसारख्या चंदण्या उठून दिसत होत्या. इतरत्र आकाश निरभ्र होतं पण त्यांच्या डोक्यावरमात्र धुराच्या लोटाचे तुरळक ढग जमा झालेले दिसत होते.

"हम्म्म, तुला दिसत नाहीय म्हणजे कोणी येतच नाहीय असं थोडीच आहे. शिवाय इथला रस्ता त्यांच्या अगदी पायाखालचा असतो. आपल्यासारखं त्यांना बारा-बारा तास आधी निघायची गरज नसते. ", सलुरान हसत हसत म्हणाला. त्याला धाप लागल्याचं किंवा त्याचा श्वास फुलल्याचं कोणतंही चिन्ह त्याच्या बोलण्यात दिसलं नाही.

बाकीचे लोक कोणत्या वाटेने चढत असतील की आपल्याच मागून दबक्या पावलांनी येत असतील असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याला एकदम दुपारी चालताना एक-दोनदा आजूबाजूच्या झुडपांमध्ये जाणवलेली सळसळ आठवली. तो एकदम शहारला आणि आजूबाजूच्या झुडपांवर प्रकाशाचे झोत टाकत निरखून पाहत पाहत चालू लागला. त्याच्या कपाळावर आता घामाचे थेंब जमा होऊ लागले होते.

इकडे तिकडे पाहत चालण्यामध्ये व्यग्र झाल्याने बराच वेळ तो काहीच बोलला नाही. सलुरानही नि:शब्दपणे चालत होता. हंतुच्या जीभ बाहेर काढून चाललेल्या श्वासोच्छवासाचा "हॅ हॅ" असा आवाज आणि त्यांच्या दोघांच्या पावलांचा आवाज सोडला तर बाकी काही आवाजही येत नव्हता. हवेत आता धूरमिश्रीत गंधकाचा वास ठळक होत होता पण हवा थंड थंड होत चालली होती. अंधारात टॉर्चचा प्रकाश पडेल तेवढाच भाग त्याला दिसत असल्याने नक्की वाट कशी चाललीये, कुठे कुठे ते वळाले आणि डोंगराच्या नक्की कोणत्या बाजूला ते आहेत हे त्याला कळेनासे झाले होते. नक्की आपण कुठे चाललोय असा विचार त्याच्या डोक्यात आल्यावर मात्र तो जरा संभ्रमात पडला. या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण चूक तर नाही ना केली? समारंभ वगैरे सगळ्या भूलथापा मारून हा आपल्याला दुसरीकडेच तर घेऊन नाही ना चालला? अशा बऱ्याच शंका त्याला येऊ लागल्या. एक मन म्हणत होतं की हा माणूस आपल्याला लुबाडणाच्या किंवा इतर काही हानी पोचवण्याचा तर विचार करत नाही ना तर दुसरं मन म्हणत होतं की लुबाडायचं किंवा मारायचं असतं तर त्याने ते खालीच नसतं का केलं, एवढं वर जाण्याची गरज काय? या सगळ्या विचारांनी आणि शंकाकुशंकांनी मन व्यापल्याने त्याचा चालण्याचा वेग मंदावला. खाली मान घालून विचार करत चालताना सलुरानच्या अंगावर धडकल्यावरच त्याला कळालं की तो थांबला आहे.

"तू थोडा थकलेला दिसतोस. इथे थोडं थांबून दम खा, पाणी वगैरे पिऊन घे", सलुरान म्हणाला.

त्यावर काहीच न बोलता त्याने सुस्कारा सोडला आणि बाटली उघडून घोटाघोटाने पाणी पिऊ लागला.

"काळजी करू नकोस. ते लोक अगदी वेळेवर पोचतील. हा समारंभ नाही झाला तर राकसाचा कोप होतो अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे", त्याच्या मनातले विचार ओळखल्यासारखा सलुरान बोलत होता, "एव्हाना खरं म्हणजे त्यांनी आपल्या आगमनाची वर्दी द्यायला पाहिजे होती".

त्याचं बोलणं संपतं न संपतं तोच हवेवर हलक्या आवाजात तालवाद्यांचा डिंडीम अस्पष्टपणे ऐकू येऊ लागला. सलुरान मोकळेपणी हसला. त्याच्याही मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालं आणि खालून येणाऱ्या त्या आवाजाच्या दिशेने त्याने एकवार पाहून घेतले. नव्या जोमाने तो पुन्हा सलुरानच्या मागे चालू लागला.

कानावर येणाऱ्या डिंडीमाच्या तालावर पुन्हा काहीही न बोलता बराच वेळ चालल्यावर डावीकडच्या खडकांआडून अंधुक प्रकाशाची आभा दिसू लागली. सलुरान थबकला आणि म्हणाला, " आणखी पाच-दहा मिनीटांमध्ये आपण क्रेटरच्या काठावर असू. तू तयार आहेस ना आयुष्यातल्या सर्वात विलक्षण अनुभवासाठी? "

"येस्स. कधी एकदा तिथे पोचेन असं मला झालंय", तो उत्तेजित स्वरात उत्तरला. सलुरान पुन्हा एकदा दात दाखवून हसला आणि पुढे वळून चालू लागला. पुढे थोडं जाऊन ते वळाले आणि दोन मोठ्या खडकांच्या कपारीमधून वर चढत गेले. सलुरान पाठोपाठ त्या कपारीतून तो वर येऊन उभा राहिला आणि समोरचे दृष्य पाहून तोंडाचा आ वासून स्तब्धच झाला. एक महाकाय बशी असावी तसं समोर एक साधारण किलोमीटरभर व्यासाचं खडकांचं रिगण दिसत होतं. कडेला उंच असणारे खडक एखाद्या स्टेडियमच्या स्टँडप्रमाणे हळूहळू खालीखाली उतरत गेले होते आणि साधारण दोन-तीनशे मीटर आत आणि शंभर एक मीटर खाली उअतरल्यावर तिथे ते खडक लाल लाल होत गेले होते. जसं जसं केंद्र भागाकडे जाऊ तसंतसं लाल रंग केशरी आणि केशरी रंग पिवळा होत गेलेला दिसत होता. वरती भेगाळलेल्या काळ्या पदार्थाच्या भेगांमधून लाल पिवळा प्रकाश फाकत होता. हवेत जाणवणारी थंडी जाऊन आता बऱ्यापैकी धग जाणवत होती. कितीतरी वेळ तो ते दृष्य डोळ्यात साठवत राहिला. भान हरपल्यासारखं होऊन त्याला इतर सर्व गोष्टींचा विसर पडला. मोठा मोठा होत जाणारा डिंडीमही त्याला बराच वेळ ऐकू येईनासा झाला होता. सलुरानने त्याच्या खांद्याला स्पर्श केल्यावर तो भानावर आला.

"चल", सलुरान म्हणाला आणि चालू लागला. सलुरानच्या मागे जाताना त्याचं मन कृतज्ञतेनं भरून आलं आणि थोड्यावेळापुर्वी या माणसावर आपण संशय घेतला म्हणून त्याला थोडंसं अपराधी वाटलं.

"थँक्यू, सलुरान", तो मोठ्याने म्हणाला.

"माझे आभार कसले मानतोस? तुझं इथे येणं हे विधिलिखीत होतं म्हणून तू इथे आहेस आणि अजून तू खरी गंमत तर पाहिलीच नाहीयेस", सलुरान हसत हसत म्हणाला.

हे ऐकल्यावर त्याने ते ज्या दिशेने निघाले होते तिकडे पाहिले आणि आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. उतरत जाणाऱ्या खडकांमध्ये मध्येच एका ठिकाणी खडकांवर खडक साचून एक पन्नास एक फूट वर जाणारा पट्टा निर्माण झालेला दिसत होता आणि त्या सुळक्याच्या वरच्या टोकाला चोच असल्यासारखी खडकाची साधारण दहा-पंधरा फूट लांबीची पट्टी तयार झालेली होती. भारावल्यासारखा सलुरानच्या मागे चालत तो वर चढत गेला आणि थोड्याच वेळात त्या पट्टीवर जाऊन पोचला. आता ते क्रेटरच्या सगळ्यात जवळच्या काठापासून पन्नासएक मीटर अंतरावर होते आणि एखाद्या स्विमींगपूलच्या डायव्हिंग बोर्डवर असल्या सारखे त्याला वाटत होते. तिथे उभा राहून तो केंद्राकडे पाहू लागला. खालून येणाऱ्या लालपिवळ्या प्रकाशाने त्याच्या अंगावरचं ते वस्त्र पेटल्यासारखं दिसत होतं. सलुरानही त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याने पहिल्यांदाच आपला काळा चष्मा काढला. त्याने चष्मा काढला हे जाणवल्यामुळे अभावितपणे त्याने सलुरानकडे पाहिले. बाजूने सलुरानच्या लांब पापण्या दिसत होत्या आणि त्याच्या डोळ्यांमध्ये समोरचं दृष्य लालपिवळ्या ठिपक्यासारखं प्रतिबिंबित झालं होतं. तो सलुरानकडे पाहतोय हे कळाल्यासारखा सलुरानने चेहरा त्याच्याकडे वळवला. सलुरानचे डोळे चांगले लांबलचक आणि पाणीदार होते पण त्याच्या डोळ्यात बुबुळंच नव्हती. त्याला एकदम कसंतरीच झालं आणि तो खाली पाहू लागला. आता तालवाद्यांचा आवाज चांगलाच जोरदार येऊ लागला होता. खाली पाहतानाच त्याला दोन्ही बाजूला क्रेटरच्या काठांवर हालचाल जाणवली. त्याने पुन्हा आजूबाजूला पाहिले तेव्हा सलुरान त्याच्या शेजारी नव्हता आणि डावी-उजवीकडे क्रेटरच्या काठावर सगळे आदिवासी जमा होताना त्याला दिसले. पांढरी वस्त्रं नेसलेले ते आदिवासी हात उंचावून नाचत होते. काही काही जण गळ्यात ढोलकीसारखी तालवाद्य घेऊन वाजवत होते. आता समारंभ सुरू होईल आणि आपल्याला इथून जावं लागेल असं त्याला वाटलं आणि त्या आधी एक फोटो घ्यावा म्हणून त्याने अलगद अंगरखा वरती करून खिशातून मोबाईल काढला. इकडेतिकडे पाहून नकळत तो चालू करण्यासाठी तो त्याकडे पाहत असतानाच त्याचा अंगरखा एकाएकी विरू लागला. एकेक धागा निघून सावरीच्या बीच्या पिसाऱ्यासारखा गोळा होत हवेत उडू लागला. आश्चर्यातिरेकाने तो वळाला आणि मागे पाहिले. थोड्या अंतरावर हंतू दोन पाय पुढे टेकवून बसलेला होता आणि त्याच्यामागे सलुरान उभा. इतकावेळ हातात असलेली काठी सलुरानने आता उजव्या खांद्यावर उजव्या मुठीत त्याच्याकडे रोखून धरली होती आणि डावा हात सगळी बोटं पसरून बाजूला ताणून धरला होता. त्या काठीच्या टोकाला त्याला इतकावेळ न दिसलेलं लखलखतं भाल्याचं पातं होतं.

विरत जाणाऱ्या वस्त्राबरोबरच समोर काय घडतंय ही त्याची जाणीव विलय पावत चालली होती आणि आजूबाजूचे आदिवासी आता अंगात आल्यासारखे अंगाला झटके देत मोठमोठ्याने किंचाळत नाचत होते.

(समाप्त)