जन्म न माझा झाला आहे हरण्यासाठी
जीवन सोडा क्षणही नाही रडण्यासाठी
अभिमानाने सांगत आहे खूप कमवले
वाट बघावी व्यर्थ कशाला ? घडण्यासाठी
अभिमन्युला भीती कसली परिणामाची
चक्रव्युहाला तोडून शिरला मरण्यासाठी
वादळ येते येउन जाते नवखे नाही
संकट काळी बाहू असती स्फुरण्यासाठी
काय उद्याला होईल माझे ? चिंता कसली
चारच घटका फूल उमलते सुकण्यासाठी
अप्तेष्टांनी हात उचलले वार कराया
काट्यांचा तर जन्मच असतो रुतण्यासाठी
क्षितिजा पुढची केशर लाली खुणवी मजला
अंतर्यामी ओढ मनाला उडण्यासाठी
वर्दळ गेली धूमिल झाली संध्याछाया
मावळतीचा सूर्य बुडाला विझण्यासाठी
लाच न द्यावी "निशिकांता"ला काम कराया
बाजारी तो बसला नाही विकण्यासठी
निशिकांत देशपांडे मोंअ. ९८९०७ ९९०२३
E Mail:- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा