विलय - २

सूर्य मागे क्षितीजाला टेकला आणि झाडांच्या सावल्या लांब झाल्या तेव्हा त्याला समोर सूर्याच्या लाल-केशरी प्रकाशात न्हालेला तो डोंगर अगदी जवळ दिसू लागला. लाव्हा थंड होऊन तयार झालेले काळे कुळकुळीत खडक, लाव्हा वाहिल्याने पडलेल्या घळया आणि त्यांतून साठलेली राख, जसजसं वरती पाहावं तसं तसं धुरकटत जाणारं ते ज्वालामुखीचं तोंड आणि त्या तोंडाच्या कडेने काही काही ठिकाणी अजूनही तप्त असलेले लालसर खडकांचे तुकडे दिसत होते. एखाद्या हिंस्त्र श्वापदाने आपल्या सावजाच्या अंगात आपले सुळे रुतवून कचाकचा लचके तोडल्यावर होतं तसं ते तोंड दिसत होतं आणि कच्च्या मांसाचा दर्प यावा तसा गंधकाचा वास आता तीव्रतेने येत होता. दाट झाडीतून बाहेर आल्यावर समोरचं हे दृष्य पाहून तो दोन मिनीटे थबकला आणि वरून खालपर्यंत तो डोंगर नजरेखाली घालू लागला. पायथ्याशी जिथे चढ नुकताच चालू होतो तिथवर त्याची नजर पोचली आणि त्याला आश्चर्याचा छोटासा धक्का बसला. त्या चढावर चक्क एक कौलारू घर दिसत होतं. राखेनं माखलेलं छप्पर आणि शेजारी एकुलतं एक निष्पर्ण जळकं झाड घेऊन ते घर एकटंच कळकटून उभं होतं. घराच्या आजूबाजूने झाडांच्या फांद्या वापरून केलेलं मोडकंतोडकं कुंपणही होतं. कुंपणातून जेवढं दार दिसत होतं त्यावरून तरी आतमध्ये कोणी असेल असं वाटत नव्हतं. कुठेतरी तंबू टाकायचा त्यापेक्षा घर आतून बरं असेल तर तिथेच रात्र काढता येईल असा विचार करून तो तिकडे चालू लागला.

घराजवळ पोचताना घराच्या दाराशी पायांवर डोकं ठेवून बसलेला एक भलाथोरला लांडग्यासारखा कुत्रा पाहून तो थोड्या अंतरावर थबकला. केवळ गळ्यातल्या पट्ट्यामुळे त्याला कुत्रा म्हणायचं, एरवी तो कोणालाही लांडगाच वाटला असता. कुत्र्याने डोकं उंचावून त्याच्याकडे पाहायला आणि आतून एक काळा चष्मा घातलेला माणूस दारात येऊन उभा राहायला एकच गाठ पडली. साधारण सहा फूट उंचीचा, अत्यंत सडपातळ पण पिळदार हात असलेला आणि असाधारणपणे उभट चेहरा आणि उंच कपाळ असलेला असा तो माणूस होता. त्याने त्या माणसाकडे पाहून हात हलवला आणि साद दिली, "हॅलो... "

त्या माणसाने साधारणपणे त्याच्या दिशेने मान वर केली पण तो त्याच्याकडे पाहत नाही आहे, किंबहुना तो पाहूच शकत नाही हे त्याच्या लक्षात आले. एक हात उंचावून आणि प्रसन्न हसून आपले लांबट शुभ्र दात दाखवत त्या माणसाने प्रतिसाद दिला, "हॅलो, प्लीज कम इन. " आणि तो जवळ गेल्यावर उंचावलेला हात हस्तांदोलनासाठी पुढे करत तो माणूस पुढे स्थानिक उच्चारांच्या इंग्रजीत म्हणाला, " मी सलुरान. प्रवासात काही त्रास तर नाही झाला ना? "

जणू काही तो याची वाट पाहत होता असा त्याचा प्रश्न ऐकून त्याला गंमत वाटली पण काही न दाखवता त्याने आपलं नाव सांगितलं आणि प्रवासात काहीच त्रास झाला नाही हे ही सांगितलं. दिवसभर चालताना अधूनमधून होणारी झाडाझुडपांतली सळसळ सोडता एकाही प्राण्याचं किंवा माणसाचं दर्शन झालं नाही आणि सकाळी एवढ्या बिया दिसूनही रस्त्यात त्याला एकही सावरीचं झाड दिसलं नाही याचं आश्चर्य त्याने उघड केलं नाही. सलुरान त्याला आत घेऊन गेला. घर आतून अपेक्षेप्रमाणेच धुळीने माखलेलं होतं. जुनाट धुळीने भरलेलं एक लाकडी कपाट आणि एका भिंतीला लावून ठेवलेलं बाजलं सोडलं तर बाकी काहीही सामान नव्हतं. वर पाहिल्यावर मात्र त्याला छताला तारेने टांगलेले चार-पाच आडवे बांबू आणि त्या बांबूंवर वाळत घातल्यासारखे तलम, चमकदार आणि अत्यंत शुभ्र कापडाचे तागेच्या तागे दिसले. तोंड उघडून सलुरानला त्याबद्दल तो विचारणार तोच सलुरानच बोलू लागला.

"तू थोडा लवकर यायला हवा होतास म्हणजे वर चढण्यापुर्वी थोडी विश्रांती घेता आली असती. आता मात्र तासाभरात निघावं लागेल. "

"तासाभरात? माझा तर विचार होता की आजची रात्र इथे मुक्काम करून सकाळी वर चढावं".

सलुरानची मान आश्चर्य वाटल्यासारखी थोडी बाजूला हलली, "म्हणजे तू जारांगसाठी जाणार नाहीस? "

"जारांग? "

त्याला काहीच माहिती नाही हे सलुरानच्या लक्षात आलं आणि त्याने सुरुवातीपासून माहिती द्यायला सुरुवात केली. तो योगायोगाने तिथे जारांग अमावस्येच्या रात्री तिथे पोचला असून त्या अमावस्येला आजूबाजूचे सर्व आदिवासी राकसाचा उत्सव साजरा करतात, सलुरानही मूळचा इथलाच असल्याने त्या उत्सवासाठीच आलेला आहे, सगळे आदिवासी आज मध्यरात्री राकसाची साग्रसंगीत पूजा करतात आणि मग दुसऱ्यादिवशी आपापल्या वाड्यावस्त्यांमध्ये जाऊन नाचगाणी करतात हे त्याला कळालं. सलुरान दरवर्षी या उत्सवाला हजेरी लावतो आणि तेवढ्यावरच न थांबता यथाशक्ति मदतही करतो हे ही सलुरान ने त्याला सांगितलं.

"ही वस्त्रं पाहतोयस ना? ही मीच आणलीत. या कार्यक्रमात सर्वजण ही पांढरी वस्त्रं परिधान करतात आणि मगच पूजा करतात. अंधाऱ्या रात्री वरून राकसाचं धगधगणारं तोंड पाहणं म्हणजे एक अद्वितीय अनुभव असतो. त्या लालपिवळ्या प्रकाशात या वस्त्रांवर उमटणाऱ्या विविध छटा, तो वाद्यांचा गजर आणि सगळ्या आदिवासींचा सश्रद्ध नाच हे सगळं अनुभवायला आज रात्रीच वर गेलं पाहिजे. ", सलुरान हसत म्हणाला, "अर्थात तुला हा सगळा खुळचटपणा वाटत असेल किंवा तू फार दमला असशील तर राहू दे. तू इथेच झोप आणि सकाळी वर चढून जा. दिवसाच्या प्रकाशात क्रेटरमध्ये काळपट राख आणि धुराशिवाय फार काही दिसणार नाही हे मात्र लक्षात ठेव. धगधगणारा लाव्हा आणि रक्ततप्त खडक पाहायचे असतील तर रात्रीचीच वेळ योग्य". सलुरानच्या बोलण्यात कोणताही आग्रह किंवा आर्जव नव्हतं पण त्याने तो समारंभ चुकवू नये अशी सुप्त तळमळ मात्र जाणवत होती. खरं म्हणजे तो थोडा थकला होता आणि रात्रभर आराम करण्यासाठी त्याचं मन आधीच तयार झालेलं असल्याने काही वेळ तो विचारात पडला. तरुण रक्त आणि नवीन आव्हानं स्वीकारण्याची मस्ती यामुळे त्याला दोन मिनीटांपेक्षा जास्तवेळ विचार करण्याची गरज पडली नाही. इतक्या लांब येऊन वर्षातून एकदा होणारा हा समारंभ पाहायचा नाही म्हणजे काय? उलट योगायोगाने ही संधी मिळाल्याबद्दल त्याला भाग्यवान असल्यासारखं वाटू लागलं.

"अर्थातच मी येणार, " तो उत्साहाने म्हणाला, " मी पटकन थोडं खाऊन घेतो आणि मग आपण निघू".

एव्हाना बाहेर संधीप्रकाश अंधुक होऊन काळोख दाटायला सुरुवात झाली होती. सलुरानने मात्र दिवा लावण्याची काहीच हालचाल केली नाही, उलट त्या बाजेवर बसून तो आता स्थिर झाला होता आणि काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखे त्याचे फक्त ओठ हालत होते. तो कुत्रा की लांडगा पुन्हा दारात जाऊन बसला होता. त्या दोघांकडेही दुर्लक्ष करून त्याने सॅक मधून टॉर्च आणि काही खायचे पदार्थ काढले आणि खालीच बसून तो खाऊ लागला. खाण्यापुर्वी त्याने सलुरानला विचारलं पण त्याने ऐकलं की नाही हे त्याला कळालंच नाही. पंधरा-वीस मिनीटांत खाणं संपवून तो उठला आणि घटाघट पाणी प्याला. पाण्याची बाटली त्याने पुन्हा सॅकमध्ये ठेवताच सलुरान समाधीतून उठल्यासारखा उठला आणि त्याने हात उंचावून टांगलेल्या कापडांपैकी दोन कापडं खाली ओढली. काहीही न बोलता सलुरानने एक कापड त्याच्याकडे दिले. ते कापड हातात घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो नुसता कापडाचा तागा नसून एक पायघोळ, लांब बाह्यांचा अंगरखा होता. आणि जणू काही पिसांपासून बनवलं असावं तसं त्याचं कापड तलम आणि हलकं होतं. टॉर्चच्या पिवळ्या प्रकाशात आधीचा शुभ्रपणा जाऊन त्या कापडाला आता सोनेरी झाक आली होती. थोडावेळ कापड निरखण्यात घालवून शेवटी त्याने तो अंगरखा डोक्यावरून सर्वांगावर सोडला. कसा दिसतोय वगैरे पाहून त्याने मान वर केली तेव्हा सलुरान त्याच्या अगदी पुढ्यात उभा असलेला पाहून तो थोडा दचकला, पण सलुरान शांतपणे हातात नारळाच्या करवंटीत काही तरी पेय घेऊन उभा होता.

"हं", एवढंच म्हणून त्याने ते पेय त्याच्या हातात दिलं. त्या पेयाला मंद, मादक असा कोणत्यातरी फुलाचा असावा असा वास होता. फार विचार न करता त्याने दोन-तीन घोटांत ते पेय संपवले. ते पेय आत उतरताना त्याला अगदी थंडगार आणि उत्साही वाटलं आणि आपण सहज तो डोंगर चढून जाऊ असा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. ते पेय कसलं होतं हे विचारायला तो तोंड उघडणार तोच सलुरान पुन्हा बोलू लागला, " हे बघ, आज त्या समारंभात स्थानिक अदिवासी आणि त्यांच्या दूरस्थ समाजसदस्यांशिवाय बाहेरचा असा कोणीही मनुष्य नसणार आहे. फक्त तूच काय तो एकटा बाहेरचा माणूस आहेस. आजच्या या समारंभाबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते आणि आदिवासींव्यतिरिक्त बाहेरच्या लोकाना या उत्सवाची खबर लागणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली जाते. हा समारंभ पाहणारे बाहेरचे लोक याबद्दल कोणालाही कधीही काहीही सांगत नाहीत आणि बाहेरचा कोणताही मनुष्य आपल्या संपूर्ण अयुष्यात फक्त एकदाच हा समारंभ पाहू शकतो. "

"हम्म्म, " त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. खरं म्हणजे त्याला त्या समारंभाचे फोटो घ्यायचे होते आणि फेसबुकवर वगैरे टाकून मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खायचा होता. पण फोटो तर नाहीच शिवाय या बद्दल बोलायचं नाही म्हणजे त्याला फारच

अडचणीचं वाटलं. तरी आत्ता तर हो म्हणू, नंतर काय ते पाहता येईल असा विचार करून तो म्हणाला, "ठीक आहे. मी याबद्दल कधीही कोणालाही काहीही सांगणार नाही".

इतकावेळ शांत उभा असलेला सलुरान आता एखादा चावट विनोद ऐकल्यावर हसावा तसा फसफसून हसला. त्याच्यावर त्या पेयाचा प्रभाव व्हायला लागलाय अशी शंका त्याला आली.

"हंतू... ", सलुरानने हाक मारताक्षणीच तो कुत्रा आत आला. सलुरानने त्याच्या गळ्यातल्या पट्ट्यात एक लांब पट्टा अडकवला आणि म्हणाला, "चल तर मग. सॅक इथेच ठेव आणि फक्त पाण्याची बाटली घे. ".

कुत्रा पुढे आणि सलुरान मागे असे ते दोघे चालू लागताच, त्याने पटकन पाण्याची बाटली घेतली, टॉर्च उचलला आणि चालू लागला. दोन पावले गेला असेल नसेल तोच त्याच्या डोक्यात काही तरी चमकलं. सॅकच्या बाहेरच्या कप्प्यात हात घालून त्याने मोबाईल फोन काढला आणि पटकन अंगरखा उचलून शॉर्टच्या खिशात घातला. कॅमेरा नाही तर नाही पण मोबाईलमध्ये तो एकतरी फोटो काढणारच होता.