मनोरंजनाचा आपुला धंदा - हृषीकेश मुखर्जी

विनोदी लिखाणाच्या एका विशिष्ट शैलीला मी वुडहाऊस शैली असं म्हणतो. पी. जी. वुडहाऊस यांच्या गोष्टी वाचताना हळू हळू वातावरणनिर्मिती होऊन एका क्षणी फिसकन हसू येतं किंवा हास्यस्फोट होतो तसं काही लेखकांच्या लेखनातून आपल्याला दिसतं. या शैलीचं वैशिष्ट्य असं की विनोदनिर्मितीसाठी काही ओढून ताणून विशेष प्रयत्न केले गेले आहेत असं वाटत नाही. कथेतल्या पात्रांच्या संवादांमधून आणि कथा जशी उलगडते त्यामधून जी स्वाभाविक आणि सहज वातावरणनिर्मिती होते त्याचा ह्या हास्यस्फोटात महत्त्वाचा वाटा असतो. या प्रकारच्या विनोदांनी सभ्यपणाबरोबरच सुसंस्कृतपणाही जपल्याने त्यांचा सगळ्या कुटुंबाबरोबर आनंद घेता येतो. हीच शैली चित्रपटांसारख्या वेगळ्या माध्यमातही आपल्याला दिसते.

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी हे याच शैलीचे हिंदी चित्रपटांमधले सादरकर्ते. कलकत्त्यात ३० सप्टेंबर १९२२ रोजी जन्मलेल्या हृषीकेश मुखर्जी यांनी सुरवातीला गणित व विज्ञान या विषयांची प्राध्यापकी केली. चाळीसच्या दशकात चित्रपटक्षेत्रात प्रवेश करताना त्यांनी बी. एन. सरकार यांच्या कलकत्त्या मधल्या न्यू थियेटर्स मध्ये कॅमेरामनची नोकरी पत्करली. काही काळ कॅमेरामन म्हणून काम केल्यावर तिथेच त्यांनी त्या काळचे प्रख्यात संपादक सुबोध मित्तर (कैंचीदा) यांच्या हाताखाली संपादनकौशल्य आत्मसात केलं. दो बिघा जमीन व देवदास या बिमल रॉय यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधून सहाय्यक दिग्दर्शक या नात्याने त्यांचा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश झाला.

त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट मुसाफिर (१९५७) हा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. असं जरी असलं, तरी तो पाहिल्यावर राज कपूर इतका प्रभावित झाला की त्याचा पुढचा चित्रपट अनाडी (१९५९) हा त्यांनाच दिग्दर्शित करायला लावला. राज कपूरचा अभिनय आणि मुखर्जी यांचे दिग्दर्शन यांमुळे अनाडी मात्र चांगलाच चालला आणि त्याने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही वाहवा मिळवली. त्या वर्षीचा उत्कृष्ठ दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार जरी त्यांचेच गुरू बिमल रॉय यांनी पटकावला असला, तरी अनाडी सिनेमाला, त्यातल्या कलाकारांना आणि संबंधित इतर कर्मचाऱ्यांना मिळून असे पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

करमणूक या गोष्टीत कुठेही कमी न पडता अतिशय गंभीर प्रकृती असलेल्या विषयांचे ताकदीने सादरीकरण करणे हे मुखर्जी यांचे वैशिष्ट्य. सत्यकाम या चित्रपटात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर उद्भवलेल्या एकंदर सामाजिक परिस्थितीने आपल्या आदर्शांच्या झालेल्या ठिकऱ्या पाहून वैफल्य आलेल्या तरुणाची कथा, त्यांच्या अत्युत्तम कलाकृतींमध्ये गणल्या गेलेल्या आनंद या सिनेमातील कर्करोगग्रस्त तरुणाची वेदना, बावर्ची मधील विस्कटत चाललेल्या एकत्र कुटुंबाची कथा, नमक हराम मधील कामगारवर्गाचा संघर्ष, अभिमान मधल्या पती-पत्नीं मध्ये पुरुषी अहंकारामुळे पडलेली फूट असे अत्यंत गंभीर प्रकृती असलेले विषय अत्यंत ताकदीने सादरीकरण केलेले असूनही मुखर्जी यांनी त्यांचा चित्रपटांच्या मनोरंजनमूल्यावर कुठेही परिणाम होऊ दिला नाही.

