कुणी पार्थ नाही मला भेटला

कसे पंजरी मी शरांच्या निजावे, कुणी पार्थ नाही मला भेटला

कसे घोट भागीरथीचे मिळावे, कुणी पार्थ नाही मला भेटला

 
सयींचे विषारी किती सर्प माझ्या मनी राहुनी दंश करतात पण

कसे खांडवाने मनाच्या जळावे, कुणी पार्थ नाही मला भेटला

 
किती शोधले सर्व भावात माझ्या, जगावेगळा सापडे ना कुणी

कसे स्वप्न मी द्रौपदीचे बघावे, कुणी पार्थ नाही मला भेटला

 
म्हणे एकनिष्ठा, "किती भाग्य माझे, पती मत्सरी लाभला तो मला"

"विभागून घेणे नसे त्यास ठावे; कुणी पार्थ नाही मला भेटला"

 
तसे घासतो विश्वविद्यालयी रोज खर्डे सुखेनैव प्राध्यापकी

कसे, 'भृंग', अध्याय अठरा रचावे, कुणी पार्थ नाही मला भेटला