वातापिगणपतिं भजेऽहम् ॥

हंसध्वनी- एक प्रसन्न असा 'ओडव-ओडव' राग. (ओडव-ओडव म्हणजे ज्याच्या आरोहात आणि अवरोहात प्रत्येकी पाच स्वर येतात असा राग) अतिशय साधा, पण तितकाच प्रसन्न राग- हंसध्वनी!

हंसध्वनी हा 'बिलावल' थाटातला राग. बिलावल थाट म्हणजे सगळे स्वर शुद्ध.

असं म्हणतात, की बिलावल गात चालणार्‍या त्यागराजाचा पाय एका प्रेताला लागला, आणि ते प्रेत जिवंत झाले. (त्यागराज- कर्नाटक शास्त्रीय संगीताचा आधारस्तंभ.) ह्यावरून बिलावल (कर्नाटक पद्धतीतले बिलावलचे नाव 'बिलहरी') रागाला 'संजीवन राग' असे नाव पडले. त्याच संजीवन रागाच्या पठडीतला, आणि खरोखरच संजीवनीप्रमाणे असलेला हा राग- हंसध्वनी.

ह्या रागाची रचना मुथुस्वामी दीक्षितार् (खरे तर 'दीक्षित' एवढेच नाव, पण तमिळ पद्धतीनुसार दीक्षितार्) ह्यांचे वडील 'रामस्वामी दीक्षितार्' यांनी केली असे म्हणतात. पण रामस्वामीनी, हंसध्वनी रागात गणेशाचे स्तवन करणारी एकही रचना केली नाही. ती कसर मुथुस्वामी दीक्षितार् ह्यांनी भरून काढली ती त्यांच्या 'वातापि गणपतिं भजेSहम्'

ह्या

रचनेने. ही अजरामर रचना कर्नाटक शास्त्रीय संगीतातच नव्हे, तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातही तितकीच लोकप्रिय आहे. ह्याच रचनेच्या शेवटच्या ओळीत 'हरादिगुरुगुहतोषितबिम्बम्, हंसध्वनिभूषितहेरम्बम्' असे शब्द आल्यामुळे हंसध्वनी हा गणेशाचा आवडता राग ठरला. अर्थात् हंसध्वनी रागाच्या अतिशय प्रसन्न चलनामुळे, मोददात्या गणेशाला आवडणारा राग म्हणजे हंसध्वनी हे तर्कशुद्धही आहेच.

'वातापि गणपतिं' ही रचना इतकी सिद्ध आणि प्रसिद्ध आहे, की ह्याच रचनेवर आधारित हिंदी आणि मराठी रचनाही तशाच प्रसिद्ध झाल्या. हिंदी: 'जा तोसे मै ना बोलू कन्हैय्या' आणि मराठी: 'दाता तू गणपती गजानन'.

ही रचना 'सिद्ध' आहे, ती त्यातल्या संस्कृतामुळे. प्रत्येक शब्द अगदी पैलू पाडलेल्या हिर्‍यासारखा मौल्यवान्! ह्यातल्या सुरुवातीच्या 'वातापिगणपति' ह्या शब्दाचा थोडक्यात इतिहास असा.

चालुक्यांचा पराभव करणार्‍या 'सिरुतोंदर' (ह्याचे मूळ नाव 'परंज्योती' असे होते असे म्हणतात) ह्या पल्लवांच्या प्रधान-अमात्याने वातापि (आत्ताचे बदामी) इथून गणेशाची

मूर्ती

'थिरुवरुर' इथे नेली.

वातापीहून आणलेला म्हणून 'वातापिगणपती' असे त्या मूर्तीचे नाव पडले. मुथुस्वामी दीक्षित हेही थिरुवरुरचेच. थिरुवरुर इथे असलेल्या बर्‍याच देवळातील मुख्य देव आणि परिवारदेवतांवर मुथुस्वामींनी अनेक रागांमध्ये संस्कृत रचना लिहिल्या. त्यातलीच ही 'वातापिगणपतिं भजेSहम् '.

आणि रचना केवळ गणेशाचे स्तवन करणारी आहे असे नाही तर 'वातापी' चा इतिहासही सांगणारी आहे. असे म्हणतात की अगस्ति ऋषींनी वातापी नगरीत गणेशाची आराधना केली होती. ही गोष्ट 'पुरा कुम्भसम्भवमुनिवर-प्रपूजितम्' ह्या शब्दातून सांगितली आहे. त्यातही अगस्ति ऋषींसाठी वापरलेला 'कुम्भसम्भव' हा शब्द, किंवा आदितालात चपखलपणे बसणारा 'निजवामकरविधृतेक्षुदण्डम्' ह्या सारखे शब्द मुथुस्वामींच्या संस्कृतपांडित्याचा आणि पुराणादींविषयीच्या ज्ञानाचा पुरावा देतात. बरं, केवळ संस्कृतदृष्ट्या ही रचना महान आहे असं नाही. रागदॄष्ट्य़ा 'हंसध्वनी' रागाचे सारच ह्या रचनेत आहे असं म्हणणं अतिशयोक्ती नाही. 'वीतरागिणं विनतयोगिनम, विश्वकारणं विघ्नवारणं' किंवा 'कराम्बुजपाशबीजापूरं कलुषविदूरं भूताकारं' ह्यातले स्वरांचे खटके काय, किंवा 'मूलाधारक्षेत्रस्थितं' हा एकच शब्द आदितालात बसताना येणारी स्वररचना काय सगळंच सिद्धहस्त!

ही रचना गाणारा कुणीही गायक, वातापिगणपतीला आणि मुथुस्वामींनाही मनातल्या मनात 'साष्टांग' नमस्कार घातल्याशिवाय गात नसेल हे नक्की. हंसध्वनीने भूषित असा हेरम्ब आपल्या सगळ्यांचे पालन करो आणि हंसध्वनी रागाप्रमाणेच प्रसन्नवदनाने आपणा सर्वांनाही प्रसन्न करो आणि कायम प्रसन्न ठेवो हीच वातापिगणपतीच्या चरणी प्रार्थना!

- चैतन्य

अनंत चतुर्दशी- २०१०/०९/२२