सत्यकाम ह्या वेगळ्या चित्रपटाबरोबरच मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेले अनुपमा, अनुराधा, आशीर्वाद यासारखे चित्रपटही सरळ सरळ धंदेवाईक सिनेमांमध्ये मोडणारे नसले तरीही ते अजूनही तितक्याच आवडीने बघितले जातात. 'अनुराधा'ला १९६१ साली उत्कृष्ठ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, तर जर्मनी मधल्या गोल्डन बेअर पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं.

मुखर्जी एकदा म्हणाले होते की "एखादे किचकट वाटणारे दृश्य साकारण्यापेक्षा साध्या प्रसंगांची पडद्यावर मांडणी करणं जास्त कठीण आहे. म्हणूनच मला अशा विषयांमध्ये अधिक रस आहे. माझ्या चित्रपटांमधून दिल्या जाणाऱ्या संदेशांची कटुता मनोरंजनरूपी साखरेच्या गोड वेष्टनात गुंडाळूनच दिली गेली पाहिजे याकडे माझा कटाक्ष असतो. "

कितीही मोठा नट असो, फारशा चौकश्या न करता त्यांच्या चित्रपटात काम करायला नेहमीच उत्सुक असे. राज कपूर ते देव आनंद आणि धर्मेंद्र ते राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या त्या काळच्या 'स्टार' अभिनेत्यांबरोबर त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट दिले. त्यामध्ये अमिताभने त्यांच्याकडे सर्वाधिक चित्रपट केले. मुखर्जींची जादू अशी, की आपल्या सुपरस्टार पदाचा कुठलाही अभिमान न बाळगता अमिताभ सारख्या अभिनेत्याने त्यांच्या अनेक चित्रपटात अगदी छोट्या लांबीच्या म्हणजेच २-३ मिनिटांच्या पाहुण्या भूमिकाही केल्या. आठवा: गोलमाल चित्रपटातल्या 'सपने में देखा सपना' या गाण्यात अमोल पालेकर सुपरस्टार झाल्यावर भाव घसरलेला, फुटपाथवर बसलेला निराश अमिताभ.

चित्रपटाची कथा आणि विषय कुठलाही असो, हृषीकेश मुखर्जी यांचे बहुतेक सगळे चित्रपट निखळ कौटुंबिक करमणूक म्हणूनच गणले गेले आहेत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या चित्रपटातील साधेपणा व त्यांनी माणसांचे आपापसातले संबंध आणि नाती यांचे अत्यंत तरलतेने पडद्यावर केलेले सादरीकरण. साधेपणाचं दुसरं नाव म्हणजेच मुखर्जी यांचे चित्रपट असं अनेक दिग्गज चित्रपट समीक्षकांच मत आहे. मध्यमवर्गाची नाडी अचूक ओळखलेल्या मुखर्जी यांनी चुपके-चुपके, गोलमाल, नरम-गरम, रंगबिरंगी या त्यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये कुठेही द्वैअर्थी किंवा अश्लील संवाद न वापरता सकस व उत्तम विनोदनिर्मिती केली.

गोलमाल हा नर्मविनोदी संवादांची पखरण असलेला चित्रपट तर इतका लोकप्रिय झाला, की सलग एका चित्रपटगृहात पाच वर्ष धो धो चालणारा सिनेमा अशी ज्याची ख्याती त्या शोले या अफाट लोकप्रियता लाभलेल्या सिनेमासमोरही त्याने तिकीटबारीवर दणक्यात धंदा केला. रूढ अर्थाने 'हीरो' या संकल्पनेत न बसणाऱ्या अमोल पालेकर सारख्या अभिनेत्यालाही या चित्रपटाने हिंदीत चांगलीच लोकप्रियता मिळाली, तसंच उत्पल दत्त यांच्या सारख्या मातब्बर अभिनेत्याने चरित्र अभिनेताही कशा प्रकारे उत्कृष्ठ दर्जाचा विनोदी अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं. हेच दोन प्रमुख कलाकार घेऊन कुठेही तोचतोचपणा न जाणवू देता त्यांनी नरम गरम व रंगबिरंगी या धमाल चित्रपट सादर केले. चुपके चुपके या चित्रपटात तर त्यांनी धमालच उडवून दिली. तो पर्यंत 'अँग्री यंग मॅन' आणि ऍक्शन हीरो म्हणून मान्यता पावलेल्या अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांनी या चित्रपटात असरानी, ओमप्रकाश व केष्टो मुखर्जी यांच्यासारख्या नावाजलेल्या विनोदी अभिनेत्यांच्या तोडीस तोड विनोदी अभिनय केला, याचं श्रेय निश्चितच मुखर्जी यांच्या दिग्दर्शन कौशल्याला जातं.

दिग्दर्शनाबरोबरच गाण्यांच्या नितांतसुंदर चित्रीकरणामध्येही त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. गुड्डी चित्रपटातलं 'हम को मन की शक्ती देना' तसंच आनंद मधील 'कहीं दूर जब दिन ढल जाए' ही दोनच उदाहरणं आपल्याला याची ग्वाही देण्यास पुरेशी आहेत.

मुखर्जी यांनी तलाश, हम हिंदुस्तानी, धूप छांव, रिश्ते आणि उजाले की ओर यासारख्या मालिकांद्वारे छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला. त्यांनी सेन्सॉर बोर्ड व एन. एफ. डी. सी या दोन संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे १९९८ साली आलेला अनिल कपूर व जूही चावला या जोडीचा झूठ बोले कौवा काटे.

अशा प्रतिभावंत कलावंताला चित्रपटक्षेत्रातल्या कामगिरीसाठी असलेला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नसता तरच नवल होतं. त्यांना या पुरस्काराने १९९९ साली गौरवण्यात आलं. त्यांना २००१ साली चित्रपटक्षेत्रातल्या कामगिरी बद्दल देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान पद्म विभूषण देण्यात आला.

हृषीकेश मुखर्जी हे फक्त उत्कृष्ठ दिग्दर्शकच नव्हे, तर एक सहृदय 'बॉस'ही होते याचं एक उदाहरण मंजू सिंग यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. गोलमाल चित्रपटात अमोल पालेकर यांच्या धाकट्या अविवाहित बहिणीची भूमिका साकारणाऱ्या मंजू सिंग या प्रत्यक्षात दोन मुलींची आई होत्या. या गोष्टीची जाणीव असलेले मुखर्जी इतर ज्येष्ठ कलाकारांना सरळ सांगत, "मी हिचा सहभाग असलेली दृश्ये आधी चित्रित करणार आहे म्हणजे तिला लवकर घरी जाता येईल. "

रोमँटिक दृश्ये आणि पती-पत्नींमधले नाते यांचे सुंदररीत्या चित्रीकरण करणाऱ्या मुखर्जी यांची पत्नी मात्र त्यांच्या आधी ३० वर्ष हे जग सोडून त्यांना एकटं करून गेली. त्यांचा एक मुलगा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दम्याचा तीव्र झटका येऊन मरण पावला. त्यांना तीन मुलीही आहेत. प्राणीप्रेमी असलेले मुखर्जी आपल्या बांद्र्याच्या सदनिकेत आपल्या काही पाळीव कुत्र्यांच्या आणि क्वचित एखाद्या मांजराच्या सहवासात राहत. ते आपल्या आयुष्याची शेवटची काही वर्ष घरात एकटेच होते - सोबत असलीच तर हेच पाळीव प्राणी व काही नोकर यांची.

"ये दुनिया एक रंगमंच है और हम सब उसमे काम करनेवाली कठपुतलीयां है" असा काहीसा संवाद आनंद या सिनेमात आहे. मूत्रपिंडाचा विकार बळावल्याने या रंगमंचाला हृषीकेश मुखर्जी नामक कठपुतलीने आपले इहलोकीचे कर्तव्य संपवून २७ ऑगस्ट २००६ रोजी राम राम ठोकला.