आई

भांडत होतो खूप खूप
मी आणि भाऊ
भांडणाचं कारण नव्हतं
आईनं दिलेला खाऊ

कारण एकच एक होतं
आठवण अजून ताजी
तो म्हणे आई त्याची
मी म्हणे माझी

भांडण अजून कायम आहे
आईच त्याचं मूळ
लहानपणीचं आईचं वेड
वाटतयं आता खूळ

"आई माझी" सोडून म्हणतोय
"माझी एकट्याचीच नाही"
या बेशरम बदलाची
हवा दिशा दाही

मोठ्यानं पाळावं आईला
छोटा सांगे रीत
मोठा म्हणे तुजवर आईची
जास्त होती प्रीत

कुठे गेली लहानपणची
आईची ती ओढ?
ओझ्यासाठी काढतात
व्यवहारिक तोड

एक महिनातुझ्याकडे
माझ्याकडे एक
पहिला महिना कोणाकडॅ?
करूत नाणेफ़ेक

दोघात येरझार करताना
चेहरा जाई थिजून
आई शुन्यात बघत राही
चिंब पापण्या भिजून

आई देवा समोर बसून
मागतेय एकच मागणं
बाळांना माझ्या सुखी ठेव
माझं झालय जगणं

आईच्या निधना नंतर
एकमत झालयं
दोघांनाही कोल्ह्याचं
शहाणपण आलयं

एका सुरात म्हणतात आता
प्रेमळ होती आई
वारसापत्रासाठी कराचीय
शपथ पत्रावर सही

निशिकांत देष्पांडे  मो. न. ९८९०७ ९९०२३
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा