झालो निनाव आहे

खोलीत बंद जगलो झालो निनाव आहे
तिमिरास शोधण्याचा केला ठराव आहे

तो आरसा म्हणाला मज चेहराच नाही
इतका तरी कसा हा दिसतो तणाव आहे?

हळ हळ नको कुणाला पाहून दुःख माझे
कण्हणे मलाच रडणे मझाच घाव आहे

गोष्टीस सांगतो मी हुंकार मीच देतो
दोघात बोलण्याचा येथे अभाव आहे

जाणार एक पुढती उरणार एक मागे
एकलपणी जगाया करतो सराव आहे

मोसम निघून गेला पाने कळ्या फुलांचा
काट्यात भावनांचा होतो लिलाव आहे

आठव उरी धरूनी कुरवाळता कळाले
मी व्यर्थ मृगजळांचा करतो बचाव आहे

रेशीम पाश विणता हृदयास काचती ते
नात्याविना जगावे माझा सुझाव आहे

"निशिकांत" ना करावी इतकी कधीच माया
अपुलाच स्वार्थ बघणे त्यांचा स्वभाव आहे

निशिकांत देशपांडे   मों न  ९८९०७ ९९०२३
E Mail:  nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा