राग दरबारीच गातो झोपडीचे घर तरी
लक्तरामध्येच सजतो नावडे मज भरजरी
तार सप्तक खर्ज यातच सूरही हिंदोळती
दुःखही आनंद होउन हसतसे माझ्या स्वरी
छत घराचे पावसाळी ठिबकते पण दुःख का?
त्याच छिद्रातून येती चांदण्याच्याही सरी
संपदा नव्हतीच केंव्हा वाटण्या भांवामधे
भांडण्या मुद्दाच नाही स्नेह नांदे अंतरी
जमवले लाखो करोडो मार्ग त्यांचे कोणते ?
घाम गाळुन अंग मोडुन कमवतो मी भाकरी
जीवनाच्या उत्सवाला लागते का धन कधी ?
पंचतारांकित सुखाला आसरा माझ्या घरी
तृप्त माझ्या जीवनाचे गूढ मी सांगू कसे ?
वेदनांनी राज्य केले अन सुखांनी चाकरी
तीच आई तेच बाबा तेच जगणे दे मला
देव राया नोंद घ्यावी अर्जवाची दप्तरी
सूर ताना भैरवीच्या छेडल्या नाही कधी
वाटते "निशिकांत" आहे खूपसे जगण्यापरी
निशिकांत देशपांडे मो. न. ९८९०७ ९९०२३
E Mail:-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा